तरुण भारत

निघाले अंटार्क्टिकावर पुन्हा तिरंगा फडकवण्या

प्रतिनिधी/ वास्को

चाळीसाव्या भारतीय अंटार्क्टिका सागरी संशोधन मोहिमेला आज मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. अंटार्क्टिका संशोधकांची ही चाळीसावी तुकडी मुरगाव बंदरातून रवाना होणार असून कोरोना काळातील सद्यस्थितीचा सामना करीत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी 48 वैज्ञानिकांची तुकडी सज्ज झालेली आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदाच्या मोहिमेला विशेष महत्व आले आहे.

Advertisements

भारतीय अंटार्क्टिका संशोधकांची पहिली तुकडी 1981 साली संशोधनासाठी अंटार्क्टिका रवाना झाली होती. मागच्या चाळीस वर्षातील विविध मोहिमांमध्ये भरीव संशोधन भारतीय वैज्ञानिकांनी केले आहे. दक्षिण गंगोत्रीसह मैत्री व भारती अशी केंद्रे भारताने अंटार्क्टिकावर स्थापन केलेली आहेत. गेली चार दशके भारतीय वैज्ञानिकांनी अंटार्क्टिका खंडावर भारतीय ध्वज दिमाखाने फडकत ठेवण्याचे कार्य केलेले आहे.

मुरगाव बंदरातून आज होणार रवाना

मागच्या अंटार्क्टिका संशोधन मोहिमेत जवळपास शंभर वैज्ञानिक सहभागी झाले होते. मात्र, यंदा कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांमुळे ही संख्या निम्म्याने घटवली गेली आहे. यंदा 48 वैज्ञानिकांची तुकडी संशोधनासाठी रवाना होणार आहे. 43 संशोधकांची तुकडी पीपीई किट परिधान करून वासोली गोलोवीन या रशियन जहाजावर स्वार झालेली आहे. हे जहाज बर्फ कापून प्रवास करणारे आहे. आज मुरगाव बंदरात त्यांना निरोप देण्यात येईल.

भारती, मैत्री केंद्रापर्यंतची असणार मोहीम

अन्य पाच भारतीय संशोधकांची तुकडी केपटाऊन दक्षिण आफ्रिका येथे या 43 संशोधकांच्या तुकडीत सहभागी होईल व तेथून 48 संशोधकांचे हे पथक अंटार्क्टिकाच्या पुढच्या प्रवासाला निघेल. अंटार्क्टिकावरील मैत्री केंद्रापर्यंतचा प्रवास चाळीस दिवसांचा असेल. तत्पूर्वी भारती केंद्रावर 15 दिवसांचा थांबा असेल. पूर्वी अंटार्क्टिका संशोधकांचा गोव्यातून केपटाऊनपर्यंतचा प्रवास हवाईमार्गे असायचा. यंदा कोरोनामुळे सागरीमार्ग निवडण्यात आलेला आहे.

मोहिमेला प्रथमच वापरणार पूर्ण स्वदेशी इंधन

कोरोना संसर्गाने निर्माण केलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व तेवढीच पूर्ण सुरक्षेची काळजी घेत चाळीसावी अंटार्क्टिका संशोधन मोहीम होणार आहे. त्यामुळे यंदाची ही संशोधन मोहीम आणखी वैशिष्टय़पूर्ण ठरलेली आहे. यंदाच्या मोहिमेचे दुसरे वैशिष्ठ म्हणजे 23 वर्षांनंतर प्रथमच या मोहिमेला देशी इंधन कंपनीकडून इंधन पुरवठा होणार आहे. या मोहिमेसाठी लागणारे इंधन खरेदीसाठी अंटार्क्टिका सागरी संशोधन केंद्राने भारतीय तेल महामंडळाकडे व्यवहार केलेला आहे. यापूर्वी इंधन खरेदी विदेशातून होत होती.

