तरुण भारत

दक्षिण आफ्रिकेचा लंकेवर डावाने विजय

लंकेचा दुसऱया डावात 180 धावांत फडशा, परेरा, हसरंगाची अर्धशतके

वृत्तसंस्था/ सेंच्युरियन

Advertisements

वेगवान गोलंदाज वियान मुल्डर आणि लुथो सिपम्ला यांनी भेदक गोलंदाजी केल्याने दक्षिण आफ्रिकेने येथे झालेल्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशी लंकेवर एक डाव 45 धावांनी दणदणीत विजय मिळवित मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. शतकवीर (199) फॅफ डु प्लेसिसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

लंकेने पहिल्या डावात 396 धावा जमविल्यानंतर द.आफ्रिकेने 621 धावांचा डोंगर उभा करीत लंकेवर पहिल्या डावात 225 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर लंकेचा दुसरा डाव 180 धावांत गुंडाळून द.आफ्रिकेने मोठा विजय साजरा केला. 2 बाद 65 या धावसंख्येवरून लंकेने दुसरा डाव पुढे चालू केला. सीम गोलंदाजांना अनुकूल असणाऱया खेळपट्टीवर सलामीवीर कुसल परेराने अर्धशतकी (64) खेळी केली. पण तो बाद झाल्यानंतर डावाचा पराभव टाळण्याच्या लंकेच्या आशा संपुष्टात आल्या. लंकेला या सामन्यात जखमी खेळाडूंच्या समस्येचा फटका बसला. याशिवाय मध्यफळीतील फलंदाज धनंजया डिसिल्वाशिवाय त्यांना या डावात खेळावे लागले. मायेशात त्यांची इंग्लंडविरुद्ध 14 जानेवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार असल्याने त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

पहिल्या डावात लंकेने चारेशच्या जवळपास मजल मारीत चांगले प्रदर्शन केले होते. पण द.आफ्रिकेला त्यांनी सहाशेहून अधिक धावा जमविण्याची संधी दिल्याने दुसऱया डावात त्यांच्यावर दडपण आले. मुल्डर व सिपम्ला यांचा भेदक मारा आणि एन्गिडी व नॉर्त्जे यांच्याकडून त्यांना मिळालेली पूरक साथ यामुळे लंकेचा दुसरा डाव गडगडला. कुशल परेरा व वनिंदू हसरंगा (53 चेंडूत 12 चौकार, 1 षटकारासह 59) या दोघांनीच या माऱयाचा थोडाफार प्रतिकार केला. या दोघांव्यतिरिक्त दिनेश चंडिमल (25) व निरोशन डिक्वेला (10) यांनाच फक्त दुहेरी धावसंख्या गाठता आली. आयसीसीकडून षटकांची गती न राखल्याबद्दल होणारी दंडात्मक कारवाई टाळण्याच्या हेतूने उपाहारानंतर द.आफ्रिकेने मार्करम व केशव महाराज यांचा फिरकी मारा सुरू केला. त्याचा लाभ घेत पदार्पणवीर अष्टपैलू हसरंगाने आक्रमक फटकेबाजी करून पहिले कसोटी अर्धशतक केवळ 46 चेंडूत नोंदवले. तो 59 धावांवर बाद झाल्यानंतर 46.1 षटकांत त्यांचा दुसरा डाव 180 धावांत आटोपला. मुल्डर, सिपम्ला, एन्गिडी, नॉर्त्जे या चौघांनीही प्रत्येकी 2 बळी मिळविले. या दोन संघांतील दुसरी कसोटी जोहान्सबर्ग येथे 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : लंका प.डाव 396, द.आफ्रिका प.डाव 621 (डु प्लेसिस 199, बव्हुमा 71, केशव महाराज 73, अवांतर 44, हसरंगा 4-171, विश्वा फर्नांडो 3-129, शनाका 2-98), लंका दु.डाव 46.1 षटकांत सर्व बाद 180 : करुणारत्ने 6, कुशल परेरा 64 (87 चेंडूत 10 चौकार), कुशल मेंडिस 0, चंडिमल 25 (45 चेंडूत 4 चौकार), डिक्वेला 10 (15 चेंडूत 2 चौकार), दसुन शनाका 6, हसरंगा 59 (53 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), विश्वा फर्नांडो 0, कसुन रजिथा 0, कुमारा नाबाद 0, अवांतर 10. गोलंदाजी : एन्गिडी 2-38, नॉर्त्जे 2-47, मुल्डर 2-39, सिपम्ला 2-24, केशव महाराज 0-20, मार्करम 0-6.

Related Stories

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी जेमीसन न्यूझीलंड संघात

tarunbharat

पाकच्या सना मिरचे अभिनंदन

Patil_p

दोन्ही व्यवस्थापनात सुसंवाद आहे का?

Patil_p

भारतीय पुरुष, महिला संघाच्या हार्ड क्वारंटाईनला सुरुवात

Patil_p

पाच फुटबॉल क्लब्सना परवाना मिळविण्यात अपयश

Patil_p

लारा, स्टीन सनरायजर्सच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये

Amit Kulkarni
error: Content is protected !!