तरुण भारत

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कुस्तीतील महान मल्ल काळाच्या पडद्याआड :  शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, कुस्तीपंढरी कोल्हापूरवर शोककळा

प्रतिनिधी/ कोल्हापूर

भारताच्या कुस्ती परंपरेत पहिल्या हिंदकेसरीचा किताब जिंकून इतिहास निर्माण केलेले महान मल्ल श्रीपती यल्लाप्पा खंचनाळे (वय 86 रा. रूईकर कॉलनी) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. गेली महिनाभर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरातील कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली.

    खंचनाळे यांच्या पार्थिवाची सजवलेल्या ट्रक्टर ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. रूद्रभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माती सावडण्याचा विधी बुधवारी (16 डिसेंबर) सकाळी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे सत्यजित, फुटबॉलपटू रोहित आणि मुलगी पूनम, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

   1959 साली दिल्ली येथे हिंदकेसरी किताबासाठी खंचनाळे यांची रूस्तम-ए-पंजाब बंतासिंग यांच्यासोबत लढत झाली होती. लालमातीत रंगलेली ही लढत सलग दोन दिवस चालली. पहिल्या दिवशी दोघात दीड तास कुस्ती होऊनही कोणी चितपट झाले नव्हते. त्यामुळे कुस्ती शौकिनांच्या आग्रहाखातर दुसऱया दिवशी परत लढत लावली. यात मात्र खंचनाळे यांनी बत्तासिंगला आस्मान दाखवून हिंदकेसरीच्या गदेवर कब्जा केला होता. बक्षीस वितरण समारंभात देशाचे तत्कालिन पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते खंचनाळे यांना प्रतिष्ठेची गदा देऊन गौरविले होते. 1960 मध्ये कराडच्या मैदानात झालेल्या लढतीत  मल्ल शिरगावकर यांना केवळ 2 मिनिटाच खंचनाळे यांनी महाराष्ट्र चॅम्पियन किताब संपादन केला होता.

     एकसंबा ते कोल्हापूर आणि कोल्हापूरवासी

   एकसंबा (ता. चिकोडी, बेळगाव) हे खंचनाळे यांचे मुळगाव. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1934 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. 1948 सालापर्यंत त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण मराठी शाळेतून घेतले. मात्र शाळेत शिकत असल्यापासूनच ते कुस्ती स्पर्धांमध्ये ते भाग घ्यायचे. वडील यल्लाप्पा खंचनाळे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे खंचनाळे यांनी सातवीनंतर शाळा सोडून लालमाती अंगाला लावली.  सुरुवातीच्या काळात एकसंबा गावात अनेक कुस्ती केल्या. त्यानंतर पन्नासच्या दशकात ते कोल्हापूरात आले. शाहूपुरी तालमीची निवड केली. तेथून त्यांच्या हिंदकेसरीच्या प्रवासाला प्रारंभ झाला.  

      पहाटेपासून अखंडीत व्यायाम आणि कष्ट

 शाहूपुरी तालमीत वस्ताद हशीम तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली खंचनाळे यांनी कुस्तीचे धड गिरवले. प्रतिस्पर्धी मल्लांना आस्मान दाखविण्यासाठी अंगात लागणारी चपळता, वेग, ताकद निर्माण व्हावी यासाठी खंचनाळे पहाटे 3 वाजता उठून तब्बल 3000 बैठका, 3000 जोर, अर्धा तास माती खणणे अशी मेहनत करत होते. यानंतर मल्लखांबही ते करत होते.

    1959 चे वर्ष सुवर्णवर्ष

1959 साल हे खंचनाळे यांच्यासाठी भाग्याचे ठरले. पहिल्या हिंदकेसरी किताब कुस्ती स्पर्धेसाठी दिल्ली येथे खंचनाळे यांची रूस्तम-ए-पंजाब बंतासिंग यांच्यासोबत लढत झाली. खंचनाळे यांनी बंतासिंगला घुटना डावावर आस्मान दाखवून हिंदकेसरीच्या गदेवर कब्जा केला.  खंचनाळे यांनी महाराष्ट्र चॅम्पियनबरोबरच बेळगाव येथे 1958 साली, जबलपूर येथे 1962 साली व बेंगळूर येथे 1965 साली झालेल्या ऑल इंडिया कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये विजेतेपद मिळवले. खंचनाळे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. महाराष्ट्र सरकारकडून शिवछत्रपती पुरस्कारासह कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूर भूषण, नाशिक येथील कुसूमाग्रज ट्रस्ट प्रतिष्ठानच्या वतीने गोदावरी गौरव व कर्नाटक भूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित केले. प्रशिक्षक म्हणून त्यांनी असंख्य मल्ल घडविले. पंचगिरीही केली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अध्यक्ष तसेच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.

खंचनाळे यांनी परदेशात केलेल्या लढती

जकार्ता (इंडोनेशिया), जर्मनी, ताश्कंद (रशिया), जपान, हंगेरी, बलुचिस्तान (पाकिस्तान), ग्रीस यासह विविध विविध राष्ट्रांमध्ये खंचनाळे मॅटवरील कुस्ती खेळल्या.

खंचनाळेंच्या गाजलेल्या कुस्त्या

खंचनाळे झटपट कुस्ती करण्यात माहीर होते. त्यांच्या पाकिस्तानचा जिरा पंजाबी, सादिक पंजाबी, पंजाबचा खडकसिंग, चांद पंजाबी, मोती पंजाबी, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, मोहम्मद टायगर, नझीर मोहम्मद, शामराव मुळीक, किसनलाल पांधा, सचिराम, सुखदेव सैय्या, सुचासिंग यांच्याबरोबर झालेल्या कुस्त्या त्याकाळी गाजल्या होत्या.  

रूईकर कॉलनीतील बंगला आणि शाहूपुरी तालीम

खंचनाळे रूईकर कॉलनीतील बंगल्यात राहत असत. मात्र त्यांचा सर्वाधिक काळ गेला तो शाहूपुरी तालमीत. ज्या तालमीत हिंदकेसरी घडला. त्याच तालमीत या हिंदकेसरीने असंख्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचे काम वस्ताद म्हणूनही शेवटपर्यंत केले. गेली 

 लढवय्या आणि प्रामाणिक हिंदकेसरी

श्रीपती खंचनाळे यांनी कुस्तीपेशाही कधीही गद्दारी केली नाही. शेवटपर्यंत प्रामणिकपणा जपला. लढवय्या मल्ल म्हणून त्यांनी शेवटपर्यंत कुस्त्या केल्या. वस्ताद म्हणूनही असंख्य मल्लांना कुस्तीचे धडे दिले. त्यांच्या रुपाने प्रामाणिक हिंदकेसरी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

बाळ गायकवाड, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सर्वेसर्वा

Related Stories

ओसाका टॉर्च रिले संदर्भात अंतिम निर्णय नाही

Patil_p

तंत्रशुद्धतेत राहुल द्रविड सर्वोत्तम भारतीय फलंदाज

Patil_p

भारताने गमावले चार वर्षात प्रथमच अव्वलस्थान

Patil_p

टिमीया-क्रिस्टिना, केविन-आंद्रेयास दुहेरीत अजिंक्य

Patil_p

ओसाका, रॉजर्स, ब्रॅडी उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

फिफा मानांकनात बेल्जियम अग्रस्थानी

Patil_p
error: Content is protected !!