तरुण भारत

पंधरा कोटी अपेक्षित, मिळाले फक्त दीड कोटी

अतिवृष्टी भरपाईत सरकारकडून शेतकऱयांची बोळवण : पुन्हा भरपाईची शक्यता कमीच

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

Advertisements

शेतकऱयांचा ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन देत सत्तारुढ झालेल्या राज्यकर्त्यांनी अखेर शेतकऱयांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. यावर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱयांना भरपाईच्या नावाखाली ठेंगा दाखविण्यात आला आहे. जिल्हय़ातील शेतकऱयांचे सुमारे 22 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल पाठविला होता. त्यानुसार भरपाईसाठी सुमारे 15 कोटी 40 लाख अपेक्षित असताना आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या अनुदानानुसार सिंधुदुर्गला केवळ 1 कोटी 58 लाख रुपयेच मिळत आहेत. आता पाठविलेला हप्ता हा दुसरा व अंतिम असल्याने यापुढे भरपाई मिळण्याची शक्यता मावळली आहे.

यावर्षी ऐन भातकापणीच्या हंगामात सातत्याने झालेल्या पावसामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शासनाने भात पीक नुकसानीपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 10 हजार, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 25 हजारच्या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंतची भरपाई जाहीर करण्यात आली.

सर्व नुकसानग्रस्तांना मिळणार?

ही भरपाई जाहीर करण्यात आल्यानंतर भरपाई कुणाला देणार? याबाबतचे निकषच जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे भरपाईचे निकष काय आहेत? याबाबतची विचारणा त्यावेळी जिल्हा दौऱयावर आलेल्या महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना केली असता, त्यांनी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱयांना भरपाई मिळणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतरही निकष निर्धारित झाले नाहीत. त्यामुळे भरपाई नुकसानग्रस्तांना मिळणार म्हणजे कुणाला? याचे चित्र अद्याप स्पष्टच झालेले नाही.

पहिला हप्ता 35 लाखांचा

भातशेतीच्या नुकसानीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भरपाईनंतर जिल्हय़ासाठी जून ते ऑक्टोबर या कालावधीसाठी अतिवृष्टी व पुरामुळे बाधीतांसाठीची भरपाई जाहीर करण्यात आली. यात एकूण 1 कोटी 4 लाख 96 हजार प्राप्त रकमेपैकी मनुष्यहानी, जनावरे, घरे, गोठे, मत्स्य व्यावसायिक यांच्या नुकसान भरपाईसोबत भातशेती व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीपोटी 35 लाख 32 हजार रुपये प्राप्त झाले होते. ही रक्कम नोव्हेंबर 2020 मध्ये प्राप्त झाली होती.

आता केवळ 1 कोटी 23 लाख

दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये प्राप्त आदेशानुसार आता अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱयांना द्यायच्या भरपाईपोटी दुसरा व अंतिम हप्ता मंजूर करण्यात आला आहे. यात जिल्हय़ासाठी 1 कोटी 23 लाख 16 हजार रुपये प्राप्त होणार आहेत. नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेली 35 लाख 32 हजार व आता प्राप्त झालेल्या रकमेचा विचार करता, जिल्हय़ाच्या भरपाईपोटी 1 कोटी 58 लाख 48 हजार रुपये प्राप्त होत आहेत. तसेच आता देण्यात आलेला हप्ता हा दुसरा व अंतिम असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकऱयांसाठी आता पुन्हा अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता धुसरच आहे.

शेवटी पाने पुसलीच

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, यावर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी जिल्हय़ातील सुमारे 22 हजार 700 हेक्टर क्षेत्राचे सुमारे 15 कोटी 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला होता. मात्र, या रकमेएवढे नुकसान असताना प्रत्यक्ष 1 कोटी 58 लाख 16 हजार प्राप्त झाल्याने ही रक्कम शेतकऱयांना वाटायची कशी? असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या तोंडाला शासनाने अखेर पानेच पुसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Stories

रिक्षा व्यावसायिकाचा आकस्मिक मृत्यू

NIKHIL_N

शिक्षक भारतीचा उद्याच्या देशव्यापी संपात सहभाग

Patil_p

फोंडाघाटात कार दरीत कोसळली

NIKHIL_N

किल्ले, दुर्ग, स्मारके पर्यटकांसाठी खुली

NIKHIL_N

रत्नागिरी राधाकृष्णनगर येथे भंगार गोडावूनला आग

Patil_p

कणकवलीतील बहुचर्चित नाल्याची दुरुस्ती अखेर सुरू

NIKHIL_N
error: Content is protected !!