तरुण भारत

श्रीपादभाऊ बचावले, वहिनी प्राणास मुकल्या

वृत्त कळताच पंतप्रधानांनी  स्वतः केली चौकशी , श्रीपादभाऊंसाठी सर्व उपाय करण्यास सांगितले

प्रतिनिधी/ पणजी

कर्नाटकातील अंकोला जवळील हिलूर होसकांबी गावात राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांच्या कारला काल सोमवारी सायं. 7 च्या दरम्यान गोव्यात परतत असताना भीषण अपघात झाला. त्यात त्यांच्या पत्नी विजयाताई तसेच निजी सचिव दीपक पाटील ठार झाले. श्रीपादभाऊ व कारचालक गंभीर जखमी आहेत. अंकोला खासगी इस्पितळातील उपचारांनंतर रात्री उशिरा त्यांना गोमेकॉत आणण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विचारपूस करुन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून तातडीचे सर्व उपाय हाती घ्या, असे सांगितले. श्रीपादभाऊंच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ द्या, अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो, असे पंतप्रधान म्हणाले.

रात्री उशिरा विजयाताई यांचे पार्थिव शरीर गोव्यात आणण्यात आले असून सध्या गोमेकॉच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. अंत्यसंस्कार कधी होतील, याबाबत माहिती मिळालेली नाही.

  कर्नाटक दौऱयावर गेले होते श्रीपादभाऊ

केंद्रीय आयुषमंत्री तीन दिवसांपूर्वी विमानाने कर्नाटक दौऱयावर गेले. बंगळूरहून ते दोन ठिकाणी जाऊन नंतर धर्मस्थळाला पोहोचले. त्यानंतर त्यांनी रस्तामार्गेच गोव्यात येणे पसंत केले. शिष्टाचार खात्याची गाडी नेहमीच त्यांच्या दिमतीला असते. या कारने ते गोव्याच्या दिशेने येत असता कारवार जिल्हय़ातील अंकोला तालुक्यात हिल्लूर होसकांबी या ठिकाणी त्यांची कार पोहचताच खराब रस्त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वेगाने राष्ट्रीय महामार्गावीरुन कार खाली दरीत पडली व झाडाला जोरदारपणे आदळली.

विजयाताई वहिनींचा जागीच मृत्यू

अपघात एवढा भीषण होता की, कारचे बरेच नुकसान झाले. या भीषण अपघातात श्रीपादभाऊंच्या बाजूला बसलेल्या पत्नी विजयाताई यांच्या कपाळाला एवढय़ा जोरात मार बसला की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर आसपासची मंडळी मदतीला धावली. तसेच कर्नाटक पोलीसही मदतीला धावले. लागलीच एका रुग्णवाहिकेत घालून विजया नाईक यांना जवळपासच्या खासगी रुग्णालयात आणले असता त्यांना इस्पितळात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रात्री उशिरा विजयाताई यांचे पार्थिव शरीर गोव्यात आणण्यात आले असून सध्या गोमेकॉच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. अंत्यसंस्कार कधी होतील, याबाबत माहिती मिळालेली नाही.

श्रीपादभाऊंना रात्री उशिरा गोव्यात आणले

दुसऱया रुग्णवाहिकेतून श्रीपाद नाईक तसेच त्या कारचा चालक व श्रीपाद नाईक यांचे सचिव यांनाही इस्पितळात पाठविण्यात आले. श्रीपाद नाईक यांच्यासह अन्य दोघेही गंभीर होते. नंतर निजी सचिवाचे निधन झाले. श्रीपाद नाईक यांची प्रकृती नाजूक आहे. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान रुग्णवाहिकेतून त्यांना गोमेकॉत आणण्यात आले.

समस्त गोमंतकीयांना तीव्र धक्का

अजातशत्रु श्रीपाद नाईक यांच्या कारला झालेल्या अपघाताने गोव्यातील सर्वांनाच धक्काच बसला आहे. श्रीपादभाऊ यांचे लाखो चाहते गोव्यात आहेत. त्यांना झालेल्या अपघाताने दु:ख व्यक्त करण्यात आले. सौ. विजया नाईक या श्रीपाद भाऊंच्या सहचारिणी देखील अत्यंत सुस्वभावी होत्या. त्यांच्या निधनाने गोव्यातील जनता हळहळली. या दु:खद घटनेने सायंकाळी सर्वत्र हळहळ पसरली. जो तो श्रीपादभाऊंच्या प्रकृतीविषयी चौकशी करीत होता. देवा भाऊंना वाचव अशीच प्रार्थना करीत होते.

जुने गोवेत विजय़श्री निवासस्थानी गर्दी

 श्रीमती विजया नाईक यांच्या निधनाचे वृत्त रात्री वाऱयासारखे सर्वत्र पसरले आणि शेकडो नागरिकांनी जुने गोवे येथील त्यांच्या विजयश्री या निवासस्थानी गर्दी केली. आपल्या पत्नीचे नाव विजया व स्वतःच्या नावातील पाहिले अक्षर श्री घेऊन त्यांनी आपल्या जुने गोवे येथील निवासस्थानाला ‘विजयश्री’ असे नाव दिले आहे. तेथे रात्री उशिरा लोकांची गर्दी  झाली होती. 

