तरुण भारत

खेळाडूंच्या दुखापती हा आयपीएलचा दुष्परिणाम

ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरची खरमरीत टीका, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी व शेवटची कसोटी उद्यापासून

वृत्तसंस्था / ब्रिस्बेन

Advertisements

मला स्वतःला आयपीएलचे व्यासपीठ आवडते. पण, मागील आवृत्तीतील आयपीएल स्पर्धेची वेळ पूर्णपणे चुकीची होती. ती वेळ चुकल्यामुळेच खेळाडूंच्या दुखापती सध्या उफाळून आल्या आहेत आणि याचा भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना फटका बसला आहे, अशी टीका ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरने केली. कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे मागील आयपीएल स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत खेळवली गेली. एरवी ही स्पर्धा एप्रिल ते मे या कालावधीत भारतात खेळवली जाते.

आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत आले आहेत आणि सध्या सुरु असलेल्या मालिकेत त्याचा आणखी कहर झाला. अगदी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील विविध दुखापतींमुळे जायबंदी झाले आहेत.

‘या हंगामात किती दुखापती झाल्या, याची काही गणतीच आता राहिलेली नाही. आयपीएलसारखी प्रदीर्घ चालणारी स्पर्धा चुकीच्या वेळी आयोजित केली गेली तर त्याचे असे दुष्परिणाम होणारच’, असे लँगरने या आभासी पत्रकार परिषदेत पुढे नमूद केले.

सध्या दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा व जसप्रित बुमराह यांचा नव्याने समावेश केला गेला असून यापैकी जडेजाला अंगठय़ाची तर बुमराहच्या पोटाचे स्नायू दुखावले आहेत. यापूर्वी, केएल राहुल, मोहम्मद शमी व उमेश यादव हे देखील विविध दुखापतीमुळेच मालिकेतून बाहेर फेकले गेले.

ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का सोसावा लागला. पण, त्यांच्या सुदैवाने तो शेवटच्या दोन कसोटीसाठी वेळेत तंदुरुस्त होऊ शकला. दरम्यान, लँगरने दुसरी बाजू लावून धरत आयपीएल स्पर्धेच्या योगदानाचाही उल्लेख केला.

‘मला स्वतःला आयपीएल स्पर्धा आवडते. आमच्या खेळाडूंना कौंटी क्रिकेटबद्दल जी आत्मीयता आहे, ती मला आयपीएलबद्दल आहे. आमचे खेळाडू कौंटी खेळतात आणि त्यांच्या खेळातही वेगळी प्रगल्भता येते. अशा स्पर्धांच्या माध्यमातूनच खेळाडूंची जडणघडण होते. मात्र, मागील आवृत्तीच्या आयपीएल स्पर्धेची वेळ चुकीची होती. पुन्हा स्पर्धेच्या वेळेत बदल करावा लागला तर या बाबीचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा आहे’, असे लँगर म्हणाला.

‘बुमराह व जडेजा खेळत नसतील तर याचा लढतीवर निश्चितपणाने परिणाम जाणवेल. पण, या हंगामातील एखाद्या मालिकेतील सर्वात निर्णायक लढत येथे होणार आहे’, असे लँगरने भारताविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर नमूद केले. भारतीय संघ अंतिम लाईनअप कशी आखणार, यापेक्षा आपल्या संघाची रणनीती कशी असेल, यावर अधिक लक्ष देणार असल्याचे लँगरने सांगितले. उभय संघातील 4 कसोटी सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथी कसोटी उद्यापासून (शुक्रवार दि. 15) खेळवली जाणार असून सोनी सिक्स, सोनी टेन 1 व सोनी टेन 3 या वाहिन्यांवरुन त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

नेतृत्वाची धुरा टीम पेनकडेच राहणार : लँगर

खराब यष्टीरक्षण व तिसऱया कसोटी सामन्यातील अखिलाडूवृत्ती यामुळे विद्यमान ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन टीकेचे लक्ष्य ठरत आला असला तरी प्रशिक्षक जस्टीन लँगरने त्याला पाठबळ दर्शवले आहे. पेनने रविचंद्रन अश्विनशी बाचाबाची केल्यानंतर त्याला प्रचंड टीका सोसावी लागली. याशिवाय, त्याने 3 सोपे झेल सांडत खराब यष्टीरक्षण नोंदवले. पण, प्रशिक्षक लँगरने दुसऱया डावात टीम पेनने दिलेल्या योगदानाकडे लक्ष वेधले. पेनने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात 52 चेंडूत खेळून काढत 6 चौकारांसह नाबाद 39 धावा केल्या. तो 99 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहिला होता.

‘टीम पेन लढवय्या आहे आणि माझा त्याला 100 टक्के पाठिंबा आहे. आणखी काही काळ निश्चितपणाने तोच कसोटी संघाचा कर्णधार असेल’, असे लँगरने येथे स्पष्ट केले.

अद्यापही ऑस्ट्रेलियाला सावध रहावे लागेल : लियॉन

भारताच्या अनेक खेळाडूंना दुखापतीचा फटका बसत आला असला व मुख्य खेळाडू चौथ्या कसोटीत खेळणार नसले तरी यानंतरही आमच्या संघाला सावध पवित्र्यावरच भर द्यावा लागेल, असे ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन म्हणाला. तिसऱया कसोटीत भारताने जो निर्धाराने खेळ साकारला, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा त्याचा दावा आहे.

जसप्रित बुमराह, जडेजासारखे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने भारताला दुसऱया फळीतील खेळाडू खेळवावे लागतील. पण, हे खेळाडू देखील गुणवत्तेत फारसे कमी नाहीत, याचा लियॉनने येथे उल्लेख केला. ‘गब्बाचा इतिहास आमच्या बाजूने आहे, हे बलस्थान असेल’, असेही तो म्हणाला. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये आजवर 55 सामने खेळले असून त्यात 33 जिंकले आहेत, 13 अनिर्णीत राखले आहेत तर 8 लढतीत पराभवाचा सामना केला आहे. याशिवाय, 1 लढत टाय राहिली आहे.

भारतीय खेळाडू

व त्यांना झालेल्या दुखापती

खेळाडू          दुखापत

मोहम्मद शमी     हात प्रॅक्चर

उमेश यादव   पोटरीची दुखापत

केएल राहुल   मनगटाची दुखापत

चेतेश्वर पुजारा     बोटाची दुखापत

हनुमा विहारी     धोंडशिरेची दुखापत

रविचंद्रन अश्विन पाठदुखी

ऋषभ पंत     कोपराची दुखापत

मयांक अगरवाल बोटाची दुखापत

रवींद्र जडेजा अंगठय़ाची दुखापत

जसप्रित बुमराह      पोटाच्या स्नायूंना दुखापत

Related Stories

शकीबचे 4 बळी, बांगलादेशचा विंडीजवर विजय

Patil_p

आयपीएलच्या धर्तीवर रंगणार कुस्ती दंगल !

Abhijeet Shinde

लेजेंड्स बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

Patil_p

ताजिकिस्तानमधील फुटबॉल हंगाम तहकूब

Patil_p

ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी संदीप मानची जागा आरक्षित

Patil_p

वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप अंतिम लढत लांबणीवर?

Patil_p
error: Content is protected !!