तरुण भारत

तालुक्याच्या पश्चिम भागात चुरशीने 86 टक्के मतदान

वार्ताहर/ किणये

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार दि. 22 रोजी तालुक्याच्या पश्चिम भागात चुरशीने मतदान झाले. सकाळी 7 वाजता मतदान केंद्रांमध्ये मतदान पेटय़ांची पूजा करून मतदानाला सुरुवात झाली. कामगार वर्ग व शेतकरी बांधवांनी सकाळीच  बुथवर गर्दी केली होती. दुपारी काही मतदान केंद्रावर सामसूम होती तर दुपारी 4 नंतर पुन्हा मतदानाला जोर आला.

Advertisements

यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रशासनामार्फत घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करूनच मतदान केले. मतदानासाठी बुथवर येणाऱया प्रत्येक मतदाराला सॅनिटायझर देण्यात येत होते. तसेच प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात येत होती. मतदारांनी मास्कचाही वापर केला होता.

आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका व ग्रा. पं. कर्मचारी यांच्यावर कोरोना नियमावलींची जबाबदारी होती. तलाठी व पीडीओ हेही प्रत्येक मतदान केंद्रावर पाहणी करीत होते.

मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण पोलिसांचे वाहनही गावागावांमध्ये फिरताना दिसत होते. मतदारांना सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.

सकाळी सातपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. कामगार वर्ग मतदान करून कामाला जाण्याच्या घाईगडबडीत होते. शिवारात जाण्यासाठी सकाळी 10.30 ते 11 पर्यंत शेतकऱयांनी मतदान करून काही शेतकरी शेतावर गेले तर बहुतांशी गावातील शेतकरीही मतदानाच्या निमित्ताने शेतातील कामे बंद ठेवून गावातच राहिले.

विविध वाहनातून मतदारांची ने-आण करण्याची सोय केली होती. उमेदवारांचे समर्थक मतदारांना बोलावून आणूनही मतदान करण्याकरिता पाठवित होते. वयोवृद्ध महिला व पुरुषांना मतदानासाठी त्यांचा हात धरून वाहनातून व उचलूनही नेत असत. दिव्यांग व अंपगांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर ठेवली होती.

किणये ग्राम पंचायतीसाठी 86 टक्के मतदान

किणये ग्राम पंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली असून मतदान चुरशीने झाले. किणये ग्रा. पं. साठी 86.70 टक्के मतदान झाले. एकूण 6807 मतदारांपैकी 5902 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. किणये ग्रा. पं. मधील वॉर्ड क्र. 1 किणये व वॉर्ड क्र. 4 रणकुंडये मतदान केंद्रावर सायंकाळी गर्दी झाली असल्याने मतदारांना नंबर देऊन सायंकाळी 6 पर्यंत मतदान करून घेण्यात आले.

किणये ग्रा. पं. मध्ये किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, नावगे, जानेवाडी, बामणवाडी, कर्ले गावांचा समावेश असून एकूण सात वॉर्ड आहेत.

एकूण 22 जागा आहेत. यातील दोन जागांची बिनविरोध निवड झाली असल्याने 20 जागांसाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीमध्ये बंद झाले आहे.

किणये गावात दोन वॉर्ड आहेत. यातील वॉर्ड क्र. 1 मधील 980 मतदानापैकी 832 इतके मतदान झाले. वॉर्ड 2 मध्ये 761 पैकी 655 मतदान झाले.

बहाद्दरवाडी व शिवनगर या गावांचा वॉर्ड क्र. 3 असून एकूण 988 मतदानापैकी 870 मतदान झाले. बहाद्दरवाडी गावात 88 टक्के मतदान झाले. रणकुंडये वॉर्ड क्र. 4 मध्ये मतदारांची गर्दी असल्याने त्यांना नंबर देऊन सर्व मतदारांचे मतदान करून घेतले. सायंकाळी 6 पर्यंत मतदान झाले. 951 मतदानापैकी 850 मतदान झाले असून रणकुंडयेत 89 टक्के मतदान झाले.

 वॉर्ड क्र. 5 मध्ये नावगे येथील मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी मतदान केंद्रावर सामसूम होती. 1274 मतदानापैकी 1044 मतदान झाले. जानेवाडी व बामणवाडी क्र. 6 च्या वॉर्डासाठीही नावगे गावातच मतदान झाले. बामणवाडी व जानेवाडी या दोन्ही गावांना सोयीस्कर होण्यासाठी म्हणून नावगे येथे बुथ उभारले होते. येथे 722 पैकी 638 मतदान झाले.

कर्ले गावात  89 टक्के मतदान

किणये ग्रा. पं. च्या वॉर्ड क्र. 7 मधील कर्ले गावातही चुरशीने मतदान झाले. कर्ले गावात 89 टक्के मतदान झाले आहे. एकूण 1131 मतदारांपैकी 1013 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वयोवृद्धांनी मतदानासाठी कार्यकर्ते आणताना दिसत होते. या गावातील लढतही चुरशीची झाली असून मतदान शांततेत व उत्साहात पार पडले.

Related Stories

सोमवारी 232 नवे रुग्ण तर 182 जण झाले बरे

Amit Kulkarni

गांधीगिरी करत बॅरिकेड्स हटविण्यासाठी केले आंदोलन

Patil_p

सिग्नल यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा

Patil_p

बसमधील वाढती गर्दी चिंताजनक

Amit Kulkarni

स्मार्टसिटी योजनेतील रूग्णालयाची इमारत सज्ज

Patil_p

कणबर्गी योजनेचा आराखडा देण्यास टाळाटाळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!