भारतीय तेल महामंडळाकडून संशोधकांचे स्वागत

मुरगाव बंदरात सोमवारी दुपारी 40 व्या अंटार्क्टिका सागरी संशोधन मोहिमेनिमित्त भारतीय तेल महामंडळाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय संशोधकांचे मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले. एमपीटीचे अध्यक्ष ई. रमेशकुमार, राष्ट्रीय अंटार्क्टिका व सागरी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. रविचंद्रन, संचालक जावेद बेग, भारतीय तेल महामंडळाचे संचालक गुरमीत सिंग, टपाल खात्याचे गोवा विभाग सरव्यवस्थापक डॉ. एन. विनोदकुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.

एमपीटी, गोव्यासाठी एक अभिमानाचा क्षण : रमेशकुमार

एमपीटीचे अध्यक्ष ई. रमेशकुमार यांनी यावेळी बोलताना अंटार्क्टिका संशोधकांचे स्वागत करून अंटार्क्टिका संशोधकांचा हा एक महान प्रवास असल्याचे वर्णन केले. मुरगाव बंदरातून हे संशोधक अंटार्क्टिकाकडे कुच करणार असल्याने मुरगाव बंदर आणि गोव्यालाही हा एक गर्वाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. संशोधकांच्या मोहिमेचे व त्यांच्या धैर्याचे त्यांनी कौतुक केले.

दीर्घकाळाच्या आपत्तीसाठी, बदलांसाठी संशोधन महत्वाचे : रविचंद्रन

डॉ. एम. रविचंद्रन यांनी यावेळी बोलताना राष्ट्रीय अंटार्क्टिका सागरी संशोधन मोहिमांबद्दल माहिती दिली. अंटार्क्टिका संशोधनामागील उद्देश व हे संशोधन का गरजेचे आहे याविषयी माहिती देताना ते म्हणाले की, आज कोरोना संसर्गाने जगात आपत्ती निर्माण केलेली असली तरी ही आपत्ती तात्पुरत्या काळासाठी आहे. मात्र, जागतिक हवामान बदलाचे परिणाम दीर्घकाळासाठीची आपत्ती ठरणार आहे. त्यामुळेच हवामान बदलाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अंटार्क्टिकावर हे संशोधन करण्यात येते. त्यामुळे भविष्यातील बदलांची जाणीव होते. त्या ठिकाणी जीव शास्त्राचाही अभ्यास करण्यात येतो असे सांगून त्यांनी अंटार्क्टिका मोहिमांबाबत व तेथील संशोधन कार्याबाबत माहिती दिली. भारतीय तेल महामंडळाचे संचालक गुरमीत सिंग यांनी तेल महामंडळाच्या इंधन पुरवठा क्षेत्रातील कामगीरीची माहिती दिली. अंटार्क्टिका संशोधन मोहिमेसाठीही महामंडळाकडून पुरवठा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमात भारतीय अंटार्क्टिका मोहिमांच्या इतिहासावर आधारित टपाल तिकीट व टपाल आवरणांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. टपाल खात्याचे सरव्यवस्थापक डॉ. एन. विनोदकुमार यांनीही अंटार्क्टिका संशोधन मोहिमांबाबत आपले विचार व्यक्त केले.

प्रारंभी अमिताभ अकोर्डी यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अंटार्क्टिका संशोधकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

Related Stories

मोले चेकनाक्यावरुन होणारी वाहतूक बंद करा

Patil_p

गोव्याच्या इथॅन वाझला फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत चौथे स्थान

Patil_p

कोरोनातून उभारी घेत सैन्य दलात भरतीसाठी तरूणांचा दांडगा उत्साह

Amit Kulkarni

जीसीए आपल्या प्रत्येक संलग्नित क्लबांना देणार 1 लाखाचे अनुदान

Amit Kulkarni

फोंडा नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास नोटीस

Amit Kulkarni

आयुर्वेदाला भोंदू म्हणणे देशदोही कृत्य – श्रीपाद नाईक

Patil_p
error: Content is protected !!