48 हजार कोटी रूपयांचा देशांतर्गत करार करण्यास संमती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
83 आधुनिक तेजस युद्धविमाने (मार्क ए वन तेजस) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. हा करार केंद्र सरकार हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या कंपनीबरोबर करणार आहे. एका भारतीय कंपनीबरोबर केंद्र सरकारकडून करण्यात येणारा हा सर्वात मोठा संरक्षण सामग्री खरेदी करार ठरणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
48 हजार कोटी रूपयांचा हा करार असून करारावर स्वाक्षऱया झाल्यानंतर तीन वर्षांनी विमानांचा पुरवठा सुरू होईल. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात या करारावर स्वाक्षऱया होणार आहेत. सध्या भारतीय वायुसेनेत 40 तेजस विमाने असून नवी विमाने या विमानांपेक्षा जास्त आधुनिक असतील, अशी माहिती देण्यात आली.
संरक्षण सामग्री स्वयंपूर्णता
संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारताला जास्तीत जास्त स्वयंपूर्ण करण्याची सरकारची योजना आहे. या योजनेचा एक भाग म्हणून ही विमान खरेदी केली जाईल. आगामी काही वर्षांमध्ये तेजस हे हलके युद्ध विमान भारताच्या वायुदलाचा आधारस्तंभ बनणार असून त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या कंपनीने तेजसची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करण्यासाठी नाशिक आणि मुंबई येथे नवी उत्पादन केंद्रं सुरू केली आहेत.
अत्याधुनिक उपकरणे
नव्या तेजस विमानांवर अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात येतील. त्यात एईएसए रडार, दीर्घ पल्ल्याची बीव्हीआर क्षेपणास्त्रे, शत्रूचे रडार आणि क्षेपणास्त्रे बंद पाडण्याची क्षमता असणारी उपकरणे इत्यादींचा समावेश असेल. नवी 83 विमाने धरून भारतीय वायुदलात येत्या काही वर्षांमध्ये या प्रकारची 123 विमाने होतील. त्यानंतर 170 मार्क 2 ही मध्यम वजनाची तेजस विमाने याच कंपनीकडून घेण्यात येतील, अशी माहिती बैठकीनंतर पत्रकारांना देण्यात आली.
तुकडय़ांचा तुटवडा
भारतीय वायुदलाला सध्या युद्ध विमानांचा तुटवडा जाणवत आहे. चीन आणि पाकिस्तान यांना एकाचवेळी तोंड द्यायचे असेल तर वायुदलाकडे युद्ध विमानांच्या किमान 42 तुकडय़ा असणे आवश्यक आहे. तथापि, सध्या केवळ 30 तुकडय़ा आहेत. एका तुकडीत 18 विमाने असतात. आगामी वर्षात वायुदलाची आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकार पावले टाकणार आहे.