तरुण भारत

जखमी बिबटय़ाची महामार्ग ओलांडून धूम

कराडजवळ महामार्गावर बिबटय़ाला वाहनाची धडक, 19 मिनिटांचा थरार 

प्रतिनिधी / कराड

कराड तालुक्यात बिबटय़ाचा मानवी वस्तीतील वावर पुन्हा वाढला असून मंगळवारी रात्री बिबटय़ा चक्क आशियाई महामार्गावर अवतरला. आगाशिव डोंगराकडून आलेला बिबटय़ा पाचवड फाटा (ता. कराड) येथे महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. मात्र बिबटय़ाला अनोळखी भरधाव वाहनाची धडक बसल्याने त्याच्या तोंडाला गंभीर जखम झाली. जखमी अवस्थेतील बिबटय़ा सुमारे 19 मिनिटे महामार्गाच्या कडेला बसून होता. अखेर वाहनांची वर्दळ कमी झाल्यावर बिबटय़ाने महामार्ग ओलांडत कृष्णा नदीच्या बाजूकडे धूम ठोकली. बिबटय़ाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती.

दरम्यान, वनविभागाने मंगळवारी रात्री 11 ते बुधवारी दुपारपर्यंत सलग 16 तास सर्च ऑपरेशन राबवून बिबटय़ाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

कराड तालुक्यात आगाशिव डोंगर परिसरात बिबटय़ाचा वावर नेहमीच असतो. गेल्या सहा महिन्यांत बिबटय़ाचा शेतासह मानवी वस्तीलगतचा वावर पुन्हा वाढला आहे. मंगळवारी एक बिबटय़ा आगाशिव डोंगराकडून उसाच्या शेतातून मार्ग काढत महामार्गाच्या दिशेने आला. रात्री अकराच्या सुमारास बचपन शाळेजवळ बिबटय़ाचे दर्शन काही ग्रामस्थांना झाले. बचपन शाळेकडून बिबटय़ा महामार्गावर आला. महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीमुळे बिबटय़ा गोंधळला असावा. तो महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच अकराच्या सुमारास एका भरधाव वाहनाची बिबटय़ाला धडक बसली. त्यामुळे बिबटय़ाच्या तोंडाला गंभीर जखम होऊन तो भांबावलेल्या अवस्थेत महामार्गाकडेला थांबला. जे. के. कंपनीसमोर तो महामार्गाकडेला बसला. बिबटय़ा दिसत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांसह महामार्गावरून जाणारे वाहनधारकही बिबटय़ाला पाहण्यासाठी थांबले. बिबटय़ाचा व्हिडीओ मोबाईलमधे घेण्यासाठी धडपड सुरू झाली. वाढत्या गर्दीने आणि वाहतूक मंदावल्याने बिबटय़ा आणखी भेदरला होता.

आगाशिव लेण्यांच्या परिसरात गस्त घालत असलेल्या वनविभागाचे प्रमोद सुतार यांना हा प्रकार समजला. ते पिंजरा घेऊन त्या परिसराकडे निघाले. तोपर्यंत बिबटय़ाने महामार्ग ओलांडून पलीकडे कृष्णा नदीच्या बाजूने धूम ठोकली. तब्बल 19 मिनिटे बिबटय़ा महामार्गाच्या कडेला बसलेला होता.

बिबटय़ा पळाल्यानंतर काही वेळात वनविभागाचे वनक्षेत्रपाल अर्जुव गमरे, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, वनरक्षक ए. पी. सव्वाखंडे, रमेश जाधवर, प्रशांत मोहिते, उत्तम पांढरे, मंगेश वंजारी, सचिन खंडागळे यांच्यासह दोन वनमजूर दाखल झाले. महामार्ग ओलांडून ज्या उसाच्या शेताकडे बिबटय़ा पळाला, त्या परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी प्रत्येक दहा मीटर क्षेत्राची पाहणी करत बिबटय़ाचा शोध घेतला. पहाटे अडीच वाजता ही शोधमोहीम काही वेळ थांबली. त्यानंतर पुन्हा गोळेश्वर, नांदलापूर हद्दीत शोधमोहीम सुरू झाली. बुधवारी दिवसभर ही मोहीम सुरू होती. 

महामार्ग ओलांडताना अनेकदा दिसला बिबटय़ा

मंगळवारी रात्री महामार्ग ओलांडताना जो बिबटय़ा जखमी झाला, त्या बिबटय़ाचा हा मार्ग नेहमीचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले. याच परिसरातील उसाच्या शेतात, सेवारस्त्यावर बिबटय़ा स्थानिकांना अनेकदा दिसल्याची नोंद वनविभागाकडे आहे. या नोंदीवरूनच हा या बिबटय़ाचा नेहमीचा मार्ग असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे बिबटय़ा बरेचदा एक नव्हे, तर त्याच्यासमवेत दोन बछडेही असतात, अशीही नोंद आहे. 

सर्च ऑपरेशनसाठी डॉक्टरांचे पथक दाखल

महामार्ग ओलांडताना जखमी झालेल्या बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरुच आहे. बुधवारी दुपारी कोल्हापूर येथील वनविभागाच्या तज्ञ डॉक्टरांचे पथक कराडात दाखल झाले. या पथकाने बिबटय़ाच्या रक्ताची तपासणी केली. जखमी बिबटय़ाच्या शोधमोहिमेत ते सहभागी झाले.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली, कोयना धरणात 60.53 उपयुक्त पाणीसाठा

Shankar_P

रिक्षातून प्रवास करताना गंठण लंपास

Patil_p

मंत्री शंभूराज देसाई यांच्या कन्येने साकारली लॉकडाऊनमध्ये पेंटींग

Patil_p

‘इन्स्पायर अवॉर्ड’ नामांकनात सातारा प्रथम

triratna

शाहु चौकात डांबरीकरणाचे काम सुरु

Omkar B

सातारा : कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ‘ती’ टीम सदैव तत्पर

triratna
error: Content is protected !!