ऍडलेडमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली दिवस-रात्र कसोटी गुरुवारपासून, सरस यष्टीरक्षणाचा साहाला लाभ होण्याचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवार दि. 17 पासून ऍडलेड ओव्हलवर खेळवल्या जाणाऱया पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी ऋषभ पंतऐवजी वृद्धिमान साहाला यष्टीरक्षक या नात्याने प्रथम पसंती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी 36 वर्षीय साहाला संधी दिली जाणार की 23 वर्षीय ऋषभ पंतला, यावरुन बरीच चर्चा झडली. पण, साहाचे यष्टीरक्षण पंतच्या तुलनेत अधिक सरस असल्याने त्याला प्राधान्य मिळू शकते.
स्वतः हनुमा विहारीने यष्टीरक्षणाच्या जागेसाठी ही निकोप स्पर्धा असल्याचे प्रतिपादन यापूर्वी केले आहे. साहा यष्टीरक्षणात सरस असून त्याची फलंदाजी सावध असते. याचा त्याला लाभ होऊ शकतो. प्रशिक्षक रवि शास्त्री, कर्णधार विराट कोहली, साहायक प्रशिक्षक विक्रम राठोड, भरत अरुण, सध्या दौऱयावर असणारे निवडकर्ते हरविंदर सिंग हे पंत व साहा यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि याच आधारावर अंतिम निवड अपेक्षित होती.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध खेळताना भारतीय संघ एकवेळ पराभवाच्या छायेत होता. मात्र, त्याचवेळी साहाने 54 धावांची धीरोदात्त खेळी साकारत संघाला पराभवाच्या दाढेतून बाहेर काढले होते. भारत अ संघ त्यावेळी 9 बाद 143 अशा अडचणीत होता. मात्र, साहाने युवा सहकारी कार्तिक त्यागीसमवेत सामना वाचवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या जोडीने जेम्स पॅटिन्सन, मायकल नेसर, कॅमेरुन ग्रीन या गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला. या तुलनेत पंत गुलाबी चेंडूने रंगीत तालमीच्या लढतीत भारताने सामन्यावर नियंत्रण घेतल्यानंतर फलंदाजीला उतरला होता.
यजमान संघाच्या गोलंदाजांनी या लढतीत जवळपास सर्व प्रयत्न सोडून दिले होते आणि त्यांच्या या आत्मघाती खेळावर माजी विश्वचषक जेता कर्णधार ऍलन बोर्डरने कडाडून टीका केली होती. भारतीय संघातर्फे साहाने 37 कसोटीत 30 पेक्षा अधिकच्या सरासरीने 1238 धावांची बरसात केली असून यात त्याने 3 शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने यष्टीमागे 92 झेल, 11 यष्टीचीत असे 103 बळी घेतले आहेत. अर्थात, पहिल्या कसोटीसाठी साहाला प्रथम पसंती दिली गेली तरी पंत पूर्ण बाहेर असेल, असेही अजिबात नाही. साहाने या संधीचा लाभ घेत फलंदाजीही उत्तम केली तरच त्याला उर्वरित मालिकेत अंतिम संघातील निवड गृहित धरता येईल.
अष्टपैलू हेन्रिक्सचा समावेश, दुखापतग्रस्त ऍबॉट बाहेर


सिडनी : अष्टपैलू मोईसेस हेन्रिक्सचा ऑस्ट्रेलियन संघात सोमवारी समावेश केला गेला आहे तर जलद गोलंदाज सीन ऍबॉट दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी तीन दिवसीय दुसऱया सराव सामन्यात हेन्रिक्सला किरकोळ वेदनेमुळे सहभागी होता आले नव्हते. पण, नंतर त्याने तंदुरुस्ती चाचणी पार केली असून आता 4 वर्षांच्या अंतराने तो संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हेन्रिक्सने 4 वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. भारताविरुद्ध संपन्न झालेल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेच्या निमित्ताने त्याने राष्ट्रीय संघातही 3 वर्षानंतर प्रथमच पुनरागमन केले होते.
दरम्यान, ऍबॉटच्या दुखापतीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. दुसऱया सराव सामन्यात त्याला दुखापत झाली. आता दि. 26 डिसेंबरपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यात तो संघात परतण्याची शक्यता आहे. सराव सामन्यात भारताच्या दुसऱया डावात 3 बळी घेणारा ऍबॉट संघासमवेत ऍडलेडलाही जाणार नाही, असे ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाने यावेळी स्पष्ट केले. ऍबॉटपूर्वी, डेव्हिड वॉर्नर, विल पुकोवस्की यापूर्वीच दुखापतीमुळे संघातून बाहेर पडले आहेत. भरीत भर म्हणून कॅमेरुन ग्रीन व हॅरी कॉन्वे यांना सराव सामन्यात कन्कशनला सामोरे जावे लागले तर जॅक्सन बर्डला देखील दुखापतीचा सामना करावा लागला. अन्य खेळाडूत मार्कस स्टोईनिसला कमरेची दुखापत झाली, ऍस्टॉन ऍगरला पोटरीची दुखापत झाली तर मिशेल स्टार्क, जोश हॅझलवूड देखील दुखापतीचे बळी ठरले आहेत.