तरुण भारत

दापोलीत ‘हनी ट्रप’ने अनेक जण धास्तावले

सोशल मिडियावरील मैत्रिणींचा अनेकांनी घेतला धसका

वार्ताहर/ मौजेदापोली

‘यापुढील आयुष्य तुमच्यासोबत घालवायचे आहे’ अशी भुरळ पाडत एका अमेरिकन महिलेने जालगाव येथील 57 वर्षीय प्रैढास तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना नुकतीच घडली. या ‘हनी ट्रपच्या’ प्रकाराने अनेक जण धास्तावले असून, अनेकांनी आपल्या संपर्कातील सोशल मीडियावरील ‘मैत्रिणीं’चा धसका घेतला आहे. 

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालगाव येथील सुनील भावे यांची जेसिका नॅन्सी या तरुणीशी फेसबुकद्वारे ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. जेसिकाने ती अमेरिकन सैन्यात कार्यरत असून तिची अफगाणिस्तानात नेमणूक असल्याचे सांगितले होते. सध्या अफगाणिस्तानमध्ये धामधूम सुरू असून तिच्याजवळील महत्त्वाची कागदपत्रे व साडेसात लाख अमेरिकन डॉलर्स आपल्याकडे सोपवायचे असल्याचे तिने भावे यांना सांगितले. आपल्याला एक मुलगी असून उर्वरित आयुष्य भावे यांच्यासोबत घालवायचे असल्याचा भरवसा तिने भावे यांना दिला होता. यासाठी अमेरिकन डॉलर्स आपल्याकडे पाठवत असून ते भारतीय रुपयात बदलून घेण्यासाठी पार्सल पाठवल्याचे सांगतले. यानंतर भावे यांनी 16 नोव्हेंबर 20 रोजी 75 हजार रुपये फोन पेद्वारे व त्यानंतर करन्सी चेंजसाठी 2 लाख 25 हजार रुपये दिलेल्या खात्यात जमा केले.

20 नोव्हेंबर रोजी 95 हजार एनईफटीद्वारे तर 21 डिसेंबर रोजी 80 हजार आदी प्रकारे एकूण 11 लाख 60 हजार रुपये भावे यांनी विविध खात्यात भरले होते. हा प्रकार 8 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2020 दरम्यान फेसबुक व त्यानंतर व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून घडत होता. मात्र आपण फसल्याचे लक्षात आल्याने भावे यांनी दापोली पोलीस स्थानकात संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.

ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका !

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. कोणत्याही अनोळखी, ऑनलाईन ओळख झालेल्या, मित्र-मैत्रीणीला ऑनलाईन पद्धतीने पैसे देऊ नयेत. हे गुन्हेगार विविध मार्गाचा अवलंब करत असून कोणीही अशा घटनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.  

तो आहे की ती ?

जालगाव येथील या वयोवृद्ध व्यक्तीला जेसिका नावाच्या महिलेने सोशल मीडियावर फसवले असले तरी या जेसिकाबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. ही बाई नक्की जेसिका नावाची होती का, ती खरच बाई होती की पुरुष, एखाद्या पुरुषाने किंवा फसवणूक करणाऱया रॅकेटने महिलेचे बोगस अकाऊंट काढून फसवले नाही ना, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Related Stories

जिह्यात कोरोना रूग्णवाढीला लगाम

Omkar B

डायलेसीस सेंटर बंदमुळे रुग्णांना आर्थिक फटका

NIKHIL_N

आणखी 80 पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

NIKHIL_N

गुहागर येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

triratna

वाशिष्ठी नदीत बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

Patil_p

जुगार खेळताना अकराजण ताब्यात

NIKHIL_N
error: Content is protected !!