तरुण भारत

लग्न समारंभात दागिन्यांची बॅग पळविली

पाच मिनिटात भामटय़ाने पळविले साडेतीन लाखांचे दागिने

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

भावाच्या लग्न समारंभासाठी बेळगावात आलेल्या चिकोडी येथील एका कुटुंबातील महिलेच्या हातातील दागिन्यांची बॅग पळविण्यात आली आहे. शनिवारी रात्री 8.15 ते 8.20 या केवळ पाच मिनिटांत भामटय़ाने साडेतीन लाख रुपयांचे दागिने पळविले आहेत. किल्ला तलावाजवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.

बसवेश्वरनगर चिकोडी येथील सोमशेखर श्रीगुरू हिरेमठ यांनी रविवारी सकाळी यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दागिन्यांची बॅग पळविणाऱया भामटय़ाने मास्क परिधान केला होता. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

सोमशेखर यांच्या भावाचे रविवारी लग्न होते. त्यासाठी हे सर्व कुटुंबीय शनिवारी सायंकाळी बेळगावात आले. खासगी हॉटेलमध्ये लगीनघाई सुरू असताना सोमशेखर यांनी 3 लाख 48 हजार रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग आपल्या आइंच्या हातात दिली होती. सुमारे 9 तोळे दागिन्यांची बॅग घेऊन ही महिला एका ठिकाणी बसली होती. त्यावेळी मास्क परिधान केलेल्या भामटय़ाने महिलेला गाठले.

‘मावशी, सगळेजण फोटो काढून घेत आहेत. तुम्हालाही फोटो काढून घेण्यासाठी बोलावताहेत’, असे भामटय़ाने सांगताच दागिने असलेली बॅग तेथेच ठेवून ही महिला समारंभ सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचली. हीच संधी साधून भामटय़ाने दागिन्यांची बॅग पळविली आहे. भामटय़ाची करामत सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related Stories

कंग्राळी खुर्द-बेळगाव रस्ताकाम अर्धवट स्थितीत

Patil_p

क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा राष्ट्रीय स्तरावरील महान योद्धा

Omkar B

चोरीप्रकरणी तरुणाला अटक

Amit Kulkarni

कडोलीत शेडला आग लागून अडीच लाखाचे नुकसान

Patil_p

यरनाळ येथे उद्या शांतीस्तंभाचे लोकार्पण

Patil_p

नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला घवघवीत यश

Patil_p
error: Content is protected !!