तरुण भारत

कोयना प्रकल्प आधुनिकीकरणासाठी मदत करणार!

चिपळूण / प्रतिनिधी

आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्वाचे आहे. या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा 4 विद्युतगृहाच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.

  मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन व संसदीय कार्ये मंत्री अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री (गृह) शंभूराजे देसाई या सर्वांचे गुरूवारी सकाळी 10 वाजता कोयनानगर येथील हेलिपॅडवर आगमन झाले. त्यानंतर ते नवजामार्गे कोळकेवाडी कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा चारकडे रवाना झाले. तब्बल तीन तास त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. पाहणीवेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या.

  कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.  या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीवेळी येथून 1920 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनीच्या विद्यमाने चालवला जातो. हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे सह्याद्री डोंगराच्या पोटात 300 मीटर खोलीवर या प्रकल्पाचा चौथा टप्पा आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पध्द्तीने 1 हजार (मेगावॉट) वीज निर्मिती होत असल्याची माहिती अधिकाऱयांकडून देण्यात आली.

  पाहणीनंतर मुख्यमंत्री ठाकरे अन्य मंत्र्यांसह कोयनगर हेलिपॅडवरूनच पुणेकडे रवाना झाले. पाहणीवेळी आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

फुकट जाणारे पाणी मुंबईला नेलं तर बिघडलं कुठे?

कोयनेचे अवजल वर्षानुवर्षे फुकटतच जात आहे. असे फुकट जाणारे पाणी मुंबईला गेले तर बिघडलं कुठं, असा सवाल गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी गुरूवारी कोयनानगर येथे उपस्थित केला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विविध मंत्र्यांसह गुरूवारी कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी करून निघून गेले. त्यानंतर कोयनानगरच्या विश्रामगृहात सहकार मंत्री व साताऱयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी कोयना अवजल मुंबईला नेण्याबाबतच्या प्रश्नावर सहकार मंत्री पाटील म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून या बाबतची चर्चा सुरू आहे. अभ्यासही झालेला आहे. मात्र या दौऱयात कोणतीच चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गृहराज्यमंत्री देसाई यांनी या पाण्याचा उपयोगच होत नसल्याचे सांगत असे फुकट जाणारे पाणी मुंबईला नेले तर काही हरकत नसल्याचे मत मांडले. आजचा मुख्यमंत्र्यांचा दौरा त्या दृष्टीने नव्हता. प्रकल्पाची केवळ पाहणी हाच मुख्य हेतू होता, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

दोडामार्गात गणपतीची पूजा होणार भटजीविना

NIKHIL_N

रत्नागिरी नगर परिषद आवारात इलेक्ट्रीक वाहनांसाठी ‘चार्जिंग पॉईंट’

Patil_p

चर्चांचीच उड्डाणे, मुलभूत सुविधांकडेही दुर्लक्ष

NIKHIL_N

फार्मासिस्ट, शिक्षक पत्नीच्या संपर्कात तब्बल 127जण!

Patil_p

शिक्षकांच्या विनंती बदल्यांना परवानगी द्या!

NIKHIL_N

सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रवीण मांजरेकर

NIKHIL_N
error: Content is protected !!