तरुण भारत

ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी दणदणीत विजय

भारताचा कसोटीतील निचांक, सर्वबाद 36, हॅझलवुड-कमिन्सपुढे भारतीय फलंदाजांची शरणागती

वृत्तसंस्था/ ऍडलेड

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला एका लाजिरवाण्या विक्रमाचा धनी व्हावे लागले असून येथे झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर तिसऱयाच दिवशी 8 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हॅझलवुड, कमिन्स यांच्या अतिशय भेदक ठरलेल्या माऱयावर भारताचा दुसऱया डावात केवळ 36 धावांत फडशा पडला. भारताची ही कसोटीतील सर्वात निचांकी धावसंख्या आहे.

भारताने पहिल्या डावात चांगले प्रदर्शन करीत 244 धावा जमविल्या. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाला 191 धावांत गुंडाळून 53 धावांची आघाडी घेतली होती. पण तिसऱया दिवशी भारताकडून निकृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन घडले. खेळपट्टीवर भयावह असे काहीच नव्हते. तरीही हॅझलवुड (5-3-8-5) व पॅट कमिन्स (10.2-4-21-4) यांनी उच्च दर्जाच्या वेगवान गोलंदाजीचे प्रदर्शन करीत भारतीय फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. या दोन संघांत आणखी तीन कसोटी होणार आहेत. पण या प्रदर्शनामुळे भारतीय संघाचे मनाधैर्य खचले जाऊ शकते. 42 हा भारताचा याआधीचा कसोटीतील निचांक होता. 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत तो नोंदवला गेला होता आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याला ‘समर ऑफ 42’ अशा नावाने ओळखले जाते. डे-नाईट कसोटीच्या छोटय़ा इतिहासात देखील 36 ही सर्वात निचांकी धावसंख्या बनली असून एकंदर इतिहासातील ती संयुक्त पाचव्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे.

ऑस्ट्रेलियाने 90 धावांचे किरकोळ उद्दिष्ट 2 गडय़ांच्या मोबदल्यात 21 षटकांतच सहजतेने पार केले. मॅथ्यू वेड (33) व मार्नस लाबुशेन (6) हे दोन गडी त्यांनी गमविले. सलामीवीर जो बर्न्सने विजयी षटकार ठोकताना आपले अर्धशतकही पूर्ण केले. तो 51 धावांवर नाबाद राहिला. या विजयाने ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 30 गुण मिळाले आहेत. पहिल्या डावात नाबाद 73 धावा करणारा त्यांचा कर्णधार टिम पेनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताने आता सलग तीन कसोटी तीन दिवसांच्या आत गमविल्या असून याच वर्षी न्यूझीलंडमधील दोन कसोटीत त्यांना तिसऱया दिवशीच पराभव स्वीकारावा लागला होता. कर्णधार कोहली या कसोटीनंतर मायदेशी परतणार असल्याने फलंदाजी कमकुवत होणार आहे. त्यातच वेगवान गोलंदाज शमी जखमी झाल्याने भारताच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. फलंदाजी करताना कमिन्सचा उसळता चेंडू लागून त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने तो दुसऱया डावात गोलंदाजी करू शकला नाही. तो जखमी झाल्याने भारताचा डाव 21.2 षटकांत 9 बाद 36 धावांवरच संपविण्यात आला.

सुनील गावसकर, अजित वाडेकर यासारख्या दिग्गजांना समर ऑफ 42 च्या नामुष्कीचे ओझे बराच काळपर्यंत झेलावे लागले होते. आता त्याची जागा ‘समर ऑफ 36’ ने घेतली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी गावसकरसारख्या महान खेळाडूचा त्या संघात समावेश होता आणि आजच्या संघात कोहलीसारख्या आजच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजाचा समावेश आहे. या सामन्यात भारताची 8 बाद 26 अशी केविलवाणी अवस्था झाली होती, तेव्हा निचांकातील विश्वविक्रमाशी (सर्व बाद 26, न्यूझीलंड) बरोबरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण हनुमा विहारीने चौकार ठोकल्याने ही नामुष्की टळली. ऑस्ट्रेलियाच्या जलद गोलंदाजांनी जादा बाऊन्स मिळवित भारतीय फलंदाजांचे तंत्र उघडे पाडले. सीमवर टप्पा पडल्यानंतर प्रत्येक चेंडू ऑफ व मिडल स्टंपच्या रोखानेच जाईल, अशा पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आणि या माऱयासमोर भारताची नामवंत फलंदाजांची फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. नाईट वॉचमन बुमराह पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर हॅझलवुड व कमिन्स यांनी भारतीय फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडत त्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का दिला.

मयांक अगरवाल, पुजारा, रहाणे एकाच पद्धतीने बाद झाले तर कोहली 2014 मध्ये इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने बाद व्हायचा त्याची पुनरावृत्ती त्याने येथे केली. पाचव्या स्टंपवर जाणाऱया चेंडूवर त्याने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला आणि गलीमध्ये त्याचा झेल टिपला गेला. खेळपट्टीतून बाऊन्स मिळू लागल्यावर भारतीय फलंदाजांची त्रेधा उडाली आणि अति बचावात्मक मानसिकतेचाही त्यांना फटका बसला. एका तासात इतका नाटय़मय बदल झालेली ही पहिलीच कसोटी ठरली आहे. याचे परिणाम त्यांच्या कामगिरीवर पुढील कसोटीत उमटण्याची शक्यता आहे. दुसरी बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव 244, ऑस्ट्रेलिया प.डाव 191, भारत दु.डाव 21.2 षटकांत सर्व बाद 36 : पृथ्वी शॉ 4, मयांक अगवाल 9, बुमराह 2, पुजारा 0, कोहली 4, रहाणे 0, विहारी 8, साहा 4, अश्विन 0, उमेद यादव नाबाद 4, शमी जखमी निवृत्त 1. गोलंदाजी : हॅझलवुड 5-8, कमिन्स 4-21, स्टार्क 0-7. ऑस्ट्रेलिया दु.डाव 21 षटकांत 2 बाद 93 : वेड 5 चौकारांसह 33, बर्न्स 63 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह नाबाद 51, लाबुशेन 6, स्मिथ नाबाद 1, अवांतर 2. गोलंदाजी : अश्विन 1-16, बुमराह 0-27, उमेश यादव 0-49.

Related Stories

विंडीज-इंग्लंड कसोटीत पावसाचा व्यत्यय

Patil_p

शकीब हसन पुनरागमनासाठी सज्ज

Amit Kulkarni

स्पर्धा रद्द, तरीही विम्बल्डन बक्षीस रक्कम प्रदान करणार

Patil_p

विंडीजचे माजी क्रिकेटपटू मोसली यांचे अपघाती निधन

Patil_p

रणजी स्पर्धेची 87 वर्षांची परंपरा खंडित

Patil_p

युरोपियन चॅम्पियनशिप्स, स्विस ओपन स्पर्धा रद्द

Patil_p
error: Content is protected !!