तरुण भारत

उसाची उचल करण्यासाठी शेतकऱयांची धावपळ

खानापूर तालुक्यात ऊसतोड मजुरांची कमतरता : तुरे आल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता ः शेतकऱयांना आर्थिक फटका

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर तालुक्यातील ऊस गेल्या दोन महिन्यापासून बेळगाव जिल्हय़ातील तसेच हल्याळ तालुक्यातील साखर कारखान्यांना जात आहे. याचबरोबर चंदगड तालुक्यातील तीन साखर कारखान्यांनाही तालुक्यातून उसाची वाहतूक सुरू आहे. पण साखर कारखान्यांना ऊस पाठवण्यासाठी यावर्षी शेतकरी वर्गाला बरीच धावपळ करावी लागत आहे. यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच गळीत हंगाम सुरू होण्यास पंधरा दिवसांचा उशीर झाला. तर सुरुवातीच्या काळात केवळ रस्त्यावरचा नेण्यास ऊस सुरू झाला. पण आतल्या शेतवडीत पावसामुळे ऊस वाहतुकीचे वाहने पोहचणे कठीण झाले. पाऊस पूर्णतः गेल्यावरच आतील शेतातील उसाची वाहतूकही सुरू झाली. त्यातच डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील तालुक्याच्या बऱयाच भागात मुसळधार पावसामुळे पुन्हा ऊस वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या. पण आता गेल्या दोन-चार दिवसात पुन्हा मुख्य रस्त्यापासून आत असलेल्या ऊस मळय़ातील ऊस वाहतूकही सुरू झाली आहे. अशातच आता तोडणी यंत्रणा अपुरी पडत असल्याने उसाला लवकर तोड मिळण्यास अडचणी येत आहेत. तोडणीसाठी मजुरांची कमतरता पडत आहे. तर उसाची वेळेत उचल होत नसल्याने उसाला आता तुरे येण्यास प्रारंभ झाला आहे. तुरे आल्याने शेतकऱयांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. त्यातच सुरुवातीचा आणि परतीचा पाऊस अधिक झाल्याने तोडणी हंगामाला उशीर झाला आहे. बहुतांशी तोडणी कामगारांच्या टोळय़ा आलेल्या नाहीत.अनेक टोळय़ांमध्ये कामगारांची संख्या कमी असल्याने तोडणी यंत्रणा अपुरी पडत आहे. नोंदणी झालेल्या ऊस तोडणीसाठी शेतकरी धडपडत असून वाहतुकदारांकडून पैशाची मागणी वाढली आहे. ट्रक्टर, ट्रकमालक व मजूर यांची साखळी तयार झाली असून ऊस उत्पादक शेतकऱयाकडून जादा पैसे उकळले जात आहेत. शेतकऱयाला 1 एकर ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी सुमारे 7 ते 8 हजार रुपये जादा खर्च करावा लागत असल्याची चर्चा आहे. सध्या ऊसतोडणी लवकरात लवकर करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकरी रोज मजुरांच्या शोधात भटकत आहेत. मजूर वेळेवर मिळाले नाहीत तर शेतकऱयांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. आधीच कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. महागाई वाढत चालली आहे. त्यातच आता उसाचे नुकसान झाल्यास शेतकऱयांना मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. मजुराऐवजी यंत्राणे ऊस तोडणीचा पर्याय उपलब्ध आहे. पण तोडणी यंत्र आणणे शेतकऱयांना परवडणारे नाही, यासाठी साखर कारखान्यांनीच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

Related Stories

हिरेबागेवाडी येथील युवकाला कोरोना ; बेळगाव जिल्हय़ात फैलाव सुरूच

triratna

सुलधाळ ग्रा.पं.समोर महिलांचे धरणे

Patil_p

लोकापूर – धारवाड व्हाया सौंदत्ती रेल्वे मार्गाला मंजुरी द्या

Patil_p

टेलर कामगारांना मासिक पाच हजाराची मदत करा

Patil_p

शहापूर महिला मंडळातर्फे संकटमोचन नाम जप

Patil_p

गौंडवाडजवळ जुगारी अड्डय़ावर छापा; पाच जणांना अटक

Rohan_P
error: Content is protected !!