तरुण भारत

ग्रा. पं. निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार

रस्त्याच्या डांबरीकरणाकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केल्याने हिंडलगा समर्थ कॉलनीमधील रहिवाशांची भूमिका : गेल्या 18 वर्षापासून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंडलगा हद्दीतील लक्ष्मीनगर, समर्थ कॉलनी परिसरातील सुस्थितीत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र, 18 वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे ग्राम पंचायतीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार समर्थनगर परिसरातील रहिवाशांनी केला आहे.

समर्थ कॉलनीची वसाहत निर्माण होऊन 18 वर्षे झाली. वसाहत निर्माण करताना येथील रस्त्यांचे डांबरीकरण आणि गटारांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर ग्राम पंचायतीच्या तीन निवडणुका झाल्या. प्रत्येकवेळी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून सदस्यांची निवड करून ग्राम पंचायतीवर पाठविण्यात येते. पण ग्राम पंचायत सदस्यांनी येथील रस्त्यांची दुरुस्ती किंवा रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न केला नाही. परिणामी रस्ते पूर्ण खराब झाले असून समर्थ कॉलनीमधील दोन गल्ल्यांमधील रस्ते पावसामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पादचाऱयांनाही रस्त्यांवरून ये-जा करणे कठीण झाले आहे. रस्ते खराब झाल्याने लहान मुले व वृद्धांना चालण्यास अडचण होत आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी तसेच विविध समस्यांबाबत हिंडलगा ग्राम पंचायतीकडे तक्रार करण्यात येते. पण रहिवाशांना आश्वासनाखेरीज काहीच मिळत नाही.

लक्ष्मीनगर आणि समर्थ कॉलनीमधील काही ठराविक रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील सुस्थितीत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अन्य आणि 18 वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. केवळ डांबरीकरण करण्यात आलेल्या परिसरातील नागरिक मतदान करतात का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. अन्य रहिवासी मतदान करीत नाहीत का? अशी विचारणा करण्यात येत असून दि. 22 रोजी होणाऱया निवडणुकीवेळी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय समर्थनगर परिसरातील रहिवाशांनी घेतला आहे.

समर्थ कॉलनी परिसरातील गटारींची स्वच्छता करण्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. दर आठ-पंधरा दिवसांनी ग्राम पंचायतीमध्ये प्रत्यक्षात भेट घेऊन तक्रार केल्यानंतर गटारींची स्वच्छता करण्यात येते. गटारी पूर्णपणे खराब झाल्या असून काही ठिकाणी कोसळल्या आहेत. यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. येथील समस्यांचे निवारण करण्यास ग्राम पंचायतीचे व यापूर्वीच्या सदस्यांचे दुर्लक्ष झाले आहे. निवडून दिलेले सदस्य समस्यांचे निवारण करीत नसल्यास मतदान करण्याची गरज काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

आचारसंहितेमुळे निवडणुकीनंतर विकासकामे राबवण्याचे आश्वासन

येथील महिलावर्गाने ग्राम पंचायतीला बुधवारी धडक देऊन रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी केली. तसेच डांबरीकरण न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला. पण आचारसंहिता असल्याने विकासकामे राबविता येणार नाहीत, असे सांगून निवडणुकीनंतर रस्ता करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

यावेळी समर्थ कॉलनीतील मल्लव्वा कुडचीकर, अविता देसाई, उज्ज्वला पाटील, रत्ना पट्टणशेट्टी, नलीनी उसगावकर, उषा गवस, सुधा हणमर आदी उपस्थित होत्या.

Related Stories

शुक्रवारपेठ टिळकवाडीत सांडपाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

क्लोजडाऊनची घोषणा होताच बाजारपेठेत झुंबड

Amit Kulkarni

बेळगावात आज हुतात्म्यांना अभिवादन

Patil_p

बेळगावात घरफोडय़ा करणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni

व्यवसाय परवाना नूतनीकरणाच्या माध्यमातून मिळू शकतात चार कोटी

Amit Kulkarni

पशुसंजीवनी योजनेंतर्गत पशुपालकांपर्यंत सुविधा पुरविणार

Omkar B
error: Content is protected !!