तरुण भारत

जांबोटीतील फोटोग्राफरच्या खुनातील आरोपींना फाशी द्या

कणकुंबी / वार्ताहर

जांबोटी-रामापूरपेठ येथील फोटोग्राफरचा अत्यंत क्रूर आणि निर्दयीपणे खून करणाऱया जांबोटी भागातील स्थानिक संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जांबोटी-रामापूरपेठ येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत उपस्थित नागरिकांनी केली.

जांबोटी-रामापूरपेठ येथील फोटोग्राफर विजय चंद्रकांत अवलक्की (वय 52) यांचे अपहरण करून खून करणाऱया जांबोटी-कालमणी आणि कुसमळी येथील पाचही आरोपींचा बैठकीत निषेध करून जांबोटी भागाला काळिमा फासणाऱया या घटनेमुळे परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एक सभ्य आणि प्रामाणिक फोटोग्राफर असलेल्या विजय अवलक्कींचा दि. 25 डिसेंबर रोजी रात्री अत्यंत क्रूर आणि निर्घृणपणे खून करण्यात आला. त्यांचा गळा चिरून शीर धडावेगळे करून मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱया जांबोटी-राजवाडा येथील प्रमुख संशयित आरोपी रामचंद्र बाबुराव कांबळे (वय 21) तसेच नारायण ज्ञानेश्वर मेंडीलकर (वय 20, रा. कालमणी) व अन्य तीन अल्पवयीन युवकांपैकी कुसमळी येथील एक तर कालमणीचे दोन अशा एकूण पाचही आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबूल केल्याने त्या सर्व संशयित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच न्यायालयात वकीलपत्र आणि जामीनही दिले जाऊ नयेत, अशी एकमुखी मागणी या भागातील उपस्थित प्रमुख नागरिक आणि पंच कमिटीच्या झालेल्या बैठकीत करण्यात आली.

जांबोटीची ओळख बदलत चालली

जांबोटी-कणकुंबी हा भाग अत्यंत शांत व सुरक्षित समजला जात होता. परंतु अलीकडच्या काळात वाढत्या गुन्हेगारी घटना आणि गैरकृत्ये पाहता जांबोटीची ओळख बदलत चालली आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचे कृत्य कधीही घडले नव्हते. कारण सुपारी घेऊन खून करणं हे केवळ मोठय़ा शहरात घडत होतं. परंतु आता जांबोटीसारख्या खेडय़ामध्ये सुपारी घेऊन खून करण्यात येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, तहसीलदारांना निवेदन देणार

घटनेचा तीव्र निषेध करून जांबोटी भागातील नागरिकांतर्फे बेळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस आयुक्त, बेळगाव न्यायालय, खानापूर तहसीलदार, पोलीस निरीक्षक व इतर विविध अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जांबोटी-राजवाडा, कालमणी व कुसमळी ग्रामस्थांनी आपापल्या गावात बैठका घेऊन निवेदने तयार करण्यात यावीत व त्यानंतर जांबोटी भागाच्यावतीने वरि÷ांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात यावी, असे ठरविण्यात आले.

गुन्हेगारी-गैरप्रकार वाढत असल्याचा आरोप

खानापूर पोलीस स्थानकाच्या कक्षेत येणाऱया जांबोटी आऊटपोस्ट पोलीस स्टेशनमध्ये जवळपास चाळीस गावांचा समावेश असून या 40 गावांसाठी केवळ दोन पोलीस कार्यरत आहेत. या भागातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि गैरप्रकारांचा विचार केला तर पोलीस संख्या वाढविणे गरजेचे असून जांबोटी आऊटपोस्ट स्टेशनमध्ये एक एएसआय, एक हवालदार आणि तीन पोलीस अशा पाच जागा मंजूर आहेत. परंतु केवळ दोन पोलिसांवर संपूर्ण 40 खेडय़ांची जबाबदारी असल्याने गुन्हेगारी आणि इतर गैरप्रकार वाढत असल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे. बेळगाव, चोर्ला, पणजी या राज्य महामार्गावर रात्रीच्यावेळी गस्त घालून गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्याचे ठरले. गेल्या दोन दिवसांपूर्वी चोर्लानजीक एका युवतीचा मृतदेह टाकण्यात आला होता. चार महिन्यांपूर्वी रायबाग येथील युवतीला कणकुंबीच्या जंगलात खून करून पुरण्यात आले होते. खून, मारामारी, याबरोबरच गांजा व इतर तस्करींचे प्रकार वारंवार घडत असतानासुद्धा पोलीस प्रशासन म्हणावे तसे लक्ष देत नाही, असा आरोप करून यावर वेळीच उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बेळगाव किंवा इतर भागातून काही तरुण-तरुणी दंगामस्ती, मौजमजा व इतर गैरप्रकार करण्यासाठी जांबोटी-कणकुंबी भागामध्ये विशेषतः सुटीच्या दिवशी बहुसंखेने येतात. त्याला आवर घातला जावा. जांबोटी भागात भीतीचे वातावरणात तयार होत असल्याने शांतताप्रिय भागाची ओळख बदलत आहे. पोलीस प्रशासन या बाबतीत कमी पडत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी मांडल्या.

