तरुण भारत

श्रीलंकेचा 157 धावांत खुर्दा, नॉर्त्जेचे 6 बळी

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

रविवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला पहिल्या डावात 157 धावांत गुंडाळले. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 1 बाद 36 धावा जमविल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्त्जेने 56 धावांत 6 गडी बाद केले.

Advertisements

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नॉर्त्जेने लंकेला दहाव्या षटकांत पहिला धक्का देताना कर्णधार करूणारत्नेला 2 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर कुशल परेरा आणि थिरिमने यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना दुसऱया गडय़ासाठी 52 धावांची भागिदारी केली. लंकेची एकवेळ स्थिती 2 बाद 71 अशी होती पण त्यानंतर त्यांचा डाव कोलमडला. त्यांचे शेवटचे आठ गडी 86 धावांत तंबूत परतले. लंकेतर्फे कुशल परेराने एकाकी लढत देत 67 चेंडूत 11 चौकारांसह 60 धावा जमविल्या. थिरिमनेने 3 चौकारांसह 17, डिसिल्वाने 5 चौकारांसह 29 आणि चमाराने 4 चौकारांसह 22 धावा केल्या. लंकेच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्त्जेने 56 धावांत 6, मुल्डेरने 25 धावांत 3 गडी बाद केले. या सामन्यात लंकेतर्फे भानुका आणि फर्नांडो यांनी कसोटीत पदार्पण केले. दुखापतीमुळे लकमलला वगळण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात सावध सुरूवात करताना चहापानापर्यंत बिनबाद 22 धावा जमविल्या होत्या. चहापानानंतर खेळाला सुरूवात झाली आणि फर्नांडोने दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज मार्करमला 5 धावांवर झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेने 10 षटकांत 1 बाद 36 धावा जमविल्या होत्या. एल्गार 5 चौकारांसह 27 धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव- 40.3 षटकांत सर्व बाद 157 (कुशल परेरा 60, डिसिल्वा 29, चमारा 22, थिरिमने 17, नॉर्त्जे 6-56, मुल्डर 3-25, सिपम्ला 1-27), दक्षिण आफ्रिका प. डाव 10 षटकांत 1 बाद 36 (मार्करम 5, एल्गार खेळत आहे 27, ए फर्नांडो 1-13).

Related Stories

इंग्लिश संघात दोन नवे चेहरे

Patil_p

आनंद गगनात माझ्या मावेना..मावेना!

Patil_p

स्विटोलिना, बर्टन्स यांची अमेरिकन टेनिस स्पर्धेतून माघार

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

इंग्लिश कौंटी स्पर्धेसाठी दोन विदेशी खेळाडूंना परवानगी

Patil_p

इंग्लंडच्या रूटचे 19 वे कसोटी शतक

Patil_p
error: Content is protected !!