तरुण भारत

उपचारापेक्षा प्रतिबंध बरा !

आता तरी पुढे हाची उपदेश। नका करू नाश आयुष्याचा।  सकळांच्या पाया माझे दंडवत। आपुलाले चित्त शुद्ध करा।

सध्या, वर्तमानपत्र उघडले किंवा रेडिओ-टी.व्ही.वरच्या बातम्या लावल्या की संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आठवतो. जगातील महत्त्वाच्या घडामोडी सोडून, दु:खद आणि हिंसक बातम्याच कानावर पडतात. हे ऐकल्यावर मनात विचार येतो की विनाशक राक्षसवृत्ती म्हणतात ती हीच का? आणि या सगळय़ा वातावरणाचा माणसाच्या मनावर किती दुष्परिणाम होत असेल? म्हणूनच, हा अभंग पुन्हा एकदा जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांनी जनतेला कळकळून विनंती केली आहे की आता तरी तुमचे मन निर्मळ करा, स्वतःच्या हिताचा विचार करा, तुमचे चित्त एकदम शुद्ध करा, देवाला प्रिय व्हा, म्हणजेच तुमच्या असण्याचा काही उपयोग आहे. या मौल्यवान देहाला गृहीत धरू नका. जगात कितीही समस्या असोत, स्वतःचे मन स्थिर असले की कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य माणूस बाळगतो. पण समाजामध्ये स्वतःला सर्वश्रे÷ ठरवण्याच्या शर्यतीत माणसाचे मन या समस्यांना आपल्या क्षमतेपेक्षा बलवान मानू लागले आहे.

आपल्या शरीराची प्रणाली ही पूर्णतः हृदयावर अवलंबून असते तर आपल्या चैतन्याचे कल्याण हे आपल्या मनावर अवलंबून असते. दीर्घ आयुष्यासाठी हृदयाची चालना निरोगी असणे आवश्यक असते तसेच जीवनाच्या गुणवत्तेला मन स्थिर आणि सकारात्मक असणे गरजेचे असते. आपण आजवर कित्येक उदाहरणे पाहिली आहेत ज्यात माणसाला शारीरिक मर्यादा असूनही केवळ मनाच्या बळावर अशक्मय वाटणाऱया गोष्टी साध्य करून दाखवल्या आहेत. मनुष्याने केवळ आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर यशाला गवसणी घातली आहे. याच अद्वितीय क्षमतेमुळे माणूस आज जगात सर्वात श्रे÷ प्राणी मानला गेला आहे. पण मग माणसाची कीर्ती आणि कर्तृत्व इतके अमर्याद आहे, तर सध्या बातम्यांमध्ये क्रांतिकारक समाचारांबरोबर आत्महत्यांचे प्रमाण वाढताना का दिसत आहे? आणि झपाटय़ाने वाढणाऱया या प्रमाणासाठी आपण काही करायला नको का?

आयुष्यात आर्थिक किंवा सामाजिक अडचण असलेलेच लोक समस्या सोडवायला आत्महत्येचा मार्ग निवडतात असे नाही. 2020 या वर्षाने जागतिक महामारीमुळे झालेल्या मृत्यूने बरोबर कित्येक लोकांचे आत्महत्येने झालेले निधनदेखील अनुभवले आहे. सुशांतसिंग राजपूत, असिफ बसरा, प्रेक्षा मेहता, डॉ. शीतल आमटे, वि जे चित्रा इत्यादी लोकांनी यावषी त्यांचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अकाली मृत्यूला एक जागतिक समस्या न मानता, समाजमाध्यमांनी आपल्या प्रसिद्धीसाठी वापर केला. सत्य बाजूला ठेवून, वेगवेगळय़ा काल्पनिक कथा रचून, जनतेसमोर या गंभीर विषयाचा खेळ मांडला! येथे, मला ‘इत्यादी’ म्हणायला अतिशय दु:ख होते कारण असे कितीतरी लोक असतील ज्यांनी आत्महत्येने आपले अस्तित्व मिटवले असेल पण प्रसिद्ध नसल्यामुळे ते जनतेच्या समोर आले नाहीत. शेतकऱयाची आत्महत्या तर इथे एका गोष्टीची दखल देणे खूप आवश्यक आहे, की या सर्व माणसांनी आत्महत्येमुळे आपले प्राण गमावले नसून, आपले अस्तित्व संपविण्यासाठी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. प्राण गमावणे आणि स्वतःच्या हाताने आपला जीव संपवणे यात खूप फरक आहे. मानव जीवन प्राप्त होणे हे कित्येक जन्मांच्या संचिताचे फळ मानले गेले आहे आणि त्याचे महत्त्व अनमोल असते. अशा या अनमोल आशीर्वादाला ओझे मानून आयुष्य संपण्याचा निर्णय कोणी घेत असेल तर ते खूप चिंताजनक आहे. माणूस आयुष्यात तेव्हा हताश होतो जेव्हा त्याला असे वाटते की त्याच्या अस्तित्वाची या जगात किंमत नाही आहे.  मानव जीवनात जितकी ऊर्जा आहे तितकीच वेदना, यातना आणि दु:ख आहे. किंबहुना, या सर्व भावना मनुष्य अनुभवू शकतो म्हणून आज तो इतरांपासून प्रति÷ित आहे. एखाद्या व्यक्तीने आपले आयुष्य अकाली संपवल्यानंतर त्याचे समर्थन करणे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी गत होते. तीच सहानुभूती आणि आपलेपणा, हा जर माणूस आपल्यात असताना त्याला मिळाली असती, तर आज कदाचित त्याला समस्यांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले असते. पण, माणूस जिवंत असताना  जितके त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे गैर आहे, तितकेच स्वतःच्या आयुष्याला जगण्यातील अवास्तव अपेक्षांपेक्षा कमकुवत मानून आयुष्यच संपवणेदेखील गैर आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर माणूस एवढा गर्व बाळगू लागला आहे की तो विसरू लागला आहे की निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा नियम आणि तंत्र हे पैसे, प्रति÷ा आणि भरभराट नसून ‘सहजीवन’ आहे. निसर्गातील पशु-पक्ष्यांबरोबर एकसमान राहताना माणूस आपल्याच माणसांना एकसमान वागणूक द्यायचे विसरला आहे.

