तरुण भारत

सिंधूला सोपा ड्रॉ, सायनासाठी कठीण वहिवाट

नवी दिल्ली : ऑलिम्पिक रौप्यजेती पीव्ही सिंधूला थायलंडमधील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी सोपा ड्रॉ तर सायना नेहवालला मात्र कठीण ड्रॉ मिळाला आहे. कोरोनामुळे तब्बल 10 महिन्यांच्या मोठय़ा ब्रेकनंतर सिंधू व सायना एकत्रितपणे एखाद्या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

सिंधू व सायना यांनी यापूर्वी डेन्मार्क ओपन सुपर 750 व सारलोर्लक्स सुपर 100 या दोन स्पर्धात भाग घेतला नव्हता. मार्चमध्ये ऑल इंग्लंड ओपन स्पर्धा संपन्न झाल्यानंतर उर्वरित कॅलेंडरमध्ये या दोनच स्पर्धा होऊ शकल्या. आता प्रदीर्घ कालावधीनंतर योनेक्स थायलंड ओपन (12 ते 17 जानेवारी) व टोयोटा थायलंड ओपन (19 ते 24 जानेवारी) या दोन सुपर 1000 इव्हेंट्सचे आयोजन केले गेले आहे.

सहावी मानांकित वर्ल्ड चॅम्पियन सिंधूची सलामीची लढत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डविरुद्ध होईल तर कोव्हिड-19 मधून अलीकडेच सावरलेल्या सायना नेहवालची लढत जपानची तिसरी मानांकित नोझोमी ओकुहाराविरुद्ध होईल. त्यानंतर पुढील स्पर्धेत सिंधू सलामीच्या लढतीत थायलंडच्या बुसाननविरुद्ध खेळणार
आहे.

सिंधू टोकियो ऑलिम्पिकसाठी यापूर्वीच पात्र ठरली असून मागील दोन महिन्यांपासून ती लंडनमध्ये सराव करत आहे. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यजेती सायना थायलंडची स्टार खेळाडू रॅचनोकविरुद्ध खेळेल. 25 वर्षीय सिंधूला या दोन्ही स्पर्धांकरिता सहावे मानांकन लाभले असून विश्व बॅडमिंटन संघटनेने मंगळवारी उशिरा हे ड्रॉ जाहीर केले आहे.

पुरुष एकेरीत 7 भारतीय रिंगणात असतील. यात जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित किदाम्बी श्रीकांत, ऑलिम्पिकसाठी पात्र बी. साई प्रणित, लक्ष्य सेन दोन्ही गटात खेळणार आहेत. ऑक्टोबरमध्ये डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेल्या श्रीकांतची लढत राष्ट्रीय सहकारी सौरभ वर्माविरुद्ध होईल. याचवेळी लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या जेम्केविरुद्ध होणार आहे. प्रणित स्थानिक खेळाडू कॅन्टॉफोनविरुद्ध नशीब आजमावणार आहे. एचएस प्रणॉय मलेशियाच्या आठव्या मानांकित ली जी जियाविरुद्ध तर माजी राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यपची लढत जपानच्या केन्टा निशिमोटोविरुद्ध आणि समीर वर्माची लढत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्ताविटोविरुद्ध होणार आहे.

दुसऱया स्पर्धेत श्रीकांतची लढत सिट्टिकोम थम्मासिनविरुद्ध प्रणीतची लढत मलेशियाच्या डॅरेन ल्यूविरुद्ध होणार आहे. मात्र लक्ष्य सेनला कठीण ड्रॉ मिळाला असून त्याची सलामीची लढत चिनी तैपेईच्या द्वितीय मानांकित चौ तिएन चेनविरुद्ध होणार आहे. अन्य सामन्यात कश्यपचा मुकाबला गेम्केविरुद्ध होईल तर एचएस प्रणॉय सहावा मानांकित आशियाई स्पर्धा चॅम्पियन जोनातन ख्रिस्तिविरुद्ध लढेल. समीर व सौरभ हे आठव्या मानांकित झी जिया व अँथोनी सिनिसुका गिंतिंगविरुद्ध लढतील. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली सात्विकराज रणकिरणरेड्डी व चिराग शेट्टी ही जोडी कोरियाच्या किम जंग व ली योंग डे यांच्याविरुद्ध लढेल.

थायलंडमध्ये अलीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून देशात काही चळवळीही सुरु आहेत. पण, यानंतरही नियोजित स्पर्धा तेथे निर्धोकपणे होतील, असा विश्वास विश्व बॅडमिंटन संघटनेने व्यक्त केला आहे. या स्पर्धांमध्ये चीनचे बॅडमिंटनपटू मात्र सहभागी होणार नाहीत. या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे त्यांनी विश्व संघटनेला यापूर्वीच कळवले आहे.

Related Stories

यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा लांबणीवर

Patil_p

जलतरणपटूंना दिल्लीत हलविण्याचा निर्णय

Patil_p

ओकिफ प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

इशांत शर्माला गुडघ्याची दुखापत

Patil_p

‘या’ क्रिकेटपटूच्या घरात झाला गॅस सिलेंडरचा स्फोट

prashant_c

सचिनची स्पार्तनशी न्यायालयाबाहेर तडजोड

Patil_p
error: Content is protected !!