घुणकी / वार्ताहर
गोवा ते शिर्डी पदयात्रेने जाणाऱ्या साईभक्ताचे अपघाती निधन झाले. घुणकीतील वारणा नदी पुलावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने साईभक्त विश्वास भालचंद्र सावंत (वय ६२ रा. साखळी-बिचोलिम, गोवा) यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये विश्वास यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
गोवा, सांगोल्डा, म्हापसामधून गुरूवार दि.७ जानेवारी रोजी गोवा ते शिर्डी अशी १०६ जण वारकरी व आयांची पायी पदयात्रा सुरू होती. किणी टोल नाक्याच्या पुढे घुणकी (ता.हातकणंगले) वारणा नदी पुलावर आज दुपारी ३:१५ ते ३:३० च्या सुमारास सर्वजण वारकरी पुढे चालत जात होते. यावेळी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहणाने या वारीतील मागील बाजूस चालत असणारे विश्वास भालचंद्र सावंत यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये विश्वास सावंत हे रस्त्यावर जोरात आपटले. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन अतीरक्तस्त्रावामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
काही कळायच्या आत घडलेल्या घटनेमुळे पदयात्रा वारीतील आपल्या एका वारकऱ्याच्या अपघाती मृत्यूमुळे वारीवर शोककळा पसरली आहे. सावंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. बि. एस्. लाटवडेकर यानी शवविच्छेदन करुन मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. वडगाव पोलिसात अपघाताची वर्दी पदयात्रा वारीचे अध्यक्ष बाबु कोचरेकर, यादु नाईक व शेखर नाईक यांनी दिली. याबबतचा अधीक तपास वडगाव पोलिस ठाण्याचे पो.ना.अमर पावरा, रियाज मुल्लाणी करत आहेत.


previous post