तरुण भारत

ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन अखेर समाप्त

मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत तोडगा, दहा वर्षांऐवजी आठ वर्षांच्या सरासरीतील सर्वाधिक उत्पन्न जमेस धरणार, यापुढे ऊसाची उचल संजीवनीकडून

प्रतिनिधी / सांगे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर बुधवारी संध्याकाळी झालेल्या ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत तोडगा निघाल्याने समितीने पुकारलेले धरणे आंदोलन समाप्त झाले आहे. त्यानुसार दहा वर्षांऐवजी आठ वर्षांतील ऊसाची सरासरी काढून त्यातील सर्वाधिक उत्पादन जमेस धरून रु. 3600 प्रती टन याप्रमाणे ऊसाची रक्कम चुकती करण्याबरोबर पुढे ऊसाची उचल संजीवनी साखर कारखान्याकडून केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना एकूण पुरवठा केलेल्या ऊसावर रक्कम दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या आंदोलनाला पाच दिवस पूर्ण झाले असून मंगळवारीच ऊसाला प्रती टन रु. 3600 भाव देणे, ऊसाची रक्कम फेब्रुवारीपर्यंत चुकती करणे या मागण्या मान्य करण्यात येत असल्याचा निरोप सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी ऊस उत्पादक संघर्ष समितीला कळविला होता. परंतु समिती मागील दहा वर्षांची सरासरी काढून ज्या वषी जास्त ऊसपीक आले आहे त्यानुसार ऊसाला भाव द्यावा या मागणीवर अडून राहिली होती. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या या बैठकीत  दहा वर्षांऐवजी आठ वर्षांची सरासरी काढून ज्या वषी जास्त ऊसाचे उत्पादन झाले आहे त्यानुसार यंदा भाव देण्यावर एकमत झाले, असे समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच शेतकऱयांनी उत्पादित केलेला ऊस संजीवनी कारखाना नेणार आहे.

कृषिमंत्री कवळेकर यांची शिष्टाई यशस्वी

सुरुवातीपासून कृषिमंत्री कवळेकर यांनी आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आणि अखेर त्यांची शिष्टाई यशस्वी ठरली. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत कृषिमंत्री कवळेकर, सरकारनियुक्त ऊस उत्पादक सुविधा समितीचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, सांगेचे आमदार प्रसाद गावकर, ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष कुष्ट गावकर, चंदन उनंदकर यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते.

आंदोलकांकडून आनंद साजरा

समितीने केलेली अन्य एक मागणी गेल्या वषीच्या तोडणीची प्रती टन रु. 600 याप्रमाणे देय असलेली रक्कम लवकर देण्यात यावी अशी होती. ही मागणी सरकारने गेल्या शुक्रवारी पूर्ण केलेली आहे. अन्य मागण्यांवरही तोडगा आल्याचे वृत्त धरणे आंदोलनाच्या स्थळी पोहोचल्यानंतर फटाके वाजवून आंदोलकांनी आनंद साजरा केला. पाचव्या दिवशीही आंदोलकांमध्ये महिला मोठय़ा संख्येने हजर होत्या. बुधवारी सायंकाळी पाऊस पडल्याने थोडी गैरसोय झाली.

संजीवनी प्रशासक-शेतकरी करार होणार

बुधवारच्या बैठकीचा इतिवृत्तांत तयार केला जाणार असून संजीवनी साखर कारखाना प्रशासक व शेतकऱयांमध्ये करार होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वास्तविक सोमवारी संध्याकाळी समितीकडे उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी मोबाईलवरून संपर्क साधून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेसाठी बोलविले होते. त्यानंतर समिती पदाधिकाऱयांनी यावर आंदोलक शेतकऱयांचे मत घेतले असता चर्चेसाठी पणजीत न जाता सरकारने सांगेतच बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱयांनी केली होती. अखेर समितीने सरकारच्या शब्दाला मान देऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीला उपस्थिती लावली.

आज रीतसर धरणे समाप्त करणार

या आंदोलनाला सर्व थरांतून वाढता प्रतिसाद मिळत गेला. आज गुरुवारी शेतकरी सांगेमध्ये जमणार असून सांगेचे आराध्य दैवत श्री पाईकदेवाचे दर्शन घेणार आहेत व रीतसर धरणे समाप्त करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Related Stories

पोर्तुगिजकालीन चिंबल तळीच काम नोव्हेंबरात हाती घेणार

Patil_p

गोव्याच्या हितासाठी लढणाऱयांना चिरडण्याचे षडयंत्र

Patil_p

कोरोना संक्रमण काळात नवीन भाडेकरु ठेऊ नयेत

tarunbharat

शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार

Amit Kulkarni

धारबांदोडा येथे अपघातात दुचाकीचालक ठार

Patil_p

शिमगोत्सव किमान सात ठिकाणी आयोजित करावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!