सेन्सेक्स-निफ्टीचा नवा विक्रम : टीसीएस, रिलायन्स नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीचा तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये मागील चार सत्रातील कामगिरीत भारतीय शेअर बाजाराने तेजी कायम ठेवल्याची नोंद केली आहे. मंगळवारी सेन्सेक्सने 182 अंकांच्या मजबूत कामगिरीसह सर्वोच्च टप्पा पार केल्याची नोंदणी केली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि इन्फोसिस यासारख्या कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले असून सदर कंपन्यांचा विदेशी गुंतवणुकीचा सलगचा असणारा प्रवाह फायदेशीर ठरला असून बाजाराने मजबूत स्थिती प्राप्त केल्याची माहिती आहे.
दिग्गज कंपन्यांच्या जोरावर सेन्सेक्सने 45,742.23 अंकांचा टप्पा पार केला होता. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 181.54 अंकांनी वधारुन निर्देशांक 45,608.51 वर नवा विक्रम नोंदवत बंद झाला आहे. याच स्तरावर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सलग सहाव्या सत्रातही तेजीत राहून दिवसअखेर 37.20 अंकांनी वधारुन निर्देशांक 13,392.95 वर स्थिरावला आहे. निफ्टीनेही नवीन विक्रम प्राप्त करत 13,435.45 चा उच्चांक गाठल्याची नोंद केली आहे.
दिवसभरात सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी मजबूत राहिले असून सोबत टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि कोटक बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. दुसऱया बाजूला सन फार्मा, इंडसइंड बँक, एनटीपीसी, टेक महिंद्रा, ओएनजीसी आणि एशियन पेन्ट्स याचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.