तरुण भारत

गटबाजी असली तरी यावेळी मडगावातून भाजपचाच विजय

प्रतिनिधी/ मडगाव

दिगंबर कामत यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मडगाव मतदारसंघातून भाजपला आपला उमेदवार निवडून आणणे आजवर शक्य झालेले नाही. त्याला मुख्य कारण ठरलेय ते मडगाव मतदारसंघात भाजपमध्ये असलेली गटबाजी. मडगावात भाजपचे दोन-तीन गट आहेत. भाजप एकसंघ नाही. त्यामुळे मडगाव मतदारसंघातून दिगंबर कामत हे सहज विजयी झालेले आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत गटबाजी असली तरी मडगावातून भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Advertisements

मडगाव, फातोर्डा व नावेली मतदारसंघात कालपासून भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे सुरू झाली आहेत. या शिबिरांना मार्गदर्शन करण्यासाठी काल मुख्यमंत्री मडगावात आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मडगाव मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी यावेळी भाजपची काही वेगळी रणनीती आहे का ? असा सवाल प्रसार माध्यमांनी उपस्थित केला असता. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत मडगावातून भाजपचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला. मडगावात भाजपचे दोन-तीन गट असल्याचे प्रसार माध्यमांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, गटबाजी असली तरी यावेळी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन पुन्हा एकदा मडगावमध्ये भाजपला विजय मिळवून देतील.

2022च्या विधानसभेची तयारी सुरू

भाजपने 2022 मध्ये होणाऱया विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. सध्या 40 मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेतली जात असून कालपर्यंत एकूण 20 मतदारसंघातील प्रशिक्षण शिबिरे पूर्ण झाली आहेत. आज रविवारी आणखीन आठ मतदारसंघातील प्रशिक्षण शिबिरे पूर्ण होतील. प्रशिक्षण शिबिरासाठी सासष्टीतील काही मतदारसंघ एकमेकांत सामावून घेतलेले आहेत.

सासष्टीसाठी वेगळी रणनीती आखण्याची जरूरी नाही. भाजपची काम करण्याची एक पद्धत आहे. त्यानुसारच आम्ही काम करणार आहोत. सासष्टीतील लोक हे काही वेगळे लोक नाही. ते सुद्धा आमचे गोंयेकारच आहेत. आमचे बंधू-भगिनी आहेत. त्यांना सुद्धा मुख्यमंत्री व सरकार काय करते हे कळून आलेले आहे. सरकार करीत असलेले काम हे लोकोउपयोगी काम आहे. आपण जे गेल्या 20-22 महिन्यांत जे काही केलेय. ते सर्वजण बघत आहे. त्यामुळेचे कोणतीच वेगळी रणनीती करण्याची गरज नाही. सरकारचे काम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

एसओपीचे उल्लंघन नाही

31 डिसेंबर व 1 जानेवारी या दोन दिवसांसाठी केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात विशेष मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) घालून दिली होती. पण, गोव्यात त्याचे व्यवस्थितीत पालन झालेच नाही असे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने जी एसओपी घालून दिली होती, तिचे गोव्यात पालन करण्यात आलेले आहे व कुठेच उल्लंघन झालेले नाही.

पालिका निवडणुकीतही विजय मिळवू

ज्या पद्धतीने भाजपने जिल्हा पंचायतीत विजय मिळविला आहे. त्याच पद्धतीने आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजप विजय मिळविणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 12 नगरपालिकांची निवडणूक होणार असून त्याची तयारी सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

प्रो.फुटबॉल : पिछाडीवरून स्पोर्टिंग क्लुबची धेंपोशी बरोबरी

Amit Kulkarni

कोरोनाविषयी नवीन ‘एसओपी’ आजपासून

Omkar B

मुरगाव पालिकेसाठी भाजप उमेदवार जाहीर

Patil_p

धारबांदोडा, सावर्डे भाजपाने जिंकले

Patil_p

स्वयंपूर्ण गोव्यासाठी भाजपला साथ द्या

Amit Kulkarni

राजधानीत अवतरणार चंदेरी नगरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!