पटना / वृत्तसंस्था
इंडिगो विमान कंपनीच्या मॅनेजरच्या हत्याकांडाने बिहारची राजधानी हादरली आहे. पटना विमानतळावर कार्यरत असलेल्या इंडिगो विमान कंपनीच्या मॅनेजरची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. रुपेश कुमार असे मृत मॅनेजरचे नाव आहे. कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. गोळीबारात रुपेश कुमार गंभीर जखमी झाले होते. पटना येथे पुनाईचाक भागातील कुसुम विलास अपार्टमेंट येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. बेशुद्धावस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेवरून राजकीय वातावरणही तप्त झाले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
इंडिगो एअरपोर्ट मॅनेजर असलेले रुपेश कुमार विमानतळावरून घरी येत होते. त्यांची कार अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर येताच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कारमध्ये असलेले कुमार गंभीर जखमी झाले होते. आरोपींनी कुमार यांच्या दिशेने तब्बल सहा राऊंड फायर केले. त्यानंतर आरोपी फरार झाले. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांकडून विशेष पथकांची नियुक्त करण्यात आली आहे.