बेळगाव : महानगरपालिकेतील प्रथम दर्जा साहाय्यक बाबुराव यल्लाप्पा सनदी प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच निवृत्त झाले. तब्बल 42 वर्षे त्यांनी महानगरपालिकेमध्ये सेवा बजावली आहे. यावेळी त्यांचा महानगरपालिकेतर्फे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 1978 मध्ये महानगरपालिकेत ते रोजंदारी कर्मचारी म्हणून रुजू झाले. यावेळी त्यांना मासिक वेतन सव्वा चार रुपये मिळत होते. महापालिकेच्या सेवेत कायम केले जावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी 1999 साली सहभाग घेतला. त्यानंतर पालिकेत कायमस्वरुपी म्हणून त्यांची नेमणूक झाली. महसूल विभागात त्यांनी कार्यकाळ घालविला. निवृत्त होण्याआधी प्रथमदर्जा साहाय्यक पदावर त्यांना बढती देण्यात आली. महसूल खात्याचे अधिकारी संतोष अनिशेट्टर व सहकाऱयांनी त्यांचा गौरव केला. यावेळी त्यांच्या सहकाऱयांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या कार्यकाळात सर्वांशी मिळून मिसळून त्यांनी प्रदीर्घ सेवा केली आहे. त्यांचे सर्वांशी घनिष्ठ संबंध होते. त्यांनी 42 वर्षे कार्यतत्परतेने सेवा बजावली. यामुळे त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


previous post