बैठकीला जांबोटी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, तालुका पंचायतीच्या माजी सदस्या व भाजपा नेत्या धनश्री सरदेसाई, ग्राम पंचायतीचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब कुडतुरकर, प्रति÷ित नागरिक मनोहर डांगे, गणपती कोटीभास्कर, सुदेश कुडतुरकर, दर्शन नाईक, मंजुनाथ मुतगी, मोहम्मदअली डंबलकर, राजन कुडतुरकर, मारुती पेडणेकर, दत्ता डांगे, मनोहर गोवेकर, विठोबा नाईक, संतोष शिंदे व पंच कमिटी कुसमळी येथील गुंडुराव पाटील, चंद्रकांत पाटील, अनंत सावंत, पवन गायकवाड, दीपक पाटील, ग्रामस्थ, पंचमंडळी आणि इतर गावांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख संशयित आरोपींची हिंडलगा कारागृहात रवानगी

विजय अवलक्कींच्या खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी रामचंद्र बाबुराव कांबळे आणि नारायण ज्ञानेश्वर मेंडीलकर यांना खानापूर पोलिसांनी हिंडलगा कारागृहात पाठविले. या प्रकरणातील अल्पवयीन तीन युवकांना बालसुधार कारागृहात पाठविले आहे. या प्रकरणाची तपासणी खानापूर पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी चालवली असून अजूनही काही धागेदोरे हाती लागण्याची शक्मयता आहे. जांबोटी भागातील युवक आणि अल्पवयीन युवकांनी अशाप्रकारे खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी योजना आखली होती. परंतु सदर प्रकरणाचा चोवीस तासांच्या आत तपास लागला.

अनैतिक संबंधातून खून

तपासाअंती मिळालेल्या माहितीनुसार फोटोग्राफर विजय अवलक्कांचा खून हा अनैतिक संबंधातूनच झाला आहे, अशी जोरदार चर्चा असून अवलक्कींच्या फोटो स्टुडिओत कामाला असलेल्या रामचंद्र बाबुराव कांबळे याचे तेथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात अनेक वेळा खटकेही उडत होते. आपल्याशी विश्वासघात केलेल्या रामचंद्रला विजयने दोन महिन्यांपूर्वीच कामावरून कमी केले होते. त्यामुळे रामचंद्र याने अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या विजयचा आपल्या मित्रांच्या साहाय्याने काटा काढला. सध्या जांबोटी भागात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून त्या महिलेला जांबोटी-रामापूरपेठ गावातून हाकलून लावण्यात येणार आहे, असे समजते. या प्रकरणातील संशयित आरोपींना शिक्षेनंतर संबंधित गावांमध्ये प्रवेश नाकारण्याचा निर्णय जांबोटी-राजवाडा, कालमणी आणि कुसमळी ग्रामस्थांनी घेतला आहे. येत्या चार-आठ दिवसांत जांबोटी भागातील सर्व नागरिकांच्यावतीने निवेदन देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

परप्रांतीयांना सोडण्यासाठी बसेस सज्ज

Patil_p

संस्कारक्षम शिक्षणामुळे ध्येयनिश्चिती

Patil_p

‘उन्नती गृहलक्ष्मी’चे 8 रोजी आयोजन

Patil_p

कर्नाटक मंडळाने शालेय अभ्यासक्रमात केली ३० टक्के कपात

Shankar_P

वीज दरवाढीसाठी पुन्हा हालचाली सुरू

Patil_p

मण्णूर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांत तीव्र संताप

Patil_p
error: Content is protected !!