तरुण भारत

‘भारत बंद’ला वाढता पाठिंबा

शेतकऱयांचा उद्या देशव्यापी बंद : काँग्रेससह शिवसेना, तृणमूल, टीआरएस, आप, राजदचे समर्थन : आंदोलनाचे वाढले बळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

शेतकरी संघटनांची केंद्र सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता 8 डिसेंबरचा ‘भारत बंद’ यशस्वी करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतलेली दिसत आहे. मंगळवारच्या देशव्यापी बंदला काँग्रेससह अनेक पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे अनेक राज्यांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याची घोषणा केली. तसेच कर्नाटकातील राज्य रयत संघानेही बंदला पाठिंबा दर्शविल्याने कर्नाटकातही बंद यशस्वी होऊ शकतो.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी सुधारणांचे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी चालू झालेल्या शेतकरी आंदोलनाचा रविवारी अकरावा दिवस होता. सरकार आणि आंदोलनकारी शेतकरी यांच्यामधील तडजोडीच्या चर्चेच्या पहिल्या पाच फेऱया अयशस्वी झाल्याने अद्याप आंदोलनाचा जोर कायम आहे. शेतकऱयांच्या सर्व शंका आणि प्रश्न दूर केले जातील, असा दावा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला. मात्र, शेतकरी सरकारचा हा दावा मानण्याच्या मनःस्थितीत नाहीत. शेतकऱयांनी ‘भारत बंद’ मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता दिल्लीतील आंदोलनाला बळ देण्यासाठी काही राज्यांमधील शेतकरी राजधानीकडे जात असल्यामुळे पंजाब-हरियाणातील शेतकऱयांच्या आंदोलनाचे बळ वाढत चालले आहे.

राजकीय पक्षांसह संघटनाही पाठीशी

डावे पक्ष, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांनीही ‘भारत बंद’ला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. देशातील 10 केंद्रीय संघटनांनी ‘भारत बंद’चे समर्थन केले आहे. गुजरातच्या गांधीनगर इथे काँग्रेसचे कार्यकर्ते कृषी कायद्यांच्या विरोधात एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. राज्य काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेलही उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित आहेत.

तेलंगणा राष्ट्र समिती, आपचा पाठिंबा

तेलंगणा राष्ट्र समितीचे संस्थापक आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षाकडून आठ डिसेंबरच्या भारत बंदला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तेलंगणा राष्ट्र समिती या बंदला पाठिंबा देईल आणि सक्रीय सहभागही असेल, असे त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व पक्ष पदाधिकाऱयांना आणि कार्यकर्त्यांना भारत बंदला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. आपला देश कृषीप्रधान आहे, त्यामुळे लोकांनीही या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा, असे केजरीवाल म्हणाले.

शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही समस्या जर लवकर सुटली नाही तर देशभरातील शेतकऱयांना आंदोलनात भाग घेण्यासाठी उभे करेन, असे म्हटले आहे. नवे कायदे संमत करताना सरकारने गडबड करू नये, असा सल्ला आपण त्यावेळी दिला होता. यावर चर्चा व्हावी अशीही अपेक्षा व्यक्त केली होती. आता याच गडबडीमुळे सरकारला समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे सांगत याप्रश्नी 9 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींची भेट घेण्याची तयारी शरद पवार यांनी चालवल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

बॉक्सर विजेंदर सिंग आंदोलनस्थळी

बॉक्सर विजेंदर सिंग याने रविवारी आंदोलनस्थळाला भेट दिली आणि आंदोलनकारी शेतकऱयांना पाठिंबा दिला. सरकारने जर हे काळे कायदे मागे घेतले नाहीत तर मी माझा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करेन. मी पंजाबमध्ये प्रशिक्षण घेतले आहे, त्यांची रोटी खाल्ली आहे. आज जेव्हा ते थंडीत रस्त्यावर आहेत, मी त्यांचा भाऊ म्हणून आलो आहे. हरियाणातील इतर खेळाडूंनाही यायचे होते, पण ते सरकारी नोकरीत आहेत आणि इथे आल्याने ते अडचणीत आले असते. मात्र ते या शेतकऱयांसोबत असल्याचे त्याने जाहीर केले.

Related Stories

स्वीत्झर्लंडमध्ये सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम

Patil_p

“मोदींशिवाय हे शक्यच नव्हतं”, सायरस पूनावालांनी केलं कौतुक

Abhijeet Shinde

व्हर्च्युअल न्यायालयीन प्रणालीसाठी रोडमॅप

Patil_p

‘ट्रॅक्टर रॅली’ हिंसाचारात 86 पोलीस जखमी; 15 FIR दाखल

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये 5 व्या टप्प्यातील प्रचार समाप्त

Patil_p

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात, पत्नीचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!