 त्या दिग्गज कलाकारांनी आत्महत्येचा मार्ग का निवडला, त्यांच्या आयुष्यात खरंच काही अडचण होती का, ते आयुष्यापुढे हताश झाले होते, हे आपण सिद्ध करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे असलेल्या प्रसिद्धी आणि पैशांमुळे त्यांनी अनुभवलेल्या वेदना पोकळ आहेत असेही नाही. माणसाने इतरांना स्वतःच्या नजरेतून पारखण्याऐवजी, सहानुभूतीने एकमेकांच्या समस्या एकत्र येऊन सोडवणे गरजेचे आहे. ‘जे पेराल ते उगवेल’ हा वाक्प्रचार  लक्षात घेऊन आपल्या मनामध्ये देखील उच्च, सकारात्मक आणि गुणात्मक साहित्य पेरले पाहिजे. मनाला ‘रीबूट’ करून त्यात सकारात्मकता आणि ध्येय रुजवले पाहिजे. मानसिक आजाराशी लढत असलेल्या माणसांना व्यक्त होण्यासाठी काहीतरी स्रोत पाहिजे. त्यांची भावना समजून घेण्याचा प्रयास जर त्यांच्या आजूबाजूच्या माणसांनी केला, तर त्रासात असलेल्या त्या माणसालादेखील आपले मन मोकळे करायला हक्काचे स्थान मिळेल. धरण क्षमतेपेक्षा जास्त भरले की त्याचे दरवाजे उघडावे लागतात, नाहीतर धरणफुटी होते. तशीच काहीशी गत आपल्या मनाची असते. मानसिक आजार हा तितकाच घातक आहे, जितका शारीरिक आजार. आणि म्हणूनच मानसिक आजाराला कुरवाळत न बसता, परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर मात केली पाहिजे. 

एन प्रँकचे एक फार सुंदर वाक्मय आहे, ‘मृत लोकांना जिवंत असणाऱया लोकांपेक्षा जास्त फुलं मिळतात, कारण पश्चात्ताप हा कृतज्ञतेपेक्षा अधिक ताकदवान असतो.’ त्यामुळे, जे गेले त्यांना श्रद्धांजली वाहून येत्या पिढीच्या योग्य पालनपोषणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण उपचारापेक्षा प्रतिबंध बरा!

 – श्राव्या माधव कुलकर्णी

Related Stories

पक्षांतरे ! फेरविचार हाच उपाय!

Patil_p

दानं दारिद्रय़स्य…..(सुवचने)

Patil_p

श्रीपादभाऊंचा अपघात… विजयावहिनींचे जाणे धक्कादायक

Patil_p

अर्थसंकल्प: मोदी सरकार बचावात्मक

Patil_p

लस संशोधन: यत्न परोपरी साधन तैसे

Patil_p

कोरोनाच्या लढय़ात अखंड सावधपणच कामी येणार

Patil_p
error: Content is protected !!