सर्वांचे लाडके श्रीपादभाऊ कोरानातूनही वाचले

ऑगस्टमध्ये श्रीपादभाऊ व त्यांच्या पत्नी विजया नाईक हे दोघेहीजण कोविड या भयंकर महामारीतून वाचले. विजयाताई यांच्यापेक्षा श्रीपाद नाईक हे कोविडमुळे गंभीर आजारी पडले होते. त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या काळात त्यांच्या पत्नी विजया नाईक यांनी श्रीपाद नाईक यांची फार मेहनत घेऊन सुश्रुषा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांच्या प्रकृतीची विचारपूस करून खास तज्ञ डॉक्टरांचे पथक दिल्लीहून गोव्यात पाठविले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत श्रीपाद नाईक व विजया नाईक यांनी कोविडवर विजय प्राप्त केला. त्यानंतर सुमारे सव्वा महिना त्यांनी राजभवनवर जाऊन विश्रांती घेतली होती. या जीवघेण्या आजारातून बरे होऊन श्रीपाद नाईक यांची गाडी अलिकडेच रुळावर आली होती, खरी परंतु सोमवारच्या भीषण अपघातात ते प्रवास करीत असलेल्या कारने मात्र रस्ता सोडला त्यात त्यांची पत्नी विजया जागीच मरण पावली तर श्रीपाद नाईक यांच्या हातापायाला मार बसला तसेच डोक्यालाही मुका मार बसलेला आहे.

श्रीपादभाऊंना रात्री उशिरा गोमेकॉत केले दाखल

अंकोला येथून 108 रुग्णवाहिकेतून श्रीपादभाऊंना रात्री गोमेकॉत आणले. त्यावेळी गोमेकॉबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, तसेच सतीश धोंड, भाजपचे अनेक मंत्री, आमदार यावेळी गोमेकॉत हजर होते. श्रीपाद नाईक यांच्या अंगावर लेंगा वजा सफेद पँट होती. शर्ट काढण्यात आला होता. श्रीपाद नाईक हे शांत झोपले होते. त्यांचे हे दृष्य पाहून तिथे उपस्थित अनेकांचे डोळेच पाणावले.

राज्यभरात श्रीपादभाऊंसाठी प्रार्थना सुरू

श्रीपादभाऊंच्या भीषण अपघाताने सारा गोवाच हादरला. या अपघातानंतर ते वाचले, मात्र वहिनी प्राणास मुकल्याच्या वृत्ताने आणखी एक जोरदार धक्का बसला. त्याचबरोबर अनेकांनी श्रीपादभाऊंचे प्राण वाचावे यासाठी देवाकडे प्रार्थना सुरू केल्या. कित्येकांनी देवाला साकडे घालण्यास प्रारंभ केला.

भाऊंची प्रकृती ठिक : मुख्यमंत्री

रात्री उशिरा 12 वा. मुख्यमंत्री तसेच नरेंद्र सावईकर व इतर दोन भाजप नेते गोमेकॉतून बाहेर पडले असता पत्रकारांनी त्यांना घेरले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, श्रीपादभाऊ यांची प्रकृती आता ठिक आहे व सुधारत आहे. आम्ही त्यांना हॅलो म्हटले, त्यांनी जाब दिला. सुरुवातीला अपघात झाला त्यावेळी प्रकृती अत्यंत गंभीर व नाजूक होती. अंकोला येथे इस्पितळात त्यांच्यावर प्राथमिक सर्व उपचार करण्यात आले. त्यांना ऑक्सिजन लावूनच रुग्णवाहिकेतून गोमेकॉत आणण्यात आले. मुख्यमंत्री सुमारे पाऊणतास श्रीपाद नाईक यांच्याबरोबर इस्पितळात होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय संरक्षणमंत्री तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सातत्याने फोनवरून श्रीपादभाऊंच्या प्रकृतीची चौकशी केली. जर प्रकृती गंभीर असल्यास कळवा, तातडीने हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था करतो, असेही गृहमंत्र्यांनी कळविले. तथापि भाऊंची प्रकृती आता ठिक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

श्रीपादभाऊंवर डॉ. बांदेकर व त्यांचे इतर सहकारी डॉक्टर उपचार करीत आहेत. त्यांच्या हातापायाला जिथे मार बसला आहे, त्याचे एक्सरे काढण्यात आले आहेत. दोन ते तीन ठिकाणी हाडे प्रॅक्चर झालेली आहेत. जिथे आवश्यक तिथे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येतील. डॉक्टरांची टीम सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. श्रीपाद नाईक हे आता धोक्याबाहेर आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

परप्रांतीय कसे, हे तर आधारकार्डधारी ‘गोंयकार’!

Omkar B

डिचोली अबकारी खात्यातर्फे सुमारे 4.50 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त.

Omkar B

जनतेने दिव्यांगांना प्रोत्साहन द्यावे

Patil_p

बालभवनच्या 250 कंत्राटी कामगारांना वेतन मिळणे बाकी

Omkar B

कोकण रेल्वे तर्फे ‘स्वच्छता पखवाडा’

GAURESH SATTARKAR

कोरोनाबाधीत रुग्णांसाठी गावातच कोविड निगा केंद्र

tarunbharat
error: Content is protected !!