तरुण भारत

जांबोटीतील फोटोग्राफरचा भीषण खून

केवळ दहा हजार रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून केला खून

खानापूर / वार्ताहर

Advertisements

गेल्या 25 डिसेंबर रोजी बेपत्ता झालेल्या जांबोटी-रामापूर पेठ येथील रहिवासी व प्रसिद्ध फोटोग्राफर विजय चंद्रकांत अवलक्की (वय 52) यांचे अपहरण करून यांचा भीषण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित आरोपांनी विजय अवलक्की यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात पुरल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. जांबोटी बाजारपेठेनजीक विजय अवलक्की यांचा  फोटो स्टुडिओ आहे. त्यांचे दि. 25 रोजी अपहरण करण्यात आल्याची तक्रार खानापूर पोलीस स्थानकात दाखल झाली होती.

विजय अवलक्की यांची मुलगी कुमारी वैदयी विजय अवलक्की (वय 19) हिने खानापूर पोलीस स्थानकात आपले वडील विजय अवलक्की यांचे अपहरण करुन त्यांचा खून करण्यात आल्याची तक्रार संशयितांवर दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, प्रारंभी सदर आरोपांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर प्रकरणाचा पर्दाफाश झाला. विजय अवलक्की हे नेहमीप्रमाणे स्टुडिओत काम करत असताना शुक्रवारी सायंकाळी 7:30 च्या दरम्यान या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी रामचंद्र बाबुराव कांबळे (वय 21,. रा. जांबोटी-राजवाडा), याच्या सांगण्यावरून त्याचा मित्र नारायण ज्ञानेश्वर मेंढीलकर (वय 20, रा. कालमणी) याने केवळ दहा हजार रुपयाच्या खंडणीसाठी स्टुडिओमधून विजयला एका दोन वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो काढायचे आहेत, असे खोटे सांगून हब्बनहट्टी क्रॉसजवळील जांबोटी रस्त्यावर असलेल्या एका धाब्यावर बोलावून नेले होते.  त्या ठिकाणी रामचंद्र कांबळे व अन्य चौघांनी एका  व्हॅनमधून विजयला चिखले जंगलात आणून त्याचा चाकूने भीषण खून केला. त्यानंतर विजयच्या शरीराचे दोन तुकडे केले. धड एकीकडे तर मुंडके एकीकडे पुरले व पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर विजय सोबत असलेला कॅमेरा जंगलातील एका झुडुपात टाकण्यात आला. पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी संशयितांना ताब्यात घेऊन रविवारी दिवसभर तपास केला. 

 यासंदर्भात अधिक माहिती अशी की, रामचंद्र कांबळे हा विजय अवलक्की यांच्या स्टुडिओमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून साहाय्यक म्हणून काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी गैरवर्तणूकमुळे त्याला विजय यांनी कामावरून कमी केले होते. याच रागातून रामचंद्र कांबळे यांने आपल्या काही मित्रांना सुपारी देऊन विजयचा काटा काढण्यासाठी कट रचला व दि. 25 रोजी सायंकाळी नारायण मेंढीलकर याच्या साथीने अन्य तीन मित्रांचे सहकार्य घेऊन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चाकूचे सपासप वार करून अवलक्की याचा भीषण खून केला असल्याचे उघडकीस आले आहे.

सदर घटनेचा तपास खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी हाती घेतला असून या प्रकरणात असलेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान रविवारी दुपारी प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मृतदेह पुरलेल्या ठिकाणी जाऊन मृतदेह उकरून काढून पंचनामा केला. सदर मृतदेह बेळगाव बिम्समध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनैतिक संबंधातून खूनाचा संशय?

तपासाअंती मिळालेल्या माहितीनुसार फोटोग्राफर विजय अवलक्की हा एक प्रामाणिक फोटोग्राफर म्हणून परिचित होता. विजय अवलक्की यांच्या दुकानात काही वर्षांपासून साहाय्यक म्हणून काम करणारा रामचंद्र कांबळे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन अनेकवेळा त्यांच्यात खटकेही उडाले होते. यामुळे विजयने रामचंद्र कांबळे याला कामावरून दोन महिन्यांपूर्वी कमी केले होते. त्यामुळे कांबळे यांने विजयचाच काटा काढल्याची चर्चा जांबोटी परिसरात होत आहे.

विजयने विश्वास ठेवला अन् घात झाला

विजय अवलक्की व रामचंद्र कांबळे यांच्यात वाद होता. यातूनच रामचंद्रने  गेल्या दोन महिन्यांपासून विजयविरोधात षडयंत्र रचले होते.  सुपारी घेतलेला नारायण मेंढीलकर याच्यावर विजयने विश्वास ठेवला अन् वाढदिवसाचे फोटो काढण्यासाठी मिळालेली ऑफर का सोडावी, म्हणून तो त्याच्याबरोबर गेला. मात्र तेथेच विजयचा घात झाला. नारायण मेंढीलकर यांने केवळ दहा हजार रुपयांच्या खंडणीसाठी हे षड्यंत्र रचले. यामध्ये प्रमुख संशयित आरोपी रामचंद्र कांबळेसह दुसरा आरोपी नारायण मेंढीलकर या दोघांसह अन्य तिघांचा या प्रकरणामध्ये समावेश आहे. यापैकी आणखी एकजण कुसमळी येथील व अन्य दोघेजण कालमणी येथील युवक असून ते तिघेही अल्पवयीन असल्याचे समजते. पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Related Stories

फादर जेकब करव्हालो यांचे निधन

Patil_p

बेळगाव जिल्हयातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

स्वर मल्हारतर्फे बहारदार गायन

Patil_p

कणबर्गीतील छकडी गाडीमार्ग खुला करण्याची मागणी

Amit Kulkarni

कारवार बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

बेळगावच्या उत्तर भागातही चुरशीने मतदान

Amit Kulkarni
error: Content is protected !!