तरुण भारत

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आजपासून

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आणखी एका रोमांचक लढतीची अपेक्षा, रोहित शर्माचे पुनरागमन, सैनीचे पदार्पण, अजिंक्य रहाणेवरही मुख्य भिस्त

वृत्तसंस्था / सिडनी

Advertisements

अवघ्या 10 दिवसात ‘नादीर ते झेनिथ’ अशी गरुडझेप घेणाऱया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आजपासून (दि. 7) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जाणाऱया तिसऱया कसोटी सामन्यात नव्याने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. रोहित शर्मा संघात दाखल झाल्याने भारताचे मनोबल अर्थातच उंचावलेले असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहाटे 5 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ होणार आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय फलंदाजांनी कित्येक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. पण, सांघिक स्तरावर भारताची कामगिरी अगदीच निराशाजनक झाली आहे. या मैदानावर भारताला आजवर 6 पराभव स्वीकारावे लागले आहेत. सिडनीत भारताने 42 वर्षांपूर्वी शेवटचा विजय मिळवला, यावरुनच भारताची येथील खराब कामगिरी दिसून येते.

सिडनीतील ही कसोटी जिंकत येथे 2-1 अशी आघाडी घेतली तर बोर्डर-गावसकर चषक भारताकडेच कायम राहील, हे स्पष्ट होईल. दोन जागतिक दर्जाचे खेळाडू व एक अव्वल गोलंदाज विविध कारणामुळे संघात नसताना देखील अशी कामगिरी बजावली तर भारतासाठी तो विशेष गौरवास्पद क्षण असणार आहे.

सैनीला पदार्पणाची प्रतीक्षा

ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ताकदीने खेळत आहे. स्टीव्ह स्मिथच्या दर्जाचा खेळाडू देखील या मालिकेत झगडत असून यामुळे भारतीय संघाची गोलंदाजी किती मजबूत झाली आहे, याची प्रचिती येते आहे. अर्थातच, गोलंदाजीच्या आघाडीवर देखील भारताचे काही महत्त्वाचे खेळाडू या मालिकेत खेळू शकलेले नाहीत. उमेश यादवऐवजी मध्यमगती गोलंदाज नवदीप सैनी येथे पदार्पण करणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघ फक्त 70 टक्के तंदुरुस्त असलेल्या वॉर्नरला खेळवणे भाग पाडणार आहे, यावरुनच ते किती अडचणीत आहेत, हे दिसून येते. स्वतः वॉर्नरनेच आपण तिसऱया कसोटी सामन्यात खेळू शकणार का, याबद्दल साशंकता व्यक्त केली असून यावरुन तो ही फारसा उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. उलटपक्षी, रोहित शर्मा पुनरागमन करत असल्याने भारतीय संघात नवा उत्साह संचारणे साहजिक आहे.

रोहितकडून फटकेबाजी अपेक्षित

रोहित आयपीएल फायनलनंतर एकाही लढतीत खेळू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागले. मात्र, सिडनीतील अपार्टमेंटमध्ये दोन आठवडय़ांचे क्वारन्टाईन पूर्ण केल्यानंतर रोहित ताज्या दमाने सज्ज झाला. मेलबर्न रेस्टॉरंटमध्ये एका चाहत्यासमवेत दिसून आल्याने रोहितसह 5 जणांना चौकशीच्या फेऱयाला सामोरे जावे लागेल, अशी चिन्हे निर्माण झाली. पण, अशा बाबींचा आपल्या खेळावर विपरित परिणाम होऊ न देणाऱया रोहितने सराव सत्रात रविचंद्रन अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजांचा उत्तम सामना केला असून प्रत्यक्ष लढतीतही त्याला लवकर सूर गवसेल, अशी अपेक्षा आहे.

