तरुण भारत

मातृछायेच्या कार्याला हातभार म्हणजे जीवनातील खरे भाग्य !

अलोक कुमार यांचे उद्गार : बालिका कल्याण आश्रमाची तळावलीत पायाभरणी

प्रतिनिधी/ फोंडा

Advertisements

मातृछाया ही समाजातील मातृत्वातून उभी राहिलेली मानवतेची सेवा आहे. आपल्या सभोवताली कुणीही अनाथ व उपाशी राहणार नाही हे भारतीय परंपरेनेच आपल्याला शिकविले आहे. या संस्थेच्या कार्यामागील हीच खरी प्रेरणा आहे. समाजाच्या विविध स्तरातील दात्यांचे श्रम, वेळ, साधना व शुभेच्छांच्या पायावरच हे कार्य उभे असून मातृछायेसारख्या संस्थेच्या कार्याला हातभार लावणे हे जीवनातील भाग्य समजावे, उद्गार विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी काढले. 

तळावली येथे उभारण्यात येणाऱया मातृछाया ट्रस्टच्या ‘बालिका कल्याण’ आश्रमाच्या नूतन वास्तूच्या पायाभरणी सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तळसल तळावली येथे होऊ घातलेल्या या प्रकल्पाची पायाभरणी शनिवारी दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते झाली. त्यानंतर बाल कल्याण आश्रमाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य सोहळय़ात अलोक कुमार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. सुलोचना प्रमोद सावंत, मातृछाया ट्रस्टचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे, पंचसदस्य हर्षल तळावलीकर व विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर दिक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.

मातृछायेला भेट देणे म्हणजे एखाद्या तीर्थयात्रेला जाणे व सत्ससंगात सहभागी होण्यापेक्षा कमी नाही. समाजात कुणीही अनाथ राहणार नाही ही थोर परंपरा भारतीय संस्कृतीमध्येच आढळते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म देवकीमातेच्या उदरी झाला तरी त्याचे पालन पोषण गोकुळातील यशोदा मातेने केले. याच परंपरेच आपण पायिक आहोत, असे अलोक कुमार पुढे म्हणाले. कोरोनाच्या काळातही याची प्रचिती आल्याचे सांगताना, समाजातील एकही दुर्बल घटक उपाशी पोटी झोपणार नाही याची दखल येथील मंदिरे, मठ, समाजसेवी संस्था व दात्यांनी घेतली. या काळात हजारो मैल वाट तुडवीत आपल्या मुलांबाळांसह गावी पायी चालत जाणाऱया लाखो मजुरांच्या जेवणाची सोय वाटेत अशाच दात्यांनी केली, असेही त्यांनी नमूद केले.

समाजातील ममत्त्वाचे ज्वलंत उदाहरण : सुलक्षणा सावंत

सामाजिक बांधिलकी काय असते, हे मातृछायेसारख्या संस्थेच्या कार्यातून दिसून येते, असे सुलक्षणा सावंत म्हणाल्या. समाजातील ममत्वाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ही संस्था आहे. आई वडिलांविना जगणे ही कल्पना असहय़ असते. मात्र ज्यांना तो आधार मिळात नाही, त्यांना अशा संस्था मायेचा ओलावा व जगण्याचा आधार देतात, हे मातृछायेच्या कार्यातून दिसून येते. नवीन पिढीला या सामाजिक बांधिलकेचे महत्त्व पटवून देतानाच नवनवीन लोक अशा कार्यात जोडले गेले पाहिजेत. त्यासाठी शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन आहे, हा गैरसमज दूर होऊन ते समग्र असायला हवे हा विचार प्रत्येक पालक व विद्यार्थ्यामध्ये रुजण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हर्षल तळावलीकर म्हणाले, मातृछायेमुळे तळावली गांव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने समृद्ध झाले आहे. तळावलीकर कुटुंबीयांचा एक वंशज म्हणून आपल्या पूर्वजांच्या जागेवर मातृछायेची वास्तू उभी राहणे हे भाग्य म्हणावे लागेल. पंचायतीतर्फे संस्थेला नेहमीच सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आपल्या प्रास्ताविक भाषणात श्रीनिवास धेंपे म्हणाले, समाजाची गरज ओळखून मातृछायेची स्थापना झाली व गेल्या 45 वर्षांत विविध क्षेत्रात या संस्थेचा कार्यविस्तार झाला. आर्थिक मदत देणाऱया दात्यांपेक्षा कार्यकर्ता हा या संस्थेचा खरा कणा आहे. याची प्रचिती मातृछायेचा प्रत्येक प्रकल्प उभारताना आलेली आहे. धेंपे कुटुंबीयांच्या तीन पिढय़ांपासून मातृछायेशी जवळचा संबंध व बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वागत व पाहुण्यांचा परिचय बालिका कल्याण आश्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष भोसले यांनी करून दिला. आश्रमातील मुलींनी स्वागतगीत व गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा संदीप निगळय़े यांनी तर मातृछाया न्यासचे अध्यक्ष कमांडर अनुप केणी यांनी आभार मानले.

मुख्यमंत्र्यांकडून मातृछायेच्या कार्याला शुभेच्छा

भूमिपूजन सोहळय़ाप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दात्यांच्या आधारावर उभा राहणारा बालिका कल्याण आश्रम लवकरात लवकर पूर्ण होवो, अशा शुभेच्छा  दिल्या. मातृछायेच्या कार्याचा विस्तार आज संपूर्ण गोव्यात झालेला आहे. सरकारकडून त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य नेहमीच मिळणार असल्याचे सांगितले.

Related Stories

महामारीचा मोटार सायकल पायलटांना फटका

Amit Kulkarni

आधार व युएएन एकमेकांशी संलग्न करा

Amit Kulkarni

सरकारने खबरदारी घेऊनच वर्ग सुरू करावेत : डॉ. नेत्रावळकर

Amit Kulkarni

कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

Omkar B

पर्वरीतील चोगम रस्त्याची चाळण

Patil_p

निरंकाल येथील वानरमाऱयांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!