जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन -स्थानिक कामगारांवर होतोय अन्याय
प्रतिनिधी/ सातारा
भारतातील समाज सुधारावा, त्यांची प्रगती व्हावी, राहणीमान सुधारावे यासाठी स्थानिक संस्थांना अधिकार दिले आहेत. मात्र, त्या अधिकाराचा वापर समाजाला अधोगतीकडे नेण्यासाठी होत असेल तर कुंपणानेच शेत खाण्यासारखे होईल. असाच प्रकार शिरवळ येथील स्थानिक कामगारांबाबत होत असल्याने कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ चड्डी, बनियनवर आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही शिरवळ येथील स्थानिक रहिवासी असून शिरवळ परिसरातील अनेक समाजउपयोगी उपक्रमामध्ये हिरीरीने अग्रभागी असतो. शिरवळ परिसरामध्ये अनेक औद्योगिक कंपन्यामध्ये मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता व उपलब्धता असते. त्यानुसार स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे या शासनाच्या उद्देशानुसार आम्ही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनेक उद्योगामध्ये त्या संदर्भात निवेदने देवून स्थानिक समानता साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.
त्यानुसार अनेक उद्योगांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला परंतु स्थानिक शिरवळमधील ग्रामपंचायतमधील काही ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वार्थापोटी व आडमुठय़ा भूमिकेमुळे या उपक्रमाला गालबोट लागून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत याचा निषेध करण्यासाठी व सत्यपरीस्थिती सर्वांच्यासमोर आणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून शांततेच्या मार्गाने शिरवळ ग्रामपंचायती समोर उपोषण देखील केले. परंतु सत्याला वाचा न फुटल्याने शिरवळ परिसरातील जनतेमध्ये असंतोष आहे. त्या असंतोषाचा उद्रेक होऊन सामाजिक शांततेचा भंग होऊ नये म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अर्धनग्न अवस्थेत चड्डी बनियान आंदोलन करत आहोत.