त्याच्या निव्वळ संघातील हजेरीमुळे देखील सहकाऱयांना स्फुरण चढते, असे दिसून आले असून याचमुळे कदाचित केवळ एकाच कसोटीनंतर चेतेश्वर पुजाराऐवजी रोहितकडेच उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. सिडनीची खेळपट्टी प्रामुख्याने फलंदाजांसाठी उत्तम मानली जाते आणि येथे सुनील गावसकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर व अगदी पुजारा व ऋषभ पंत यांनीही शतके झळकावली आहेत. आता बहरात असलेला अजिंक्य रहाणे हा मिशेल स्टार्क, जोश हॅझलवूड, पॅट कमिन्स व नॅथन लियॉन यांचा उत्तम समाचार घेण्यात यशस्वी ठरला होता. तोच कित्ता येथेही गिरवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

विहारीला आणखी एक संधी

केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर फेकला गेला असल्याने हनुमा विहारीला आणखी एक संधी मिळाली आहे. खराब फॉर्ममधील मयांक अगरवालला रोहितसाठी जागा करुन द्यावी लागली आहे. अर्थात, अश्विनसमोर आणखी कसोटी लागेल, असे संकेत असल्याने ऑस्ट्रेलियासमोर हेच मुख्य आव्हान आहे. आतापर्यंत मालिकेत 10 बळी घेणाऱया अश्विनने स्मिथ व लाबुशानेसारख्या अव्वल फलंदाजांना हतबल करुन टाकले आहे. बळी मिळवण्यापेक्षा चेन्नईच्या या इंजिनियरने ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये जी धास्ती निर्माण करुन ठेवली, ती त्यांच्यासाठी अधिक चिंतेची ठरत आली आहे.

ऑस्ट्रेलियासाठी स्मिथचे फॉर्ममध्ये परतणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ट्रव्हिस हेडने मध्यमगती व फिरकी गोलंदाजीचा आत्मविश्वासाने सामना करणे महत्त्वाचे असेल. अवघे 20 कसोटी सामने खेळलेल्या पण, महत्त्वाकांक्षी मारा करणाऱया बुमराहने आणखी वैविध्यपूर्ण मारा करणे अपेक्षित आहे. नव्या चेंडूवर सिराज व सैनी यांना मोहम्मद शमी व इशांत शर्माचा लौकीक राखण्याचे आव्हान असेल.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये प्रथमच महिला पंच

ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसॅक या पुरुषांच्या कसोटी सामन्यात पंच म्हणून काम पाहणाऱया पहिली महिला ठरतील. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत त्या चौथ्या पंचाच्या भूमिकेत असतील. नवे चेंडू उपलब्ध करुन देणे, पंचांसाठी जलपान उपलब्ध करुन देणे, लाईट मीटर्सची बॅटरी तपासणे, उपाहारादरम्यान, चहापानादरम्यान खेळपट्टीची पाहणी करणे ही चौथ्या पंचाची मुख्य जबाबदारी असते. 32 वर्षीय क्लेअर न्यू साऊथ वेल्सच्या असून आयसीसी डीव्हिजन 2 लीग लढतीत त्या पहिल्या महिला मैदानी पंच ठरल्या होत्या. नामिबिया-ओमान पुरुषांच्या वनडे लढतीत त्यांनी पंच म्हणून काम पाहिले होते.

आजपासून खेळवल्या जाणाऱया सामन्यात पॉल रॉफेल व पॉल विल्सन हे मैदानी पंच तर ब्रुस ऑक्सनफोर्ड टीव्ही पंच असतील. डेव्हिड बून सामनाधिकारी असणार आहेत. कसोटी सामन्यासाठी आयसीसी नियमाप्रमाणे चौथ्या पंचांची नियुक्ती यजमान क्रिकेट मंडळाकडून केली जाते.

Related Stories

स्टीपलचेसमधील केनियन वर्चस्व संपुष्टात

Patil_p

दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नर पहिल्या कसोटीतून बाहेर

Omkar B

अमेरिकेची सोफिया केनिन नवी सम्राज्ञी

Patil_p

‘आयएमईडी’ स्पोर्ट्स मीट-2020′ चे उदघाटन

prashant_c

राष्ट्रीय सायकलींग सराव शिबीर शुक्रवारपासून

Patil_p

गोल्फपटू अदिती अशोक ब्रिटिश ओपनसाठी पात्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!