तरुण भारत

केन विल्यम्सनचे चौथे द्विशतक

निकोल्ससमवेत  त्रिशतकी भागीदारी, न्यूझीलंडला 362 धावांची आघाडी

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

Advertisements

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत मिळालेले अग्रस्थान सार्थ ठरवणाऱया केन विल्यम्सनचे शानदार द्विशतक, त्याने हेन्री निकोल्ससमवेत केलेली त्रिशतकी भागीदारी आणि निकोल्स व डॅरील मिशेलने झळकवलेले नाबाद शतक यांच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी पाकवर 362 धावांची भक्कम आघाडी घेतली. पहिला डाव 6 बाद 659 धावांवर घोषित केल्यानंतर पाकने दिवसअखेर 1 बाद 8 धावा जमविल्या होत्या. या सामन्यावेळी पावसाचा दोनदा व्यत्यय आला होता.

विल्यन्सनने 9 तास 33 मिनिटांच्या मॅरेथॉन खेळीत 238 धावा जमविताना 28 चौकार नोंदवले. त्याला आजही 177 धावसंख्येवर जीवदान मिळाले. 3 बाद 286 या धावसंख्येवरून तिसऱया दिवसाच्या खेळास सुरुवात केली आणि विल्यम्सनने चौथे द्विशतक पूर्ण केल्यानंतर चहापानाच्या आधी तो बाद झाला तेव्हा निकोल्समवेत 369 धावांची भागीदारी केली होती. न्यूझीलंतर्फे नोंदवण्यात आलेली ही तिसऱया क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे. त्याआधी निकोल्स वैयक्तिक 157 धावांवर बाद झाला. त्याने 291 चेंडूत 18 चौकार, 1 षटकार मारला. त्यानंतर मिशेलनेही जेमीसनसमवेत सातव्या गडय़ासाठी 74 धावांची अभेद्य भागीदारी केली. मिशेलचे पहिले कसोटी शतक पूर्ण झाल्यानंतर विल्यम्सनने 6 बाद 659 धावांवर डाव घोषित केला. मिशेलने 112 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार ठोकत नाबाद 102 धावा फटकावल्या. जेमीसन 22 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 30 धावांवर नाबाद राहिला. विशेष म्हणजे अवांतराच्या रूपात न्यूझीलंडला 64 धावांचा बोनस मिळाला. त्यानंतर दिवसअखेर पाकने दुसऱया डावात 11 षटकांत 1 बाद 8 धावा जमविल्या असून डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप 354 धावांची गरज आहे. पावसाचा व्यत्यय न आल्यास न्यूझीलंडला ही कसोटी जिंकण्याची पूर्ण संधी असून विजय मिळाल्यास ते कसोटी क्रमवारीत अग्रस्थानावर पोहोचतील आणि विश्व कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याची त्यांची आशाही जिवंत राहील.

विल्यम्सनच्या जलद 7000 धावा

विल्यम्सनने या सामन्यात चौथे द्विशतक नोंदवून त्याचाच माजी सहकारी बेन्डॉन मेकॉलमच्या चार द्विशतकांशी बरोबरी केली. त्याने निकोल्समवेत चौथ्या गडय़ासाठी  369 धावांची विक्रमी भागीदारी नोंदवली. न्यूझीलंडतर्फे नोंदवलेली ही तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. आज त्याने आक्रमक फटकेबाजी करीत 68 पैकी 48 धावा चौकारांत नोंदवल्या. याआधी 2015 मध्ये लंकेविरुद्ध त्याने वॅटलिंगसमवेत 365 धावांची भागीदारी नोंदवली होती. अँड्रय़ू जोन्स व मार्टिन क्रो यांनी 1991 मध्ये लंकेविरुद्धच चौथ्या गडय़ासाठी 467 धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदवली होती. याशिवाय विल्यम्सनने न्यूझीलंडतर्फे सर्वात जलद 7000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. रॉस टेलरने 96 कसोटीत हा टप्पा पार केला होता तर विल्यम्सनने 83 व्या सामन्यातच हा टप्पा गाठला आहे. माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने 7172 धावा 111 कसोटीत तर टेलरने 7379 धावा 105 कसोटीत केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक : पाक प.डाव 297, न्यूझीलंड प.डाव 158.5 षटकांत 6 बाद 659 डाव घोषित : लॅथम 33, ब्लंडेल 16, विल्यम्सन 238 (364 चेंडूत 28 चौकार), टेलर 12, निकोल्स 157 (291 चेंडूत 18 चौकार, 1 षटकार), वॅटलिंग 7, डॅरील मिशेल नाबाद 102 (112 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), जेमीसन नाबाद 30 (22 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), अवांतर 64. गोलंदाजी : आफ्रिदी 2-101, मोहम्मद अब्बास 2-98, अश्रफ 2-106, जफर गोहर 0-159, नसीम शहा 0-141). पाक दु.डाव 11 षटकांत 1 बाद 8 : शान मसूद 0, अबिद अली खेळत आहे 7, मोहम्मद अब्बास खेळत आहे 1. गोलंदाजी : जेमीसन 1-1).

Related Stories

अँजेलो मॅथ्यूजचे लंकन संघात पुनरागमन

Patil_p

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे सराव सामने

Patil_p

बँकॉकमधील स्पर्धेसाठी बॅडमिंटन संघ जाहीर

Patil_p

शिवा थापा, सुमीत उपउपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

माजी हॉकी प्रशिक्षक परमेश्वन यांचा ‘द्रोणाचार्य’साठी अर्ज

Patil_p

रोहितला टी-20 कर्णधार केले नाही तर भारतीय क्रिकेटचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!