तरुण भारत

अंडी उबवणी केंद्राचा ‘रत्नकांत’ प्रयोग

शारजाहतून परतल्यानंतर देतोय ‘आत्मनिर्भरते’चे धडे

वाडोसच्या तरुणाचा आदर्श अनुकरणीय

Advertisements

जिल्हय़ातील तरुणांनी कुक्कुट पालनाकडे वळावे!

महेंद्र पराडकर / (वाडोस, ता. कुडाळ):

 हल्ली सुदृढ आरोग्याच्यादृष्टीने संतुलित आहारास खूप महत्व प्राप्त झाले आहे. मोजकाच पण सकस अन् संतुलित आहार आपल्याला माफक दरात कसा मिळेल, याचा विचार अनेकांच्या मनात नेहमीच घोळत असतो. ज्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडते, अशा लोकांचा सेंद्रीय पद्धतीने पिकविलेले धान्य, भाजीपाला आणि फळांकडे नेहमीच कल राहिलेला आहे. चिकनच्या बाबतीत सांगायचे तर गावठी कोंबडय़ांमध्ये लोकांना विशेष रस असतो. पण खिशाला परवडत नाही म्हणून गावठी चिकनची भूक बऱयाचदा ब्रॉयलरवर भागवावी लागते. परंतु कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील रत्नकांत तातू चव्हाण या 39 वर्षीय तरुणासारखे अजून 50 तरुण जर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात उभे राहिले, तर आपण भविष्यात माफक दरातील गावठी कोंबडय़ांची गरज नक्की भागवू शकू, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

 गेल्या काही वर्षात ‘अंडय़ांचा गाव’ अशी वाडोस गावाची जिल्हय़ात ओळख निर्माण झाली आहे. या गावात दर चार घरामागे एक पोल्ट्री फार्म असल्याचे सांगितले जाते. माणगाव खोरे पट्टा वुक्कुटपालनासाठी खूप प्रसिद्ध आहे. हा पट्टा मोठय़ा प्रमाणात जिल्हय़ातील चिकनची गरज पूर्ण करतो. निसर्गरम्य वाडोस गावात रत्नकांत चव्हाण या तरुणाने कुक्कुट पालनात पुढचे अन् दिशादर्शक पाऊल टाकले आहे. बारावीपर्यंत व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयटीआयमध्ये इलेक्ट्रिक विषयात पदवीधर असलेला हा तरुण 2011 मध्ये नोकरीनिमित्त शारजाहला गेला होता. तेथे सहा वर्षे त्याने नोकरी केली. त्यानंतर तो पुन्हा गावात परतला अन् गावातच रमला. आपल्या मातीतच आपण बरेच काही करू शकतो हे त्याने जाणले. शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. तांदूळ हे त्यांचे प्रमुख उत्पादन. आपल्या जागेत त्याने केळी, काजू आदींची लागवडही केल<ाr आहे. आपल्या कुटुंबाला पुरेल इतके धान्य, चवळी व नाचणीसारखी कडधान्ये, काही प्रमाणात भाजीपाला आणि काही फळे तो पिकवतो. त्यामुळे इतर किराणा मालासाठी त्याला किरकोळ खर्च येतो. शिवाय सेंद्रीय उत्पादनांवर आधारित सकस आहार आपणास मिळतो, याचा अभिमान तो बाळगतो. आहाराच्या दृष्टीने स्वत: स्वयंपूर्ण असताना गावठी कोंबडी पालनाचा त्याचा घरगुती व्यवसायही सुरू होता. परंतु गावठी कोंबडी पालन व्यवसायात आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्यादृष्टीने काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा त्याचा विचार होता.

 अंडी उबवणाऱया केंद्रासंदर्भात मालवण तालुक्यातील किर्लोस कृषी विज्ञान केंद्रामार्फत ओरोस कृषी विद्यालयात दिल्या जाणाऱया प्रशिक्षणात त्याने लॉकडाऊनपूर्वी सहभाग दर्शविला. एक महिन्याचे प्रशिक्षण त्याने पूर्ण केले. व्यावसायिकदृष्टय़ा विचार करता, तो अडचणीतही सापडला होता. व्यवसाय उभा करायचा म्हणजे मोठय़ा प्रमाणात भांडवल पाहिजे. सर्व सोगं घेता येतात परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. अशा स्थितीत झाराप येथील भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांची रत्नकांतला मोठी मदत झाली. अंडी उबवणी केंद्र प्रकल्प सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेकडून 1 लाख 68 हजाराचे कर्ज मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवाय याचदरम्यान भगिरथ प्रतिष्ठानला मिळालेल्या 1 लाख रुपयांच्या पुरस्काराची रक्कम (बिनव्याजी) रत्नकांतला देण्यात आली. अंडी उबवणी केंद्र उभारणीत या साऱयाची भरीव मदत झाली.

