तरुण भारत

लोकप्रतिनिधींनी लोकहितासाठी वावरावे

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मार्गदर्शन

जय उत्तम नाईक/ पणजी

लोकप्रतिनिधींनी स्वहितासाठी नव्हे तर लोकहितासाठी वावरावे, लोकांचे सशक्तीकरण करावे. ज्या राजकर्त्यांकडे लोकांसाठी वेळ नसतो त्यांनी राजकारणात येऊ नये, अशा शब्दांत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी गोव्यातील राजकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर खाणबंदीसारख्या संकटामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामातून वाट काढत स्वतःचे अग्रस्थान कायम राखायचे असेल तर आव्हाने स्वीकारावी लागतील, असा सल्लाही श्री. नायडू यांनी दिला.

गोवा विधीकार दिनानिमित्त पर्वरी येथे विधानसभा संकुलात आयोजित सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, उपसभापती इजिदोर फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.

गोवा सरकारची कामगिरी आदर्शवत

गोवा केवळ सौंदर्यवान आहे असेच नव्हे तर एक कर्तव्यतत्पर राज्यही आहे.  सौंदर्य आणि कार्यतत्परता यातून पराक्रमी राज्यही बनू शकते. त्यामुळे प्रत्येकाने अत्यंत परिपक्वतेने स्वतःची जबाबदारी सांभाळावी, असे आवाहन नायडू यांनी केले. कोरोना महामारीच्या काळ्या स्मृती पुसून टाकताना नव्या वर्षात नव्या आशा घेऊन आपण पुढे जाऊया असे आवाहन करताना कोरोना संकट हाताळण्यात गोवा सरकारने केलेली कामगिरी संपूर्ण देशासाठी स्तुत्य आणि आदर्शवत होती, असे नायडू म्हणाले.

कुशल मनुष्यबळ तयार करा

देशातील सर्वात लहान राज्यामध्ये गोवा हे आकारमानाने प्रथम तर लोकसंख्येच्या मानाने चतुर्थ क्रमांकाचे राज्य आहे, तरीही विकासाच्या बाबतीत आघाडीवरील व सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य आहे, असे नायडू म्हणाले. आजपर्यंत गोव्याची अर्थव्यवस्था खाण आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील खाण व्यवसाय थांबलेला आहे. त्याचा राज्याच्या विकासावर बराच परिणाम झालेला आहे. परंतु त्यामुळे हतबल न होता माहिती तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रांद्वारे उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित केले पाहिजेत, त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

स्थिरता असेल तरच विकास

स्वातंत्र्यानंतरच्या 57 वर्षांत आतापर्यंत गोव्याने 30 सरकारे पाहिली आहेत. ही खूप मोठी संख्या आहे. त्यातील 11 सरकारे ही एका वर्षापेक्षा कमी कालावधीची होती. दुसरी तीन सरकारे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत चालली. केवळ 3 सरकारांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्याशिवाय तब्बल पाचवेळा राज्याने राष्ट्रपती राजवट पाहिली. हा एकत्रित काळ सुमारे दोन वर्षांचा होता. अशाप्रकारे बहुतेक काळ हा राजकीय अस्थिरतेच गेला. परिणामी सरकारला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी खूप कमी मिळाली. स्थिरता असेल तरच पात्रता सिद्ध करता येते व त्यातून विकास साधता येतो, असेही ते म्हणाले.

