तरुण भारत

खानापुरातील कार्यालयात निवडणुकीनंतर शुकशुकाट

ग्राम पंचायत निवडणुकीतील उमेदवारांसह सरकारी कर्मचाऱयांनी विश्रांती घेणे केले पसंत

प्रतिनिधी / खानापूर

Advertisements

खानापूर तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱयांची निवडणूक यंत्रणा हाताळण्यासाठी एकच धावपळ सुरू होती. तहसीलदारांसह कार्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी, पोलीस यंत्रणा निवडणूक शांततेने पार पाडावी, निवडणुकीसंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या दृष्टीने धावपळ करत होती. तर सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हा पंचायत अभियांत्रिकी विभाग, समाज कल्याण खाते, पशू वैद्यकीय खाते, पाटबंधारे खाते तसेच इतर खात्यातील प्रमुख अधिकाऱयांची ग्राम पंचायतीचे निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे ते सर्व प्रमुख अधिकारी निवडणुकीची प्रक्रिया हाताळण्यासाठी संबंधित पंचायत कार्यालयात हजर रहात होते. यामुळे तहसीलदार कार्यालयासह तालुक्यातील इतर प्रमुख कार्यालयांचा कारभारही ग्राम पंचायत निवडणुकीमुळे ठप्प झाला होता. तर आता निवडणूक झाल्यावर गेले दोन दिवस तहसीलदार कार्यालयासह इतर सरकारी कार्यालयातही सामसूम वातावरण होते. याला वेगवेगळी कारणे कारणीभूत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने निवडणुकीनंतर ग्रामीण भागातील नागरिकांनीही दोन दिवस विश्रांती घेणे पसंत केल्याने नेहमी गर्दीने गजबजलेल्या तहसीलदार कार्यालय परिसरात शुकशुकाट पसरला होता.

प्रचारासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांना दिवस-रात्र काम करावे लागले. त्यामुळे आठ दिवसांपासून झोप विसरुन प्रचारात गुंतलेल्या उमेदवारांनी निवडणुकीनंतर नि:श्वास सोडला. मतांची आकडेमोड करत जय पराजयाची गणिते मांडली जात आहेत. टक्कर असलेल्या ठिकाणी पैजांचे डाव रंगत आहेत. गावागावात कट्टय़ावर निकालाची चर्चा रंगत असल्याने खानापूरकडे येणाऱयांची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱया बसमधील प्रवाशांची संख्याही रोडावली आहे.

ग्राम पंचायत निवडणुकीत बहुतांश सर्वच कार्यालयातील कर्मचाऱयांना जुंपण्यात आले होते. मतदानानंतर जबाबदारींचे मोठे ओझे कमी झाल्याने तहसीलदार कार्यालयासह अन्य विभागातील कर्मचाऱयांनी दोन दिवस सुट्टी घेऊन विश्रांती घेणे पसंत केले. शुक्रवारी नाताळची सुट्टी झाली. त्यानंतर चौथ्या शनिवारची सुट्टी त्या पाठोपाठ रविवारची आठवडी सुट्टी अशा सलग सुट्टय़ांमुळे अनेक जण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रवासाचे नियोजन करत आहेत. त्यामुळे सर्वच सरकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे.

Related Stories

डीएनए तपासणीसाठी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर

Amit Kulkarni

बेकिनकेरे गावालगतचा तलाव धोकादायक स्थितीत

Patil_p

हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांचे जि. पं. अधिकाऱयांना निवेदन

Amit Kulkarni

मच्छे ग्राम पंचायतीमध्ये 15 लाखाची अफरातफर

Patil_p

कुद्रेमनी येथे म. ए. समितीला चार जागा

Omkar B

काहेरतर्फे पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!