8 रुपयांच्या अंडय़ाचे 21 दिवसांत 25 रुपये

 गावठी कोंबडय़ा आणि त्यातील सुधारित प्रजातींच्या व्यवसायात आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने रत्नकांतची सध्या आश्वासक वाटचाल सुरू झाली आहे. त्याने इलेक्ट्रिकमध्ये आयटीआय केल्याने मशीनची खरेदी, सोलार व इनव्हर्टर जोडणी या साऱया कामात त्याला शिक्षणाचा चांगला उपयोग झाला. याकामी कुडाळ येथील तुषार कुडाळकर व प्रदीप परब यांची चांगली साथ त्याला मिळाली. अंडी उबवणी केंद्रासाठी आठ रुपयाने तो गावातून अंडी खरेदी करतो. 21 दिवसानंतर या आठ रुपयांचे 25 रुपये होतात. अस्सल गावठी कोंबडय़ाचे एक पिल्लू 28 रुपये, सुधारित गावठी प्रजातीचे पिल्लू 25 रुपये, कडकनाथचे पिल्लू 35 रुपयाने, तर बदकाचे पिल्लू 50 ते 55 रुपयाने मशीन उबवते.

दरमहा 4800 अंडी उबवणारे जिल्हय़ातील पहिलेच मशीन

 नव्याने घेतलेल्या मशीनच्या माध्यमातून दर आठवडय़ाला तो 1200 अंडी उबवू शकतो. म्हणजेच दरमहा 4800 अंडी उबवण्याची क्षमता त्या मशीनची आहे. यंदाच्या दिवाळीनंतर आतापर्यंत त्याने तीनवेळा अंडी उबवून घेतली आहेत. मात्र, मशीनच्या क्षमतेनुसार गावातील शेतकऱयांकडून 1200 अंडय़ांची गरज पूर्ण होत नाही. बाराशेऐवजी सातशे ते आठशे अंडी दर आठवडय़ाला प्राप्त होतात. त्यामुळे मागच्या तीन आठवडय़ात साधारणत: 2100 च्या आसपास अंडी उबविण्यात आल्याचे रत्नकांत सांगतो. अंडय़ांची मागणी पूर्ण व्हावी म्हणून भगिरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून 50 टक्के अनुदानातून 25 महिलांना कावेरी जातीच्या प्रत्येकी दहा मादी व एक नर देण्यात आला आहे. एक-दीड महिन्यांनंतर या उपक्रमातून पुरेशी अंडी मिळतील, असा विश्वास त्याला वाटतो.

सामाजिक कार्यासाठी कुठे जायला नको!

 रत्नकांत सांगतो, सामाजिक कार्य करायला आज मला अन्यत्र कुठेही जायला नको. आपण इथल्या इथे सामाजिक कार्य करू शकतो हे अंडी उबवणी केंद्राद्वारे सिद्ध झाले आहे. आज अंडी उबवणी केंद्रामुळे 25 महिलांना कुक्कुट पालनातून रोजगार प्राप्त झाला आहे. याचे समाधान मला वाटते. अंडी उबवणी केंद्राच्या ठिकाणी आपण पिल्लांसाठी आरोग्यविषयक विशेष काळजी घेतो. त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. पिल्ले खरेदी करणाऱयांकडून चांगले अभिप्राय येतात. ओरोस, वेंगुर्ले, कुडाळ, पिंगुळी येथून मला ऑर्डर मिळाल्या आहेत. गोवा, दापोली, मंडणगढ येथूनही मागणी आहे. परंतु, पिल्ले घरपोच करण्याची व्यवस्था आपल्याकडे नसल्याचे त्याने सांगितले.

 जि. प. मतदारसंघनिहाय एक मशीन उभे राहिले तर…

 सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. दरवर्षी आठ लाखापेक्षा जास्त पर्यटक जिल्हय़ात येतात. विविध माशांवर ताव मारण्याबरोबरच येथील गावठी कोंबडय़ांवर ताव मारण्याचा त्यांचा विशेष बेत असतो. आम्हाला इथल्या वातावरणात वाढलेल्या गावठी कोंबडीचा रस्सा अधिक आवडेल, अशी मागणी असणाऱया पर्यटकांची संख्या काही कमी नाही. पर्यटकांचेच कशाला सर्वसामान्यांनाही गावठी कोंबडीचा रस्सा प्यारा आहे. पण परवडत नाही म्हणून आपण गावठीची भूक ब्रॉयलरवर भागवतो. परंतु रत्नकांतप्रमाणे जिल्हय़ातील 50 जि. प. मतदारसंघात किमान एक गावठी अंडी उबवणारे केंद्र सुरू झाले, तर भविष्यात गावठी कोंबडय़ांचा पुरवठा वाढून त्यांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातही येऊ शकते. त्यादृष्टीने स्थानिकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचा विचार पुढे येत आहे. रत्नकांतने सुरू केलेला हा अंडी उबवणी केंद्राचा जिल्हय़ातील बहुधा पहिलाच प्रकल्प असावा.

Related Stories

रत्नागिरी समुद्रकिनारी सापडला मृत डॉल्फिन

Patil_p

‘कोरोना’साठी पुन्हा कठोर निर्बंध

NIKHIL_N

कोट येथे 26 वर्षीय तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

सागरी अतिक्रमणापासून पर्यटनस्थळे वाचवणार

NIKHIL_N

रत्नागिरी आवृत्तीचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन आज साधेपणाने

Patil_p

झिपलाईन प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल!

NIKHIL_N
error: Content is protected !!