तरुण भारत

कासार्डेत बापाकडून मुलाचा खून

दारु पिऊन आलेल्या मुलाकडून शिवीगाळ : बाप-लेकात झटापट : मुलाच्या डोक्यावर दांडय़ाने प्रहार

प्रतिनिधी / कणकवली:

Advertisements

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे बापाने मुलाचा डोक्यात दांडा घालून खून केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. रवींद्र उर्फ पांडुरंग भिकाजी आयरे (38) याचा जागीच मृत्यू झाला. रवींद्रचे वडील भिकाजी आयरे (65) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भादंवि कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र हा घरात दारू पिऊन आल्यानंतर झालेल्या वादातून रवींद्र व भिकाजी यांच्यात झटापट झाली. यात भिकाजीने मारलेला दांडा रवींद्रच्या वर्मी बसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना 6 जानेवारी रोजी पहाटे 2.30 वाजता घडली.

या प्रकरणी रवींद्रची पत्नी रेश्मा (32) हिने पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास कणकवलीचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

एकाच घरात विभक्त राहायचे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासार्डे आयरेवाडी येथे भिकाजी व त्यांचा मुलगा रवींद्र एका घरात राहत. मात्र भिकाजी व रवींद्र यांच्यात सतत भांडणे होत असल्यामुळे रवींद्र पत्नी रेश्मा आणि मुलगी अनुष्का (11) यांच्यासोबत त्याच घरात विभक्त राहत होता. तर वडील भिकाजी वेगळे राहतात. वडिलांची जबाबदारी रवींद्र याने स्वीकारली नव्हती. वडील भिकाजी हे निराधार योजनेच्या पैशांवर गुजराण करतात. रवींद्र हा सतत दारू पिऊन येऊन वडिलांना शिवीगाळ करीत होता. त्यामुळे अधून-मधून त्यांच्यात वाद होत होते.

सासूरवाडीला गेला होता रवींद्र

दोन दिवसांपूर्वी रवींद्र हा पत्नी आणि मुलीसोबत गोवळ तांबेवाडी येथे सासूरवाडीला गेला होता. तिथे त्याला अजून एक दिवस थांबूया, असा आग्रह त्याची पत्नी व सासूरवाडीचेही नातलग करीत होते. मात्र बुधवारी रात्री उशिरा तो गोवळ येथे पत्नी व मुलीला सासूरवाडीला ठेवून घरी आला.

दारुच्या नशेत भांडण

रवींद्र हा बुधवारी रात्री उशिरा कासार्डे येथे घरी आला. तेव्हा त्याने भरपूर दारू प्राशन केली होती. तो घरात असलेले वडील भिकाजी यांना मोठमोठय़ाने शिव्या घालू लागला. त्यानंतर रवींद्र आणि भिकाजी यांच्यात भांडण सुरू झालं. भांडणाचे पर्यावसान मारामारीत, झटापटीत झाले. भिकाजी व रवींद्र यांच्यात झटापट सुरू असताना रवींद्र हा अंगणात खाली पडला. त्यावेळी भिकाजी याने रवींद्रच्या डोक्मयावर दांडय़ाने जोरदार प्रहार केला. हा फटका एवढा वर्मी बसला की रवींद्र हा जागीच निस्तब्ध झाला. जोरदार फटक्यामुळे रवींद्रचा जागीच मृत्यू झाला. रवींद्रच्या डोक्याला जखम होती तसेच चेहऱयावर, मानेवर मारहाणीच्या खोलवर जखमा आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र भिकाजी हा आपण दांडय़ाने मारहाण केली, असं सांगत असला तरी रवींद्रच्या चेहऱयावरील जखमा पाहता अन्य कुठल्या तरी हत्याराने त्याने मारहाण केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

या घटनेची फिर्याद रवींद्रची पत्नी रेश्मा यांनी पोलीस स्टेशनला दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, एपीआय सागर खंडागळे, त्यांचे सहकारी बापू खरात, सचिन माने, नितीन खाडे करीत आहेत.

वडिलांना रोजच शिवीगाळ

सदर घटनेबाबत कासार्डे आयरेवाडीतील नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनी रवींद्र रोजच दारू पिऊन वडिलांना शिवीगाळ करायचा. वडील आणि मुलातील भांडण कायमचेच होते. हा सारा प्रकार म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असा असल्याने आम्ही त्यांच्या भांडणात कधी पडलो नाही. त्यामुळे या घटनेबाबतही आपल्याला काही विशेष माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

खून करून बाप घरात झोपला

दारू पिऊन भांडणातून बाप लेकात रात्री झटापट झाली. यात डोक्यावरील वर्मी फटक्यामुळे मुलगा रवींद्र हा अंगणात गतप्राण होऊन पडला असताना बाप भिकाजी हा शांतपणे घरात जाऊन झोपला. सकाळी 11 वाजता शेजाऱयांना बोलून भिकाजीने ‘आपला मुलगा अंगणात मरण पावला आहे. त्याला घरात नेऊन ठेवूया’, अशी विनंती केली. यावेळी शेजाऱयांना रवींद्रचा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात अंगणात निपचित पडलेला दिसताच शेजाऱयांनी तो उचलण्यास नकार दिला.

Related Stories

व्यापाऱयांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करेन!

NIKHIL_N

138 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत

NIKHIL_N

भाजपचा आज सावंतवाडीत विजयी मेळावा

NIKHIL_N

रत्नागिरीत एसटीच्या 56 कर्मचाऱयांविरूद्ध कामगार न्यायालयात तक्रार

Patil_p

जिल्हय़ात एका दिवसात 16 जणांना डिस्चार्ज

NIKHIL_N

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी वाढीव भूसंपादनास व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!