बहुतेक लोकप्रतिनिधींचे चारित्र्य डागाळलेले

लोकशाहीत लोकप्रतिनिधीची भूमिका, जबाबदारी आणि कार्यक्षम कामगिरी यासंबंधी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. योग्य लोकसंपर्क, वागणूक, आचरण, चारित्र्य, वचनबद्दता, यासारखे गुण लोकप्रतिनिधीमध्ये असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आज अनेक लोकप्रतिनिधींचे चारित्र्य डागाळलेले सापडत आहे. जास्तीत जास्त संपत्ती गोळा करण्याच्या मोहातून ते प्रसंगी गुन्हेगारीतही उतरू लागले आहेत. असे प्रकार वाढू लागल्यास ते लोकशाहीसाठी मारक ठरू शकते. लोकप्रतिनिधींनी स्वहितासाठी नव्हे तर जनहितासाठी वावरले पाहिजे. लोकांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे, मतदारसंघाचा नियमित दौरा केला पाहिजे, असे सल्ले श्री. नायडू यांनी दिले. त्याचबरोबर आपल्या गत लोकप्रतिनिधींने केलेल्या कामाचा अभ्यास करावा, त्यातील चांगल्या गोष्टींचे ग्रहण करावे, चुकांचे निरसन करावे, असेही नायडू म्हणाले.

’बोले तैसा चाले’ असे आचरण ठेवा : राज्यपाल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या भाषणात विधीमंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. लोकप्रतिनिधींचे आचरण ’बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे असले पाहिजे. आपण जेवढे चांगले बोलतो तेवढेच चांगले वागलेही पाहिजे, लोकांनी  विश्वासाने दिलेली जबाबदारी पाळताना आपण लोकांसाठीच आहोत याचे नित्य स्मरण ठेवले पाहिजे, असे कोश्यारी यांनी सांगितले.

राज्याची सर्व क्षेत्रात भरीव प्रगती : सावंत

मुक्तीच्या 60 व्या वर्षात पदार्पण करताना गोवा राज्याने सर्व क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे. राज्य सध्या स्वयंपूर्ततेकडे वाटचाल करत असून पुढील 40 वर्षांचा विचार करता पर्यावरण सांभाळून विकास प्रकल्प आणले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. विद्यमान सरकार हे संवेदनशील तेवढेच लोकाभिमूख आहे. त्यामुळे लोकांनी विधायक संकल्पना घेऊन पुढे यावे, असा सल्ला त्यांनी दिला.

सरकार पारदर्शक असावे : कामत

सत्तेवरील सरकार हे पारदर्शक असावे. प्रत्येक नागरिकास आपले सरकारसमोर म्हणणे मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. तसेच प्रत्येक गोमंतकीय हा गोव्यातच मोठा होईल ही जबाबदारी सरकारने स्वतःवर घेतली पाहिजे, असे विचार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.

आमदार, खासदारांचा सन्मान, सत्कार

कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. नायडू यांच्याहस्ते माजी आमदार तथा स्वातंत्र्यसैनिक रोहिदास नाईक, माजी आमदार तथा खासदार एदुआर्द फालेरो, माजी आमदार चंद्रकांत चोडणकर, माजी आमदार अनिल प्रभुदेसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गजानन रायकर यांना स्मृतीभेट प्रदान करण्यात आली. प्रतापसिंह राणे, तियोतिनो पेरेरा व गोपाळ मयेकर हे विविध कारणांस्तव उपस्थित राहू शकले नाहीत. गोवा मुक्ती चळवळीतील सर्व ज्ञात अज्ञातांना श्री. नायडू यांनी प्रमाण केले तसेच दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सभापती राजेश पाटणेकर यांनी स्वागत केले. कला अकादमीच्या संगीत पथकाने स्वागतगीत सादर केले. शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांचेही भाषण झाले. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी आभार व्यक्त केले.

Related Stories

समाज कल्याण खत्यातर्फे देण्यात येणाऱया योजनेची रक्कम काही दिवसात मिळणार

Omkar B

शांतादुर्गा किटलकरीण जत्रोत्सवाची आज सांगता

Amit Kulkarni

मडगावातील नियोजित पार्किंग प्रकल्प रखडला

Patil_p

गोव्यातील प्रत्येक घराला 31 मार्च पर्यंत शौचालय, वीज व पाणी पुरवठा

Patil_p

पशुखाद्य दरवाढीप्रकरणी दुध उत्पादकांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Patil_p

लाचप्रकरणी अटकेतील डॉक्टरला जामीन मंजूर

Patil_p
error: Content is protected !!