तरुण भारत

बेळगाव-पणजी महामार्गाचे काम शेतकऱयांनी बंद पाडले

प्रतिनिधी/   खानापूर

बेळगाव-पणजी महामार्ग रुंदीकरणाच्या कामात बेजबाबदार अधिकारी व महामार्ग प्राधिकरणामुळे शेतकऱयांची नुकसानभरपाई वेळेवर दिली जात नाही. तसेच नुकसानभरपाई संदर्भात दुजाभाव निर्माण केला असून दाम करी काम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नुकसानभरपाई देण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाचीही पूर्तता होत नसल्याने हलकर्णी, खानापूर येथील संतप्त शेतकऱयांनी  शुक्रवारी महामार्गातील खानापूर बायपास रस्त्याचे काम बंद पाडले आहे. यासाठी आता शेतकरी वर्ग दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनाप्रमाणेच बायपास रस्त्यावर सर्व साहित्यासह ठाम मांडून बसला आहे.

Advertisements

बेळगाव-पणजी महामार्गात खानापूर शहराला बायपास रस्ता केला आहे. या बायपास रस्त्यासाठी हलकर्णी, हत्तरगुंजी खानापूर, करंबळ येथील पिकाऊ शेत जमीन संपादित करण्यात आली आहे. पण जमीन संपादित केलेल्या बहुसंख्य शेतकऱयांना अद्याप नुकसानभरपाई देखील देण्यात आली नाही. तसेच काही शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्यात आली तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता नाही. एका शेतकऱयाला एक न्याय तर दुसऱया शेतकऱयाला एक न्याय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच याआधी अनेकवेळा प्राथमिक नुकसानभरपाई शेतकऱयांच्या खात्याला जमा करण्याचे आश्वासन दिले. पण त्या आश्वासनाची पूर्तताही केली नाही. यामुळे जमीन संपादित झालेल्या शेतकरी वर्गात  नाराजी निर्माण झाली आहे. अधिकाऱयांची वाट पाहून अखेर शुक्रवारपासून आपल्यावर झालेला अन्याय दूर व्हावा या मागणीसाठी शेतकरी वर्ग आता रस्त्यावर उतरला आहे. जोपर्यंत संबंधित अधिकारी येऊन नुकसानभरपाई संदर्भात ठोस कृती करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला आहे. हलकर्णीमधील शेतकऱयांनी हलकर्णी हद्दीत तर खानापूरमधील शेतकऱयांनी खानापूर हद्दीत रस्त्याचे काम बंद पाडवले आहे.

या संदर्भात आता शेतकऱयांनी अधिकाऱयांना देण्यासाठी एक निवेदनही तयार केले आहे. त्यामध्ये जमीन संपादित झालेल्या शेतकऱयांना 2013 च्या नव्या कायद्यानुसार नुकसानभरपाई दिली जावी, या बायपासमध्ये करंबळ हद्दीतील सर्व्हे नं. 45 मधील जमीन मालकांना 7 लाख 20 हजार रुपये गुंठा असा दर दिला आहे.

 शेतकऱयांना 22 हजार रुपये गुंठा

खानापूर हद्दीतील शेतकऱयांना 22 हजार रुपये गुंठा व काही शेतकऱयांना 1 लाख 30 हजार रुपये गुंठा असा दर देऊन शेतकरी वर्गावर मोठा अन्याय केला आहे. तो दूर करावा तसेच करंबळ हद्दीतील सर्व्हे नं. 45 मधील शेतकऱयांना कोणत्या निकर्षावर गुंठय़ाला 7 लाख 20 हजार रुपये इतका दर दिला आहे, त्याची सर्विस्तर कागदपत्रासह शेतकऱयांना माहिती द्यावी. तसेच हलकर्णी व खानापूर हद्दीतील जमीन कमर्शियल असल्याने तसेच एनएसाठी योग्य असल्याने गुंठय़ाला 15 लाख रुपये इतक नुकसानभरपाई मंजूर करावी. तसेच प्राथमिक नुकसानभरपाई तातडीने शेतकऱयांच्या खात्यावर जमा करावी. या संदर्भात लवादाकडे शेतकऱयांना अपील करण्यासाठी कुठल्या शेतकऱयाची नेमकी किती जमीन गेले. याची लेखी स्वरुपात विना विलंब माहिती द्यावी, अशी सदर निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे.

या आधीसुद्धा हलकर्णी खानापूरमधील शेतकऱयांनी याच मागणीसाठी महामार्गाचे काम रोखून धरले होते. त्यावेळी अधिकाऱयांनी येऊन दररोज पाच ते सहा शेतकऱयांची प्राथमिक नुकसानभरपाई संबंधित शेतकऱयांच्या खात्यावर जमा करून तसेच वाढीव नुकसानभरपाईसाठी शेतकऱयांना लवादाकडे अपील करण्यासाठी सर्व प्रकारची कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते. पण त्या आश्वासनांची संबंधित अधिकाऱयांकडून कोणत्याहीप्रकारे पूर्तता न झाल्याने अखेर शेतकऱयांना यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महामार्गाच्या विकासाला शेतकऱयांचा कोणत्याही प्रकारे विरोध नाही. पण जमिनीला योग्य नुकसानभरपाई आणि ती देखील कमीत कमी वेळेत मिळावी, एवढीच शेतकऱयांची मागणी आहे. यासाठी प्रशासनाने थेट विशेष अधिकाऱयाची नेमणूक करून ठराविक मुदतीत शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्याचे ठोस लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलनातून माघार न घेण्याचा निर्धार आता शेतकरी वर्गाने घेतला आहे.

वास्तविक यामध्ये प्रशासकीय अधिकाऱयांचा गेंधळ कारणीभूत ठरत आहे. कारण सर्व शेतकऱयांना एकच निकष लावून सर्वांना समान नुकसानभरपाई दिली. तर रस्त्याच्या कामात कोणतीच अडचण येणार नाही. पण याकडे स्थानिक खासदार व आमदारांचेही साफ दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Related Stories

दुपारी बारापर्यंत रस्ते खुले करा

Amit Kulkarni

प्रभूनगर येथे भरदुपारी 9 लाखाची चोरी

Patil_p

जमखंडीत उद्यापासून दुपारनंतर सर्व व्यवहार बंद

Patil_p

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार

Amit Kulkarni

अनगोळ येथे चिखलाचे साम्राज्य

Amit Kulkarni

सीमालढय़ातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!