तरुण भारत

बेंगलोर एफसीने साधली नॉर्थईस्टशी बरोबरी

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल लीग फुटबॉल स्पर्धेतील बेंगलोर एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. काल हा सामना वास्कोतील टिळक मैदानावर खेळविण्यात आला.

सामन्याच्या 27व्या मिनिटाला पोर्तुगाली स्ट्रायकर लुईस माशादोने गोल करून नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला आघाडीवर नेले. होते. मात्र, दुसऱया सत्रात आरंभालाच राहुल भेके याने बेंगलोरचा गोल करून बरोबरी गाठली. या निकालाने उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. बेंगलोर एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांचे अनुक्रम सहावे व सातवे स्थान कायम राहिले. बेंगलोरचे आता 11 सामन्यांतून तीन विजय, चार बरोबरी व चार पराभवाने 13 तर नॉर्थईस्ट युनायटेडचे 11 सामन्यांतून दोन विजय, सहा बरोबरी आणि तीन पराभवाने 12 गुण झाले.

सामन्याच्या तिसऱयाच मिनिटाला बेंगलोर एसीला गोल करण्याची नामी संधी मिळाली होती. पराग श्रीवासने डाव्या बगलेतून क्रिस्टियान ऑप्सेतला चांगला पास दिला होता, मात्र ऑप्सेतला त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. त्यानंतर राहुल भेकेच्या पासवर क्रिस्टियान ऑप्सेतने हाणलेला फटका नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलरक्षक गुरमीत सिंगने अडविला.

नॉर्थईस्ट युनायटेडने नंतर 27व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. फॅडेरिको गॅल्लेगोने दिलेल्या पासवर लुईस माशादोने प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरप्रीत सिंगला भेदले व चेंडू जाळीत टोलविला. आठ मिनिटांनी नॉर्थईस्ट युनायटेडला आपली आघाडी वाढविण्याची संधी प्राप्त झाली होती. यावेळी रोचारझेलाने दिलेल्या क्रॉसवर सुहेल वडाक्केपिडिकाचा हेडर दिशाहीन ठरला. मध्यंतराच्या ठोक्याला बेंगलोर एफसीच्या क्लिटॉन सिल्वाची व्हॉली गोलरक्षक गुरमीत सिंगने अडविली.

दुसऱया सत्रात आरंभालाच बेंगलोर एफसीने गोल करून बरोबरी साधली. दिमास देल्गादोने दिलेल्या पासवर योग्य नियंत्रण ठेवताना राहुल भेकेने गुरमीत सिंगला यावेळी भेदले व बरोबरीचा गोल केला. या बरोबरीनंतर बेंगलोर एफसीचा खेळ बहरला. यावेळी सुनील छेत्रीचा गोल करण्याचा यत्न गुरमीतने निष्फळ ठरविला. बरोबरी झाल्यानंतर दोन वेळा नॉर्थईस्ट युनायटेडने गोल करण्याच्या संधी सदोष नेमबाजीमुळे गमविल्या. प्रथम फॅडेरिको गॅल्लेगो व नंतर लुईस माशादोचे यत्न वाया गेले. शेवटच्या क्षणी बेंगलोर एफसीलाही गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या होत्या. प्रथम 81व्या मिनिटाला लिऑन आगुस्तिनच्या पासवर दिमास देल्गोदाचा फटका गुरमीत सिंगने अडविला व नंतर दोनच मिनिटानी दिमास देल्गादोच्या पासवर राहुल भेके गोल करण्यात चुकला. या सामन्यात रोख 50,000 रकमेचा सामनावीर पुरस्कार नॉर्थईस्ट युनायटेडच्या लालेंगमावियाला मिळाला.

Related Stories

विंडीजचे कॅमेरॉन आयसीसी अध्यक्षपदाच्या रिंगणात

Patil_p

ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत यश वर्धन विजेता

Patil_p

राजस्थानच्या विजयात स्टोक्सचे झंझावाती शतक

Patil_p

सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनचे शतक

Patil_p

पॅराऍथलीट शरद कुमारकडून एक लाखाची मदत

tarunbharat

सनरायजर्स हैदराबादची प्ले-ऑफमध्ये धडक!

Patil_p
error: Content is protected !!