तरुण भारत

मण्णूर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांत तीव्र संताप

हिंडलगा

मण्णूरपासून हिंडलग्याला जोडणाऱया मुख्य रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने मण्णूरसह गोजगा, बेकिनकेरे, अतिवाड, आंबेवाडी, बसुर्ते आदी गावातील नागरिक व वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कार्म अर्धवट स्थितीत असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींना जाग येणार काय? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

Advertisements

मण्णूर गाव हे शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे. पण गेल्या काही वर्षांपासून गावाला जोडणाऱया मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाकडे मात्र लोकप्रतिनिधी व बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. मागील दोन वर्षामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे मार्कंडेय नदीला पूर येऊन रस्त्यावर उरलासुरला डांबरही वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र खड्डे, धूळ आणि दगडांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी सुमारे तीन किलोमीटर अंतर पार करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. डांबरीकरणाच्या मागणीसाठी दोन वेळा रास्ता रोको करून आंदोलनही करण्यात आले. पण सुस्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभारामुळे गेल्या दोन वर्षापासून ग्रामस्थ व परिसरातील वाहनधारकांना हाल सोसावे लागत आहेत. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगून मोठय़ा थाटात कामाचा शुभारंभही केला. पण अद्यापही काम पूर्ण झाले नाही. त्या पाठोपाठ ग्रामीण भागातील इतर गावांचे रस्ते मात्र उत्कृष्ट झाले असून मण्णूर आणि गोजगा ग्रामस्थांवर अन्याय झाला आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी रस्ता डांबरीकरणाला सुरुवात केल्याचे भासवून जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण रस्ता पुन्हा उखडण्यात आला आहे. त्यानंतर मात्र कंत्राटदाराने त्वरित डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याऐवजी काम बंद ठेवल्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे बेळगावला दैनंदिन प्रवास करणाऱया परिसरातील हजारो वाहनधारक व ग्रामस्थांना मोठमोठे खड्डे, सर्वत्र विखुरलेले दगड आणि धुळीचा सामना करत धोकादायक प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे वाहने घसरून अपघात झाल्याने काही लोकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. तर दुचाकी आणि चारचाकी वाहने नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती मिळाल्याने येथून प्रवास न करता आंबेवाडीमार्गे मण्णूरला जाणेच पसंत करू लागले आहेत. शिवाय सोशल मीडियावर देखील खराब झालेल्या मण्णूर रस्त्याचे व्हिडिओ तयार करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणाचे चांगलेच वाभाडे काढण्यात आले आहेत. याशिवाय लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण न केल्यास बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मण्णूर ग्रामस्थ व परिसरातील वाहनधारकांनी दिला आहे.

Related Stories

मंगसुळी कालव्याला पाणी आल्याने शेतकऱयांतून समाधान

Patil_p

कंग्राळ गल्लीत साकारला विजापूरचा भव्य किल्ला

Patil_p

बी. डब्ल्यू. आचमनी यांच्याकडून लोकमान्य ग्रंथालयास 600 पुस्तके भेट

Patil_p

प्रवाशांच्या संख्येत वाढ…परिवहनला दिलासा

Patil_p

कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी

Amit Kulkarni

सदाशिवनगर येथील बसथांब्याची दुरवस्था

Omkar B
error: Content is protected !!