तरुण भारत

वर्दी रिक्षाचालकांवर भाजी विक्रीची वेळ

कोरोनामुळे व्यवसाय झाला ठप्प : सुरू होण्याची चिन्हेही धूसर

सुशांत कुरंगी/ बेळगाव

Advertisements

कोरोना आला आणि तो बरंच काही हिरावून घेऊन गेला. कोणाच्या जवळची व्यक्ती गेली तर काहींच्या नोकऱया, जगण्याचे मार्ग बदलले. मागील 30 वर्षांपासून मुलांना शाळेत सोडण्याची वर्दी घेणारे रिक्षाचालक टिळकवाडी येथील राजू भवानी यांचाही व्यवसाय लॉकडाऊनपासून बंद आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे तो पुन्हा केव्हा सुरू होईल याची शाश्वती नसल्याने रिक्षामधून तर कधी कॉर्नरवर बसून त्यांनी भाजी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. भाजी विक्रीतून घराचा उदरनिर्वाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

बेळगावमध्ये अनेक रिक्षाचालक वर्षानुवर्षे वर्दी व्यवसाय करीत आहेत. मुलांना वेळच्या वेळी शाळेला सोडणे व आणणे हे त्यांचे काम. परंतु मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रवासी भाडे करायचे म्हटल्यास प्रवाशीच नसल्याने दिवसातून एक किंवा दोन भाडी मिळत आहेत. त्यामुळे अनेकांनी रिक्षा विकून इतर व्यवसाय सुरू केले तर अनेक जण गवंडी कामाकडे वळले आहेत.

भाजी विक्रीतून घर चालविण्याची वेळ

राजू यांनी लॉकडाऊनमध्ये पहिला महिना घरीच बसून काढला. त्यानंतर काहीतरी व्यवसाय करावाच लागणार या हेतून भाजी विक्री करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी रिक्षामधून आंबे विक्री केले. त्यानंतर जवळ उपलब्ध होणारी भाजी विक्री करण्यास सुरुवात केली. टिळकवाडी, मंडोळी रोड परिसरात ते सध्या भाजीची विक्री करीत आहेत. भाजी विक्रीतून घर चालत असले तरी रिक्षाचे हप्ते भरायचे कसे? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

कोणाचीही मदत नाहीच

रिक्षा बंद असल्याने लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी साहित्य, अन्नधान्याचे वाटप केले. परंतु राजू यांच्यापर्यंत मदत देण्यासाठी कोणी पोहचलेच नाहीत. रिक्षावाल्यांना 5 हजार रुपये देणार असे सरकारने जाहीर केले होते. कागदी घोडे नाचवूनही त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली. त्यामुळेच कुणाचीही मदत न घेता त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

व्यवसाय सुरू होण्याची चिन्हे धूसर

शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी वर्दी व्यवसाय सुरू होईल की नाही, हा प्रश्न आहे. काही पालक रिक्षाचालकांशी संपर्क साधत आहेत. परंतु मुलांच्या संख्येची मर्यादा घालत असल्याने व्यवसाय परवडणे शक्मय नाही. त्यामुळे जोवर व्यवसाय सुरळीत सुरू होत नाही तोवर भाजी विक्री हाच पर्याय असल्याचे राजू यांनी सांगितले. 

अनेक विद्यार्थी परदेशात

मंगळवार पेठ, टिळकवाडी येथे राहणारे राजू यादव भवानी हे 1990 पासून रिक्षावर्दी करतात. 1997 मध्ये त्यांनी एक रिक्षा घेऊन हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊही हा व्यवसाय करायचा. त्यांच्या सायकल व रिक्षातून शाळेला गेलेले शेकडो विद्यार्थी आज देशाबरोबरच परदेशातही पोहचले आहेत. ते त्यांना भेटायलाही येतात, असे ते आवर्जून सांगतात.

त्या काळी सायकलवरून केली जायची वर्दी

1990 च्या दशकात सायकलवरून मुलांना शाळेत सोडण्याचे काम ते करीत होते. चन्नम्मानगर, गुरुप्रसाद कॉलनी, टिळकवाडी या भागात ते काम करीत असत. सायकलला समोर व मागे फळी बसविण्यात आली होती. त्यावर समोर 2 तर मागे 3 मुलांना बसवून त्यांना शाळेपर्यंत सोडले जात असल्याची आठवण त्यांनी सांगितली. 

Related Stories

सिंह घराघरात पोहचला, आता मतदानपेटीपर्यंत पोहचवा

Omkar B

खासगी रुग्णालयातही कोरोनावर मोफत उपचार

Omkar B

10 हजारहून अधिक बसपास विद्यार्थ्यांच्या हातात

Amit Kulkarni

यापुढे हमालीही व्यापाऱयांनाच द्यावी लागणार

Amit Kulkarni

मर्कंटाईल सोसायटीच्या चेअरमनपदी संजय मोरे तर व्हाईस चेअरमन रमेश ओझा

triratna

रविवारपेठेतील व्यापाऱयांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

Patil_p
error: Content is protected !!