तरुण भारत

रणमदाची उठी उतरली

महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –

सहस्र बाहूंचीं पृथग्विधें । रथीं घालूनि दिव्यायुधें। पांच शत धनुष्यें मौर्वीबद्धें । वाहूनि क्रोधें उठावला। एकेच समयीं सहस्र शर । चक्रधरावरी बाणासुर।  विंधिता झाला परम क्रूर । म्हणे सधीर हो समरिं।दैत्य मायाप्रयोगास्त्रें । कृष्णावरी टाकिती निकरें । तितुकीं छेदिलीं कमलामित्रें । कोण्या प्रकारें तें ऐका ।

Advertisements

बाणासुराने आपल्या हजार हातांमध्ये निरनिराळय़ा प्रकारची शस्त्रे घेतली होती. आता तो अत्यंत क्रोधाने चक्रपाणी भगवंतांवर बाणांचा वर्षाव करू लागला.

अनेक अस्त्रें अनेक शस्त्रें । बाणें प्रेरितां आसुरी मंत्रें । एकेच समयीं कमलामित्रें । छेदिलीं चपें अतितीक्ष्णें ।क्षुरनेमि सहस्रार । प्रळयकाळींचा जेंवि भास्कर । श्रीकृष्णाचे आज्ञानुसार । समरिं तत्पर रसरसिक ।तया सुदर्शनचक्रा हरि । आज्ञा करूनि प्रेरी समरिं । अस्त्रें छेदूनि वरीच्या वरी । बाणशरीरिं संघटलें ।सहस्र शस्त्रें परजूनि बाण । करूं पाहे निवारण । पावकीं पडतां जैसें तृण । गेलीं जळोन तेंवि शस्त्रें ।गरागरां देवोनि भंवती भंवरी । बाणबाहूंचें खंडन करी । भंवते पनळ गळती रुधिरिं। असुर अंतरिं चाकाटला ।चक्रा निवारण न चले कांहीं । बाहु तुटोनि पडती मही । दुजा कैपक्षी समरिं नाहीं । तैं आठवी हृदयीं शिवचरणां ।वनस्पतीच्या जैशा शाखा । छेदितां महीवरी पडती देखा । बाणबाहूंचा तोचि लेखा । पडली मुखा दांतखिळी। आंगीं भयाची धडकी भरली । रणमदाची उठी उतरली । वीरश्रियेची अहंता गेली । पडली भुली शस्त्रास्त्रां । तये समयीं शंकरगौरी । स्मरता झाला अभ्यंतरिं । म्हणे माझी मज वैखरी। ऐसिये परी फळा आली ।बाणें अंतरिं करितां स्मरण । भक्तकारुण्यें कळवळून । द्रवलें शिवाचें अंतःकरण। तें प्रकरण अवधारा ।

बाणासुर आपल्या सहस्त्र बाहूंमध्ये विविध शस्त्रे घेऊन श्रीकृष्णावर आक्रमण करण्यासाठी धावून आला. तेव्हा भगवंताने सुदर्शन चक्राला त्याचे बाहू तोडून टाकण्याची आज्ञा केली. सुदर्शन चक्रावर बाणासुराने अनेक शस्त्रांचा मारा केला. पण आगीत गवत जळून जावे त्याप्रमाणे त्याची सारी शस्त्रे नष्ट झाली. अखेर भगवंताच्या आज्ञेप्रमाणे चार हात सोडून बाणासुराचे इतर सर्व हात सुदर्शनाने कापून टाकले. त्यावेळी बाणासुराचा गर्व नष्ट झाला. आपण गर्वाने भगवान शंकरापाशी भलतेच मागणे केले होते याचे त्याला स्मरण झाले व तो लज्जित झाला. त्याला आता भय वाटू लागले की आपला जीव कोण वाचविल? अखेर आपला जीव वाचविण्यासाठी तो भगवान शंकराचे स्मरण करू लागला. त्याची भगवान शंकराला दया आली व ते त्याच्यासाठी धावून आले.

चक्र खंडित असतां पाणि । शंकरें जाणोनि अंतःकरणीं । भक्तकारुण्यें कळवळूनी । मूर्छना वारूनि उठावला ।सावध होवोनि पाहे निरुतें । तंव सुदर्शन भंवे बाणाभंवतें । बाणबाहूंचीं खंडित शतें । जाणोनि चित्तें कळवळिला ।

ऍड. देवदत्त परुळेकर

Related Stories

स्यमंतकग्रहणीं त्यां अधिकार

Patil_p

भारत 1962 च्या पराभवाचा वचपा काढणार काय?

Patil_p

..तरीही सार्वजनिक रुग्णालयांवर टीकाच

Patil_p

रात्रीत सत्तांतर आणि आघाडीतील बिघाडी!

Patil_p

जगात प्रभावी नेतृत्त्वामध्ये किरण मुजूमदार शॉ

Patil_p

अन्योक्ति…(सुवचने)

Patil_p
error: Content is protected !!