तरुण भारत

लस आली म्हणून निष्काळजीपणा नको

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे कोरोना लसीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाले असून पहिल्या टप्प्यात 23 हजार लोकांना लस दिली जाणार आहे. लस आल्यामुळे आनंदाचे वातावरण असले, तरी आरोग्याबाबत गाफिल राहून चालणार नाही.

बहप्रतिक्षित कोरोना लसीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ातही लवकरच कोरोना लस उपलब्ध होणार आहे. याची पूर्वतयारी दोन्ही जिल्हय़ांच्या प्रशासनाने केली असून उणिवा राहू नयेत, यासाठी लसीकरणाची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. गेले वर्षभर कोरोना संकटाच्या सावटाखाली वावरताना लस कधी येणार, याची प्रतीक्षा लागून होती. अखेर कोरोना लस दृष्टिक्षेपात आल्यानंतर निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे. मात्र ही लस घेताना पहिल्या टप्प्यात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस फारच काळजीपूर्वक द्यावी लागणार असून हे एक मोठे आव्हानच आहे.

Advertisements

कोरोना संसर्गावरील दोन लसींच्या आपत्कालीन वापराला ‘ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया’ अर्थात ‘डीजीसीआय’ने परवानगी दिली आहे. सिरम इन्स्टिटय़ूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी दिली आहे. ही लसीकरणाची मोहीम राबविताना पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका अशा प्रंटलाईन कर्मचाऱयांना दिली जाणार असून, दुसऱया टप्प्यात पोलिस, स्वच्छता कर्मचारी आदी घटकांना लस दिली जाणार आहे. तिसऱया टप्प्यात हृदयरोग, मधुमेह व अन्य विकारांनी ग्रस्त लोकांसह वयोवृद्धांना लस दिली जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात सर्वसामान्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोना लसीकरणासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ांनी पूर्व नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात रत्नागिरीमध्ये 13 हजार तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 10 हजार अशा 23 हजार जणांना लस दिली जाणार आहे. लसीकरणामुळे आनंदाचे वातावरण असले, तरी काही व्यक्तींच्या मनात अजूनही शंका उपस्थित होत आहेत. यामध्ये वाईट परिणाम होणार तर नाही ना अशी शंका वाटत आहे. प्राधान्य श्रेणीतील लोकांना पहिल्या टप्प्यात लस दिल्यानंतर लस सुरक्षित आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर दुसऱया टप्प्यात शंका राहणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच लसीकरणाचे मोठे आव्हान असून कोणतीही घाईगडबड न करता अतिशय काळजीपूर्वक लस द्यावी लागणार आहे. लस दिल्यानंतर लोकांवर काही दुष्परिणाम दिसून येतात का हेही पहावे लागणार आहे. लस दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला देखरेखीखाली ठेवणे व रिऍक्शन झाल्यास तातडीने उपचार करणे, आदी परिस्थितीवर डोळय़ात तेल घालूनच लक्ष द्यावे लागणार आहे. तरच कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी ठरणार आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर आपण सुरक्षित झालो, असे गृहित धरणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कोरोना लस घेतली तरी, आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या रुग्ण बरे होण्याचा आकडा चांगला आहे. तसेच नव्याने रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. हळूहळू जग पूर्वपदावर येत आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेची भीतीही कमी झाली आहे. तरीही थंडीचा हंगाम अद्याप संपलेला नाही. त्यामुळे काळजी घेणे अपरिहार्य आहे.

नोव्हेंबर 2019 पासून चीनच्या वुहान येथून कोरोना विषाणू जगभरात पसरायला सुरुवात झाली आणि संपूर्ण वर्ष जगभरातील मानवी जीवन विस्कळीत झाले. 2021 या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनावर लस आल्यामुळे सर्व काही पूर्वीसारखे सुरक्षित होईल, असे सर्वांनाच वाटते. परंतु लस आली तरी कोरोना संकट अजून संपलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. जोपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत लस पोहचत नाही, तोपर्यंत सर्व काही सुरक्षित झाले असे म्हणता येणार नाही.

कोरोना काळात सर्वाधिक कमी मृत्यूदर भारताचा राहिला आहे. मात्र देशात सर्वाधिक मृत्यूदर महाराष्ट्रात राहिला आहे. सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत दर दिवशी वाढ होत असली, तरी दररोज कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हय़ात हीच परिस्थिती आहे. कोरोनावर लस आली म्हणून आता काही काळजी करायची नाही, अशा भ्रमात राहता कामा नये. काही केसीसमध्ये कोरोना पुनः पुन्हा उद्भवल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढच्या काळात आपली अधिकाधिक काळजी घेणे, सामाजिक अंतर, स्वतःला निर्जंतूक ठेवणे, मास्कचा नियमित वापर करणे, वारंवार हात धुणे आदी सवयींचा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग करून घेतला पाहिजे. कोरोनाचे संकट माणसाला सर्व बाजूने घेरणारे ठरले. लाखो लोकांच्या नोकऱया गेल्या. अनेक उद्योगांना टाळे लागले. कोरोनामुळे शहाणपण आलेल्या लोकांनी आपल्या दैनंदिन जगण्यात आश्वासक बदल करून घेतला. पण ज्यांना कोरोनाची झळ लागलीच नाही, असाही वर्ग या समाजात आहे. जो अधिक बेशिस्तीचे प्रदर्शन आजही करीत आहे. त्यांना आवर घालणे हेच समाजापुढील आव्हान आहे. कधी धार्मिक कारणांनी, तर कधी राजकीय इच्छाशक्तीने कोरोनाबाबतचे नियम तोडण्याचे काम सर्रास सुरू आहे. कोरोनाने सुरू झालेली टाळेबंदी उठली आहे. पण याचा अर्थ सर्व काही आलबेल आहे, असे नाही, हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. मुंबई शहर कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला असताना मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांकडून कोरोनाचा संसर्ग दोन्ही जिल्हय़ात वाढला.  अशा परिस्थितीतही कोरोनावर नियंत्रण ठेवले गेले. त्यामुळे यापुढील काळातही कोरोनाची लस आली, तरी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करायलाच हव्यात. गाफिल राहून चालणार नाही. कोरोना लसीबाबतच्या शंका दूर करून लसीकरणाचे आव्हान पेलायला हवे. तरच कोकणातील लोक कोरोना संकटाव पूर्णपणे यशस्वी मात करू शकतील, हे निश्चित.

संदीप गावडे

Related Stories

पाचवे गुरु अग्नी

Patil_p

निष्ठावंत वंत कोण?…उपरे कोण?…भाजपमध्ये वादंग

Patil_p

सर्पदंशावर प्रभावहीन प्रतिसर्पविष

Patil_p

खाशाबांचे वारस घडवा!

Patil_p

एकनाथी भागवत मौन

Patil_p

बिहारमधील ‘सायलेंट व्होटर्स’ची किमया

Patil_p
error: Content is protected !!