तरुण भारत

संवेदनेतून साहित्याची निर्मिती

प्रा. माधुरी शानभाग यांचे प्रतिपादन : 36 वे कडोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

लेखकाकडे उच्च प्रतिची संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. दुसऱयांच्या वेदना समजून त्यांच्या संवेदनातून लेखन करावे. आसपास जे काही दिसते त्यावर चिंतन करून ते लेखणीच्या माध्यमातून मांडणे गरजेचे आहे. 10 टक्के भूमिका आणि 90 टक्के जर परिश्रम असतील तर एक उत्तम साहित्यकृती निर्माण होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका व जीएसएस कॉलेजच्या माजी प्राचार्या प्रा. माधुरी शानभाग यांनी केले.

मराठी साहित्य संघ कडोली, सांगाती साहित्य अकादमी बेळगाव व अक्षरयात्रा दैनिक तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने व पॉलीफ्लो, पॉलिहैड्रॉन पुरस्कृत 36 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवारी स्वामी विवेकानंद नगरी (छत्रू महाराज भवन कडोली) येथे उत्साहात झाले. या संमेलनाच्या पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग यांनी ‘मला उमजलेले शब्दब्रम्ह’ या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले.

प्रत्येकाने लिहिते व्हा !

साहित्याचे संस्कार हे श्रवणातून होतात. त्यानंतर चिंतन, मनन यातून साहित्य समृद्ध होत जाते. प्रत्येकाने आपल्याला जमेल त्या प्रकारे लिहित जावे. मनातील भावना या कागदावर उमठवीत जाव्यात. कविता वाचनातून कमीतकमी शब्दात कवी आपली भावना कसे पोहोचवतो हे लक्षात येते. तर नाटक वाचनामुळे शब्दांमधून प्रसंग कसा उभा राहतो, याची जाण होते. त्यामुळे प्रत्येकाने लिहिते व्हा असा सल्ला माधुरीताई&ंनी उपस्थित साहित्य रसिकांना दिला.

अन्… ऑपरेशन युद्ध कादंबरीची निर्मिती झाली

कारगिलचे युद्ध सुरू असताना बेळगावमधूनही मदत पोहोचावी यासाठी मराठा लाईट इन्फंट्री येथे बेळगावच्या नागरिकांनी एक कार्यक्रम ठेवला होता. यावेळी बेळगावच्या निर्मलाताई जोगळेकर त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी त्या कार्यक्रमात दोन शब्द बोलणार असल्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा नवरा, मुलगा हे दोन युद्धांमध्ये सहभागी झाले होते. आता माझा नातू कारगिलच्या युद्धासाठी सज्ज झाला आहे. त्यावेळी त्यांच्या मनातील जे भावबंध होते त्यातूनच ‘ऑपरेशन युद्ध’ या कादंबरीची मी निर्मिती केली, ही आठवण प्रा. शानभाग यांनी करून दिली.

संमेलनाचे उद्घाटक अशोक नाईक म्हणाले, साहित्य हे माणसाला जगवते व जगायलाही शिकविते. या साहित्याला जेव्हा वेदनेची जोड मिळते तेव्हा ते परिपूर्ण साहित्य निर्माण होते. केवळ प्रतिभा असून चालत नाही. तर त्या प्रतिभेच्या मागे वेदनाही असावी लागते. या वेदनेतून तयार झालेले साहित्य हे अनेक काळांसाठी मार्गदर्शक ठरते, असे विचार त्यांनी मांडले.

संमेलनाचे उद्घाटन अशोका कन्स्ट्रक्शनचे संचालक अशोक नाईक यांच्या हस्ते झाले. स्वामी विवेकानंद नगरीचे उद्घाटन जीवन संघर्ष फौंडेशनचे डॉ. गणपत पाटील यांच्या हस्ते झाले. संमेलन व्यासपीठाचे उद्घाटन उद्योजक महेश होनगेकर यांनी केले. ग्रंथ दालनाचे उद्घाटन डॉ. लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते झाले. शिव प्रतीमा पूजन लक्ष्मण सामजी-पाटील, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन रुक्मिणी निलजकर, सरस्वती प्रतिमा पूजन पी. आर. पाटील, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन ऍड. शाम पाटील, महात्मा फुले प्रतिमा पूजन उमेश देसाई तर पालखी व ग्रंथ पूजन हभप आप्पय्या पावणोजी यांच्या हस्ते झाले. संमेलनाची सुरुवात शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थीनिंनी सादर केलेल्या स्वागत गीत व ईशस्तवनाने झाली. मराठी साहित्य संघ कडोलीचे अध्यक्ष बाबुराव गौंडाडकर यांनी प्रास्ताविकातून मागील 35 संमेलनांचा आढावा घेतला. त्यानंतर साहित्य संघाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागताध्यक्ष शिवाजी कुटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन सुधीर कुटे यांनी केले. भरमाण्णा डोंगरे यांनी आभार मानले. 

Related Stories

बसस्थानकात पार्किंगअभावी प्रवाशांची गैरसोय

Patil_p

आरपीडी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Amit Kulkarni

शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी

Patil_p

कर्ज देताना चांगले कर्जदार बघून कर्ज द्या!

Patil_p

गुंजी माऊलीदेवी यात्रोत्सवाची सांगता

Amit Kulkarni

टीईटी 4 ऑक्टोबर रोजी होणार

Patil_p
error: Content is protected !!