मणिपूर-नागालँड सीमेवर आग
इम्फाळ
मणिपूर-नागालँड सीमेवरील दजुको भागातील जंगलामध्ये लागलेली आग विझविण्याचे काम 6 व्या दिवशीही सुरूच आहे. भारतीय वायुदल तसेच एनडीआरएफचे पथक संयुक्तपणे येथील वणवा शमविण्यासाठी कार्यरत आहे. या मोहिमेत 100 हून अधिक एनडीआरएफ जवान आणि वायुदलाची अनेक हेलिकॉप्टर्स सामील आहेत. एक आठवडय़ापासून सुरू असलेल्या मदतकार्यादरम्यान दीमापूर आणि रंगापहारमध्ये वायुदलाची 4 हेलिकॉप्टर्स तैनात आहेत. एम-17 हेलिकॉप्टर्स अणि वायुदलाच्या सी-130 विमानांद्वारे आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सनी आतापर्यंत 12 उड्डाणांद्वारे सुमारे 24 हजार लिटर पाण्याचा मारा करत जंगलामधील आग विझविण्याचा प्रयत्न केला आहे.