तरुण भारत

सासष्टीत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का

प्रतिनिधी/ मडगाव

सासष्टीत आठ जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेसने तीन ठिकाणी बाजी मारली, पण या निकालाने सासष्टीतील काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसल्याचे स्पष्ट संकेत या निकालातून मिळाले. भाजपने दोन तर राष्ट्रवादी एक, अपक्ष एक व आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते खोलताना बाणावली मतदारसंघातून विजय मिळवित संपूर्ण गोव्याचे लक्ष वेधून घेतले. त्याच बरोबर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नुवेचे आमदार विल्प्रेड डिसा तसेच वेळळीचे आमदार व मंत्री फिलीप नेरी रोड्रिग्स यांच्यासमोर खऱया अर्थाने आव्हान निर्माण केले आहे.

Advertisements

नुवे मतदारसंघातून काँग्रेसच्या आसूसियाना रोमान साब्रिनो ई रोड्रिग्स यांनी अपक्ष उमेदवार ब्रिझी आशा निलम बार्रेटो यांचा 151 मतांनी पराभव केला. या मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरली. अपक्ष उमेदवार ब्रिझी बार्रेटो यांना स्थानिक आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांचा पाठिंबा लाभला होता. त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांना जबरदस्त फटका बसला आहे.

वेळळी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार ज्युलियो ग्रेगोरियो फर्नांडिस यांनी अपक्ष उमेदवार आंतोनियो उर्फ बाबूश रोड्रिग्स यांचा 331 मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार आंतोनियो रोड्रिग्स यांना वेळळीचे आमदार तथा मंत्री फिलीप नेरी रोड्रिग्स यांचा पाठिंबा होता. या मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची झाली होती. त्यात काँग्रेसने वेळळी मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे फिलीप नेरी यांच्यासमोर आव्हान कायम राहिले आहे.

कुडतरी मतदारसंघात काँग्रेसचे मिशल मोरेनो रिबेलो यांनी अपक्ष उमेदवार ऍण्ड्रीया फर्नांडिस यांचा 3598 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सरिता फर्नांडिस यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्या विशेष प्रभाव पाडू शकल्या नाही. त्यांना 910 मते मिळाली. कुडतरी मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. मिशल रिबेलो यांना दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला होता. तर स्थानिक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कुडतरीत अलिप्त राहणे पसंत केले होते. मात्र, त्याचा परिणाम कुठेच काँग्रेसच्या मतांवर झालेला आढळून आला नाही.

चर्चिलच्या बाणावलीत ‘आप’ची बाजी

बाणावली मतदारसंघावर आपले वर्चस्व असल्याचा दावा करणाऱया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांना आम आदमी पक्षाने जोरदार दणका दिला. या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे युवा उमेदवार हेन्जल फर्नांडिस यांनी काँग्रेसच्या उमेदवार रॉयला फर्नांडिस यांचा 434 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिनिनो फर्नांडिस हे तिसऱया स्थानावर फेकले गेले.

कोलवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वानिया बाप्तिस्ता यांनी काँग्रेसच्या उमेदवार सुझी फर्नांडिस यांचा 75 मतांनी पराभव केला. आम आदमी पक्षाच्या अश्वर्या फर्नांडिस यांनी 1431 मते प्राप्त केली. कोलवा व बाणावली हे दोन मतदारसंघ चर्चिल आलेमा यांच्यासाठी प्रतिष्ठेचे होते. त्यात कोलव्यात त्यांनी निसटता विजय मिळविला. या निकालातून चर्चिल आलेमाव यांच्या बाणावलीवरील वर्चस्वला धक्का बसल्याचे संकेत मिळाले.

सासष्टीत भाजपची दोन कमळे फुलली

गिरदोली व दवर्ली या दोन मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले व सासष्टीत भाजपची दोन कमळे फुलली. गिरदोलीतून भाजपच्या उमेदवार संजना संजय वेळीप यांनी काँग्रेसच्या उमेदवार सोनिया फर्नांडिस यांचा 593 मतांनी पराभव केला. या मतदारसंघातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. बाळळी पंचायत क्षेत्रात मोठय़ा संख्येने झालेले मतदान भाजपला तारू शकले. त्यासाठी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कळवेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या मतदारसंघात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण हा विषय बराच तापला होता. मात्र, त्यांचे मतांमध्ये परिर्वतन झाले नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

दवर्ली मतदारसंघात भाजपचे उल्हास तुयेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार मुर्तूझा कुक्कनूर यांचा 1593 मतांनी पराभव केला. उल्हास तुयेकर यांनी दवर्ली मतदारसंघावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. या मतदारसंघात एकूण सहा उमेदवार होते. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात मतविभागणी झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

‘राय’मध्ये अपक्ष उमेदवाराची बाजी

राय मतदारसंघातून अपक्ष उमेदवार डॉमनिक गांवकर यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जोसेफ डायस 653 मतांनी पराभव केला. डॉमनिक गांवकर हे सलग या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर आली होती. परंतु आपण ती नाकारली. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर व्हायला पाहिजे असे काहीच नाही हे आपल्या निकालातून स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला.

सासष्टी आम आदमी पक्षाने आपले खाते खोलताना इतर मतदारसंघातील निकालावर परिणाम केल्याचे काल स्पष्ट झाले. आम आदमी पार्टी ही काँग्रेसला डेमेज करणारी ठरली. खास करून राय, गिरदोली, कोलवा, नुवे मतदारसंघात आम आदमी पक्षाने बऱयापैकी मते प्राप्त केली आहेत.

Related Stories

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करणे अशक्य

Amit Kulkarni

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात; 22 जखमी

prashant_c

म्हापसा विकास आघाडीचे 20 उमेदवार जाहीर

Patil_p

कुंभारजुवेत खारे पाणी शिरून शेतीचे नुकसान

Amit Kulkarni

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे ख्रिस्ती आमदारांकडून समर्थन

Patil_p

कोडार नदीच्या पात्रात बुडून युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!