तरुण भारत

फातोडर्य़ात आज रंगणार एफसी गोवा-जमशेदपूर संघात लढत

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज गुरुवारी जमशेदपूर एफसी आणि एफसी गोवा यांच्यात लढत होत आहे. बाद फेरीतील स्थान नक्की करण्यासाठी दोन्ही संघांना चुका टाळून कामगिरी उंचावण्याची गरज आहे. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर ही लढत होईल. सध्या 10 सामन्यांतून एफसी गोवा 15 गुणांनी चौथ्या तर जमशेदपूर एफसी 13 गुणांनी पाचव्या स्थानावर आहे.

स्पर्धेचा निम्मा टप्पा झाला असताना एफसी गोवा संघ चौथ्या स्थानावर आहे. पण आघाडीवरील मुंबई सिटीपेक्षा ते दहा गुणांनी मागे आहेत. अणि आणखी दहा सामने बाकी असताना एफसी गोवाचे प्रशिक्षक जुआन फॅरांडो यांनी एकावेळी एका सामन्याचाच विचार करण्याचे धोरण अवलंबविले आहे.

गेल्या आयएसएल लीगमध्ये एफसी गोवा संघ अव्वल ठरला होता. या मोसमात  मात्र बहुतांश सामन्यांत वर्चस्व राखूनही त्यांना अपेक्षित निकाल साध्य करण्यास झगडावे लागत आहे. दहापैकी आठ सामन्यांत पहिला गोल एफसी गोवाने घेतला आहे. त्यांचा एकूण बचाव चांगला झाला असला तरी एकाग्रता काही वेळा ढळण्याचा फटका त्यांना बसला आहे.

प्रत्येक सामन्यात तीन गुण मिळविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे फॅरांडो म्हणाले. सर्व सामने जिंकण्याचे माझे लक्ष्य आहे. आम्ही आमच्या कामगिरीबाबत पूर्ण समाधानी नाही, पण आता एकावेळी एक पाऊल टाकावे लागेल. फुटबॉलमध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. आम्हाला एकावेळी एकाच सामन्याचा विचार करावा लागेल आणि जमशेदपूर एफसविरुद्धचा सामना आमच्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे, असे जुआन फॅरांडो म्हणाले.

आधीच्या लढतीत तीन गुण मिळविण्यात सुदैवी ठरले, पण संबंधित त्रुटीवर मात केल्याचा आत्मविश्वास स्पेनच्या फॅरांडो यांनी व्यक्त केला. जमशेदपूर एफसीचा संघ चांगला आहे. त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू आहेत. आमच्यासाठी हा नवा अध्याय आहे आणि आम्ही बचावातील तसेच आक्रमणातील काही बाबींमध्ये सुधारणा करण्यासाठी दररोज प्रयत्न करीत आहोत. आम्ही आजच्या लढतीत चुका करणार नाही, असे फॅरांडो म्हणाले.

जमशेदपूरला नेरीयूस वॅल्सकीस याचा अपवाद सोडून सातत्याने गोल करणाऱया दुसऱया खेळाडूची प्रतिक्षा आहे. लिथुएनियाच्या या स्ट्रायकरने आपल्या संघाचे 12 पैकी 8 गोल केले आहेत. फॅरांडो यांनी एकाच खेळाडूविरुद्ध तयारी करण्याऐवजी संपूर्ण प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध योजनाविरुद्ध बनविण्यास प्राधान्य दिले आहे. माझा संघाच्या क्षमतेवर विश्वास आहे. संघ म्हणून खेळणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला जमशेदपूर एफसीविरुद्ध संघ म्हणून खेळण्याची तयारी करावी लागेल, असे फॅरांडो म्हणाले.

जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांना एफसी गोवाविरुद्ध कोणत्याही चुका करून चालणार नाही याची जाणीव आहे. चेंडूवरील ताब्यात वर्चस्व राखणारा आणि भेदक आक्रमण करणारा एफसी गोवाचा संघ आहे. आम्हाला वैयक्तिक चुका टाळाव्या लागतील अणि आगेकूच करावी लागेल, असे कॉयल म्हणाले. एफसी गोव्याचा संघ एकाच शैलीचा खेळ अनेक मोसमापासून करीत आहे. आम्हाला त्यांच्या बलस्थानांची जाणीव आहे तसेच आम्हाला त्यांच्या त्रुटीही माहीत आहेत, असे कॉयल म्हणाले.

Related Stories

लंका प्रिमियर लीग स्पर्धा लिलावात मुनाफ पटेल, आफ्रिदी, गेलचा सहभाग

Patil_p

टोकियो ऑलिम्पिक तिकिटांचे अनावरण

Patil_p

नेपाळचे तीन क्रिकेटपटू कोरोना बाधित

Patil_p

लंडन डायमंड लीग स्पर्धा रद्द

Patil_p

प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा 27 सप्टेंबरपासून

Patil_p

सॅम करनची कोव्हिड चाचणी

Patil_p
error: Content is protected !!