तरुण भारत

कत्ती, निराणींना मंत्रिपदे

मंत्रिमंडळात सात नवे चेहऱयांचा समावेश : बेळगाव, बेंगळूरमधील आमदारांना प्राधान्य

प्रतिनिधी/ बेंगळूर

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात 7 नव्या चेहऱयांचा समावेश झाला आहे. बेंगळूरमधील राजभवन येथे बुधवारी दुपारी 3.50 वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती, मुरुगेश निराणी, अरविंद लिंबावळी, एम. टी. बी. नागराज, आर. शंकर, सी. पी. योगेश्वर आणि एस. अंगार मंत्रिपदी शपथबद्ध झाले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले आमदार मुनिरत्न यांना धक्का बसला असून त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. तर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱया काही आमदारांनाही मंत्रिपदाची संधी हुकली आहे.

मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या सात मंत्र्यांनी परमेश्वराच्या नावे शपथ घेतली. तर मुरुगेश निराणी यांनी परमेश्वर आणि शेतकऱयांच्या नावे शपथ घेतली. मंत्रिमंडळात दोन लिंगायत, दोन कुरुब (धनगर), दोन अनुसूचित जाती आणि एका वक्कलिग समुदायातील आमदाराला मंत्रिपद देण्यात आले आहे. सात जणांपैकी विधानपरिषद सदस्य सी. पी. योगेश्वर यांना मंत्रिपद देण्यात आल्याने भाजपमध्ये असमाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर मतदारसंघातून निवडून आलेले मुनिरत्न यांना मात्र मंत्रिपद मिळालेले नाही. त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात राज्य भाजपधील राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे पद असणारा नेता कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी मुनिरत्न यांना मंत्रिपद देण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अंतिमक्षणी त्यांना बगल देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असणारे एच. विश्वनाथ यांना देखील मंत्रिपद मिळालेले नाही. मुनिरत्न आणि एच. विश्वनाथ वगळता पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या सर्वांना मंत्रिपदे मिळालेली आहेत. बळ्ळारी जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघात निवडून आल्यास प्रतापगौडा पाटील यांना देखील मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागणार आहे. त्याकरिता मंत्रिमंडळात एक जागा रिक्त ठेवण्यात आल्याचे समजते.

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात उत्तर कर्नाटक त्यातही प्रामुख्याने बेळगाव जिल्हा आणि बेंगळूर शहर जिल्हय़ाला अधिक प्राधान्य मिळाले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावेळी असणारा प्रादेशिक असमतोल कायम आहे. बेळगाव जिल्हय़ातील शशिकला जोल्ले, रमेश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, श्रीमंत पाटील आणि उमेश कत्ती अशा एकूण पाच जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहेत. बेळगाव जिल्हय़ालाच सिंहाचा वाटा मिळाल्याने मध्य कर्नाटकातील काही भाजप आमदार नाराज झाले आहेत.

सहावेळा विधानसभेवर निवडून आलेले एस. अंगार यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर उमेश कत्ती तिसऱयांदा मंत्री बनले आहेत. मुरुगेश निराणी, अरविंद लिंबावळी, सी. पी. योगेश्वर, एम. टी. बी. नागराज आणि आर. शंकर दुसऱयांदा मंत्रिपदी आरुढ झाले आहेत. बुधवारी शपथबद्ध झालेल्यांमध्ये एम. टी. बी. नागराज, आर. शंकर आणि सी. पी. योगेश्वर हे विधानपरिषद सदस्य आहेत.

सी. पी. योगेश्वर 2018 च्या विधानसभा निवडणुकीत चन्नपट्टणमधून पराभूत झाले होते. तर एम. टी. बी. नागराज पोटनिवडणुकीत पराभूत झाले होते. तर आर. शंकर यांना पोटनिवडणुकीसाठी भाजपने तिकीट दिले नव्हते. नंतर त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यात आले होते.

खातेवाटपावर लक्ष

मंत्रिमंडळाचा विस्तार होताच वजनदार खाते मिळविण्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांसह नव्या मंत्र्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. काही मंत्र्यांची खाती बदलण्यात येण्याची शक्यता आहे. येडियुराप्पा यांनी या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. गृहमंत्री बसवराज बोम्माई, महसूलमंत्री आर. अशोक, उद्योग मंत्री जगदीश शेट्टर, ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार असल्याचे समजते. अतिरिक्त खाती सांभाळण्याऱया मंत्र्यांजवळील खाती आणि मुख्यमंत्र्यांजवळ असणारे उर्जा, कन्नड-सांस्कृतिक, पर्यटन, बेंगळूर शहर विकास, युवजन सबलिकरण आणि लघुउद्योग खाते नव्या मंत्र्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये असंतोषाचे वारे

राज्य मंत्रिमंडळ विस्तार होताच सत्ताधारी भाजपमध्ये असंतोषाचे वारे वाहू लागले आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने अनेक जणांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आमदार तिप्पारेड्डी, गुळीहट्टी शेखर, के. जी. बोपय्या, सुनीलकुमार, अप्पच्चु रंजन, नेहरु ओलेकार, नेहरु ओलेकार, राजुगौडा, एस. ए. रामदास यांच्यासह अनेकजण मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने आगामी दिवसांत ते आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. एम. पी. रेणुकाचार्य, बसवनगौडा पाटील-यत्नाळ, तिप्पारेड्डी नेहरु ओलेकार यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. लॉबिंग केलेल्यांनाच मंत्रिपदे देण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.

मंत्रिमंडळात समाविष्ट झालेले नवे चेहरे

उमेश कत्ती       हुक्केरी (बेळगाव)

मुरुगेश निराणी बिळगी (बागलकोट)

अरविंद लिंबावळी         महादेवपूर (बेंगळूर)

एस. अंगार       सुळय़ (मंगळूर)

एम.टी.बी. नागराज विधानपरिषद सदस्य (बेंगळूर)

आर. शंकर       विधानपरिषद सदस्य (हावेरी)

सी. पी. योगेश्वर            विधानपरिषद सदस्य (रामनगर)

मंत्रिपद गेले, निगमचे अध्यक्षपद आले…

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या सूचनेवरून अबकारी मंत्री एच. नागेश यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना आंबेडकर विकास निगमचे अध्यक्षपद  देण्यात आले आहे. नागेश यांनी आपल्याला आंबेडकर विकास निगमचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. या पदावरील मुनिकृष्ण यांना मार्केट कम्युनिकेशन ऍडव्हार्टाइज लि. चे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. बुधवारी सकाळीच एच. नागेश यांनी आपल्याला मंत्रिमंडळातून वगळले जाणार नाही, याची खात्री असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, राज्य भाजप प्रभारी अरुण सिंग यांनी त्यांची समजूत काढली. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही सूचना केल्यामुळे एच. नागेश यांनी नाईलाजास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Related Stories

चोवीस तासात देशात 27 हजार नवे रुग्ण

Patil_p

केंद्र सरकारकडून 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस

datta jadhav

भारतात येणार आणखी पाच ‘राफेल’ विमाने

datta jadhav

भोपाळ : पत्नीला मारहाण करणारे आयपीएस पुरुषोत्तम शर्मा निलंबित

pradnya p

दिल्ली : लग्नाच्या वाढदिवशी पतीने शुभेच्छा न दिल्याने पत्नीने घेतला गळफास

pradnya p

बेंगळूर हिंसाचार: माजी महापौर संपत राज यांची एनआयएकडून चौकशी

Shankar_P
error: Content is protected !!