तरुण भारत

भगवद्गीता…एक दीपस्तंभ

 ‘गीता जयंती’ आज मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशीला भारतभर उत्साहाने साजरी केली जात आहे. त्या भगवद्गीतेबद्दल थोडीशी माहिती घेऊ. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या तिन्ही ग्रंथांना वेदांताची ‘प्रस्थाने’ किंवा ‘प्रस्थानत्रयी’ म्हणतात. प्रस्थान म्हणजे उगमस्थान. उपनिषदांचे सार सांगणारी ‘गीता’ ही त्यात दुसरी आहे. व्यासांच्या महाभारत ग्रंथामध्येच भीष्मपर्वातील 25 ते 42 या अध्यायांमध्ये भगवद्गीतेचा समावेश आहे. महाभारताच्या अठरा पर्वांप्रमाणे गीतेचेही 18 अध्याय आहेत.ज्ञानेश्वरांनी महाभारताला 18 पाकळय़ांचे कमळ आणि गीतेला त्यातील पराग म्हटले आहे. महाभारतीय युद्धात होणारा कुलक्षय पाहून अर्जुनाच्या मनात संन्यास घेण्याची इच्छा निर्माण झाली. ती दूर करून त्याला कर्ममार्ग अनुसरण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केला तो म्हणजेच भगवद्गीता होय. धृतराष्ट्राच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव:। मामक: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय।। या श्लोकाने गीतेचा प्रारंभ होतो. अर्थ:-हे संजया, धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र आलेल्या माझ्या आणि पाण्डुच्या पुत्रांनी काय केले? धृतराष्ट्र हा जन्मांध होता. परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू आणि ऐकू शकत आहे. ‘कुरु’ म्हणजे ‘करा’ हा आदेशात्मक शब्द आहे. धर्म हे एक पवित्र क्षेत्र आहे. जेव्हा आपल्या ह्रदयात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो, तेव्हा ते शरीर धर्मक्षेत्र बनते. पण जेव्हा तिथे आसुरी संपत्तीचा प्रभाव पडतो, तेव्हा तेच कुरुक्षेत्र बनते. श्रीकृष्ण म्हणतात इदं शरीरं कौंतेय क्षेत्रमित्यभिधियते। हे अर्जुना, हे शरीर हेच क्षेत्र आहे आणि त्याची मर्यादा जो समजतो तो क्षेत्रज्ञ आहे. कर्मशास्त्र आणि मोक्षशास्त्र सांगणारा गीतेइतका दुसरा रसाळ ग्रंथ नाही. माणसाच्या जीवनातले अनेक संशय सहजगत्या दूर करण्याचे मार्मिक ज्ञान गीता त्याला देते. अर्जुनासारख्या शिष्याच्या कल्याणासाठी प्रवृत्त करणारा श्रीकृष्ण येथे  त्याचा गुरु झाला आहे. त्यासाठी ते म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते या फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोएत्स्त्वकर्मणि।। अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करणे एवढाच आहे. कर्मफलावर नाही. म्हणून तू कर्मफलाचा हेतू मनात ठेवू नकोस. तसेच कर्म न करण्याचाही विचार मनात आणू नकोस. म्हणजेच कर्माबद्दल अश्रद्ध राहू नकोस. अशा प्रकारे महाभारतात अनेक ठिकाणी विखुरलेले हे विचारतंतू गीतेमध्ये कलात्मकतेने एकत्रित केले आहेत. गीतेत कर्मवाद, प्रज्ञावाद आणि ब्रह्मवाद या तिन्हींचे प्रतिबिंब पडलेले दिसते. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात गीताग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी ‘आमच्या धर्मग्रंथातील तेजस्वी व निर्मळ हिरा’ असा श्रीमद् भगवद्गीतेचा गौरव केला आहे!

Related Stories

शिथिल जग!

Patil_p

मराठी माणूस आणि भैय्ये

Patil_p

जातस्य हि धृवो मृत्यु:…….(सुवचने)

Patil_p

देखोनि बाण प्रज्वळला

Patil_p

मिसळ आणि पाव

Patil_p

कृष्णपंक्ती नाहीं उणें

Patil_p
error: Content is protected !!