शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार : एक अब्ज डॉलर्समध्ये अधिग्रहण शक्य
नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी ऑनलाईन लर्निंग कंपनी बायजूस यांच्याकडून इंजिनिअरिंग, मेडिकलच्या परीक्षांची तयारी करणाऱया आकाश इन्स्टिटय़ूटचे अधिग्रहण करणार आहे. हा व्यवहार एक अब्ज डॉलर्समध्ये (जवळपास 7315 कोटी रुपये) होणार असल्याचे सांगण्यात येते.
दोन्ही कंपन्यांमध्ये व्यवहार होण्यासाठी विचारविनिमय सुरु असल्याचे समजते. जगातील मोठमोठय़ा शैक्षणिक व्यवहारांमधील हा एक व्यवहार राहणार असल्याचे संकेत आहेत. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार बायजूस आगामी दोन ते तीन महिन्यात हा व्यवहार पूर्ण करण्याची शक्यता आहे. कोरोना कालावधीपासून शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाईन लर्निंगच्या वाढत्या मागणीचा सकारात्मक लाभ बायजूस कंपनीला अलीकडे झालेला आहे. सदरच्या नव्या व्यवहारानंतर कंपनीची स्थिती आणखी मजबूत होणार आहे.
कोरोना काळात बायजूसची मोठी कमाई
कोविड-19च्या महामारीच्या कालावधीत बायजूसने जवळपास 12 अब्ज डॉलर्स बाजारमूल्याची मोठी गुंतवणूक प्राप्त केली आहे. याचदरम्यान फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या ‘चान झुकरबर्क इनिशिएटीव्ह’ टायगर ग्लोबल मॅनेजमेंट ऍण्ड बॉण्ड कॅपिटलमध्ये गुंतवणूक केली आहे.
‘आकाश’चा विस्तार
आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस देशातील इंजिनिअरिंग आणि मेडिकल परीक्षांची तयारी करणाऱया प्रमुख कोचिंग संस्थांपैकी एक आहे. देशभरात या संस्थेची 200 पेक्षा अधिक कोचिंग सेंटर्स सुरु आहेत. या संस्थांच्या अंतर्गत 2.5 लाखापेक्षा अधिकचे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात. गुंतवणूक कंपनी ब्लॅकस्टोनजवळ कंपनीची 37.5 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.