तरुण भारत

अमेरिकेच्या संसदेत हिंसाचार : 4 ठार

206 वर्षांमधील प्रथम घटना, बायडन यांच्या अध्यक्षतेला मान्यता

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

Advertisements

अमेरिकेच्या संसदभवनात मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासात 206 वर्षांनंतर ही संसदेत हिंसाचार होण्याची घटना घडली आहे. जगभरात या घटनेचा तीव्र निषेध होत असून अमेरिकेच्या लोकशाहीवर पडलेला कधीही न पुसला जाणारा डाग असे या घटनेचे वर्णन अनेक जाणकारांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते जोसेफ बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचा पराभव केला होता. त्यांच्या विजयाला समंती देण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू होण्यापूर्वीच काही तास हजारो ट्रम्प समर्थकांनी संसद भवनात घुसून त्याचा ताबा घेतला व नासधूस सुरू केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱयांना व सुरक्षा दलाच्या सदस्यांना या समर्थकांनी मारहाण केली. काही समर्थकांजवळ गन्स असल्याने कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावण होते.

4 जणांचा मृत्यू

हिंसाचारात 4 जण मृत्यूमुखी पडले आहेत. एका महिलेला भिंतीवरून खाली फेकल्याने तिचा मृत्यू झाला. तर तीन जण चेंगराचेंगरीत श्वास कोंडल्याने जागीच कोसळले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. साधारणतः दोन तास हे दंगेखोर सभागृह व परिसरात होते.

ते कुठे आहेत ?

ट्रम्प समर्थकांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा देत हिंसाचार केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचाच विजय झाला आहे, असा अर्थाच्या घोषणा ते देत होते. त्यांच्या हातात रिपब्लिक पक्षाचे ध्वज होते. या समर्थकांनी परिसरातील अनेक कार्यालयांमध्ये शिरून धुडगुस घातला. त्यांना घाबरून अनेक कर्मचारी टेबलांच्या खाली लपले. तर काही जण कार्यालयांमधून बाहेर पडून सुरक्षित जागी जाण्यामध्ये यशस्वी ठरले. ‘ते कोठे आहेत’ अशी पृच्छा दंगेखोर करीत होते. ते नेमके कोणाला शोधत होते, हे समजू शकले नसले तरी ते सभागृहांच्या काही सदस्यांचा शोध घेत होते, असे अनुमान काढण्यात आले. यावेळी उपस्थितांची घाबरगुंडी उडाली होती.

खुर्ची बळकावली, ध्वज फडकविला

दंगेखोरांनी सभागृहात प्रवेश करून सभाध्यक्षांच्या खुर्चीवर काही काळ ठाण मांडले. त्याचप्रमाणे काही जणांनी कॅपिटॉल हिल परिसरात रिपब्लिकन पक्षाचा ध्वज फडकविला. ट्रम्प यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. डेमॉक्रेटिक पक्षाने ही निवडणूक चोरली आहे, असाही आरडाओरडा ते करत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ट्रम्प यांचा प्रक्षोभक संदेश

समर्थक संसद परिसरात घुसण्यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्यापैकी काहीजणांना ट्विटरवरून संदेश पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘बी देअर, इट विल बी वाईल्ड’ (तेथेच रहा, जोरदार संघर्ष करा) अशा अर्थाचा हा संदेश होता असे सांगण्यात आले. या संदेशामुळे त्यांच्या समर्थकांना हिंसाचार करण्याची प्रेरणा मिळाली, असा आरोप अनेक पत्रकारांनी केला आहे. डेमॉपेटिक पक्षाच्या सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.

पोलीस संरक्षण का नव्हते

ट्रम्प समर्थक दंगल करतील अशी शक्यता असतानाही कॅपिटॉल हिल परिसराला पुरेसे पोलीस संरक्षण का देण्यात आले नव्हते, अशी पृच्छा अनेकजण करीत आहेत. पोलीस अधिकाऱयांवर ढिलाई दाखविल्याचा आरोप केला जात आहे. त्याचप्रमाणे उत्तरदायित्व निश्चित करून अधिकाऱयांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या हिंसाचारामुळे जगात अमेरिकेची मान खाली गेल्याची भावना आहे.

पंतप्रधान मोदींना खेद

अमेरिकेच्या संसदेत घडलेल्या या धक्कादायक हिंसाचारावर भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी कठोर टीका केली आहे, हा हिंसाचार अत्यंत निषेधार्ह आणि खेदजनक आहे. असे काही घडेल, अशी कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही, अशी प्रताक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे ब्रिटन. फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आदी देशांनीही हा प्रसंग धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

बायडन यांच्या विजयाला संमती

ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारानंतर काही तासातच विजयी उमेदवार जोसेफ बायडन यांच्या अध्यक्षपदाला संमती देण्यासाठी संसदगृहात सिनेट आणि कनिष्ठ सभागृह यांच्या सदस्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत हिंसाचाराचा निषेध करण्यात आला. तसेच बायडन यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाला संमती देण्यात आली. आता ही औपचारिकता पार पडल्यानंतर बायडन यांचा 20 जानेवारीला अध्यक्ष पदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बायडन यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर निवडवृंदाच्या सभेत 306 निवड मते तर ट्रम्प यांना 232 मते मिळाली होती. अशा प्रकारे बायडन यांच्या विजयाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अमेरिका ऐतिहासिक सत्तांतरासाठी सज्ज झाली आहे.

ट्रम्प यांना पराभव मान्य

अमेरिकेच्या संसदेने बायडन यांच्या विजयाला प्रमाणपत्र दिल्यानंतर अखेर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला आहे. 20 जानेवारीला सत्तांतर सुरळीतपणे पार पडेल याची आपण शाश्वती देतो असा संदेश त्यांनी पाठविला आहे. मात्र हिंसाचारासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची कन्या इव्हांकाने निदर्शकांचे समर्थन करणारा संदेश प्रसृत केला.

Related Stories

चीनमध्ये डॉ.कोटणीस यांच्या स्मृतींना उजाळा

Omkar B

रशियात विमान कोसळून 16 जणांचा मृत्यू

Patil_p

लॉयड ऑस्टिन अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री होणार

Patil_p

परवेझ मुशर्रफ यांची फाशी रद्द

prashant_c

पाकमध्ये आत्मघाती स्फोट; 3 सैनिक ठार

datta jadhav

चीनमध्ये आता आणखी एक व्हायरस; 7 जणांचा मृत्यू तर 60 जणांना लागण

Rohan_P
error: Content is protected !!